29 जून 2010

ब्रूस पार्टिंग्टन प्लॅन्स(२)

"तो गेली दहा वर्षं या खात्यात काम करतो आहे. तो गरम डोक्याचा आणि मागचापुढचा विचार न करता कृती करणारा पण एक सरळमार्गी आणि निष्ठावंत माणूस म्हणून प्रसिद्ध आहे त्याच्याविरुद्ध आपल्याकडे काहीच पुरावा नाही. तो सिडनी जॉन्सन यांच्या खालोखालच्या हुद्द्यावर होता आणि त्याच्या कामाचं स्वरूप असं होतं की त्याचा त्या कागदपत्रांशी रोज संबंध येत असे. इतर कोणालाही त्या कागदपत्रांना हात लावायची परवानगी नव्हती."
"त्या दिवशी संध्याकाळी त्या प्लॅन्स असलेल्या तिजोरीला कुलूप कोणी लावलं?"
"मि. सिडनी जॉन्सन यांनी"
"अर्थात ते प्लॅन्स तिथून कोणी चोरले हे तर उघड आहे कारण ते प्लॅन्स दुय्यम कारकुनाच्या हुद्द्यावर काम करणाऱ्या कडोगन वेस्टच्या मृतदेहाच्या खिशात सापडले . मी म्हणतो ते बरोबर वाटतंय ना?"
"बरोबर वाटतंय, पण तरीही अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतच नाहीत. मुळात त्याने ते कशासाठी चोरले असतील?"
"ते अतिशय मौल्यवान होते. हो ना?"
"त्यांच्या बळावर तो एका दिवसात हजारो पौंड्स अगदी सहज मिळवू शकला असता."
"ती कागदपत्र लंडनला नेण्यामागे ती विकण्याचा उद्देश सोडून इतर कुठलं कारण असू शकेल असं तुला वाटतंय का?"
"नाही."
"मग आपण असं धरून चालू की कडोगन वेस्टनेच ती कागदपत्र चोरली. आता असं करण्यासाठी त्याला हवी होती दुसरी किल्ली."
"किल्ली नाही किल्ल्या. कारण त्याला त्या इमारतीचं कुलूप उघडून तिजोरीपर्यंत पोचायचं होतं."
"ठीक आहे. त्याच्याकडे बऱ्याच किल्ल्या होत्या आणि त्यांच्या मदतीने त्याने ती कागदपत्रं तिजोरीतून बाहेर काढली आणि ती विकण्याच्या उद्देशाने तो ती लंडनला घेऊन गेला. अर्थात त्यांची प्रत काढून मूळ कागदपत्र हरवली आहेत हे कोणाच्या लक्षात येण्याच्या आत सकाळी तो ती परत आणून ठेवणार होता. पण त्याआधीच लंडनमधे त्याचा अंत झाला. "
"पण कसा?"
"आपण असं समजू या की तो वूलविचला परत येत असताना त्याचा खून करण्यात आला आणि त्याला डब्यातून बाहेर फेकण्यात आलं"
"त्याचा मृतदेह अल्डगेटला सापडला. अल्डगेट लंडन ब्रिजच्या बरंच पुढे आहे आणि तो जर वूलविचला परत येत असेल तर त्याला लंडन ब्रिज वरूनच यावं लागेल."
"तो लंडन ब्रिजवरून पुढे का आला याची अनेक कारणं असू शकतात. कदाचित त्या डब्यात असलेला एखादा माणूस आणि तो यांच्यामधे एखाद्या विषयावरून जोरदार चर्चा सुरू असेल. नंतर चर्चेचं रूपांतर भांडणात झालं असेल आणि त्यामुळेच त्याला प्राणाला मुकावं लागलं असेल. कदाचित डब्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात तो खाली पडला असेल आणि त्या दुसऱ्या व्यक्तीने दरवाजा लावून घेतला असेल. त्या दिवशी बाहेर प्रचंड धुकं होतं त्यामुळे अंधारात कोणाला काही कळलं पण नसेल."
"सद्यपरिस्थितीत याहून चांगला तर्क करणं शक्य नाही शेरलॉक. पण जरा विचार कर तू किती मुद्दे तसेच सोडून दिले आहेस. सध्या आपण काही काळासाठी असं मानू की कडोगन वेस्टने ती कागदपत्र लंडनमधे आणून पोचवण्याचं कबूल केलं होतं. मग त्याची आणि त्या परकीय हेराची भेटीची वेळ. ठरलेली असणार आणि तसं असेल तर संध्याकाळचा वेळ त्याने मोकळा ठेवला असता. पण त्याने नाटकाची दोन तिकिटं काढली, आपल्या होणाऱ्या बायकोला घेऊन तो अर्ध्या वाटेपर्यंत गेला आणि अचानक दिसेनासा झाला."
"लोकांची दिशाभूल करण्यासाठी असणार ते..." लेस्ट्रेड ओरडला. आत्तापर्यंतचं सगळं बोलणं तो अधीरेपणाने ऐकत होता.
"एक म्हणजे म्हणजे दिशाभूल करण्याची ही फारच विचित्र पद्धत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी आपण असं समजलो की लंडनला जाऊन तो त्या व्यक्तीला भेटला आणि सकाळी चोरी उघडकीला यायच्या आत ती कागदपत्र परत आणून ठेवणं त्याला भाग आहे. त्यानी दहा पानं नेली होती. त्यातली सातच त्याच्या खिशात सापडली. मग त्या उरलेल्या तीन पानांचं काय झालं? तो ती अशी नुसतीच सोडू शकत नव्हता. शिवाय या व्यवहारात त्याला खूप मोठं घबाड मिळालं असणार. ते कुठे आहे? त्याच्या खिशात तर अशी काही रक्कम सापडली नाही."
"काय झालं असेल हे उघड आहे." लेस्ट्रेड म्हणाला. "तो कागदपत्रं घेऊन लंडनला त्या माणसाला भेटला. त्याला काय मोबदला मिळावा यावरून त्यांच्यात वाद झाला. सौदा न पटल्यामुळे तो परत फिरला. पण त्या हेराने त्याचा पाठलाग करून त्याला ठार मारलं आणि त्या प्लॅनमधली तीन महत्त्वाची पानं घेऊन तो पसार झाला. या तर्काने तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात ना?"
"पण मग त्याच्याकडे तिकीट का नव्हतं?"
"तो ज्या स्टेशनवर गाडीत चढला ते त्या हेराच्या घरापासून सगळ्यात जवळ असणार. म्हणून त्या हेराने ते नष्ट करून टाकलं."
"क्या बात है लेस्ट्रेड! फारच छान! तुझ्या बोलण्यात दम आहे. पण जर तुझं म्हणणं खरं आहे असं मानलं तर आपण अशा बिंदूला येऊन पोहोचतो की जिथून पुढे जायला वाटच नाही. असं बघ, आपला फितूर ठार झाला आहे आणि त्या ब्रूस पार्टिन्ग्टन पाणबुडीच्या प्लॅन्सपैकी महत्त्वाचा भाग यापूर्वीच देशाबाहेर गेलेला आहे. अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो?"
"कृती कर. शेरलॉक, ही कृती करायची वेळ अहे. " मायक्रॉफ्ट ताडकन उठून उभा राहिला. "माझं मन मला सांगतंय की हा तर्क साफ चुकीचा आहे. तुला एक देणगी मिळालेली आहे. तिचा वापर कर. जिथे ही घटना घडली तिथे जा. लोकांशी बोल. तपास कर. एकही गोष्ट सोडू नकोस. एकही शक्यता बाजूला टाकू नकोस. आजवरच्या तुझ्या आयुष्यात तुझ्या देशाला वाचवायची याहून मोठी संधी तुला मिळालेली नाही."
"ठीकाय ठीकाय.." होम्सने खांदे उडवले आणि तो उभा राहिला.
"चल वॉटसन! आणि लेस्ट्रेड तू आम्हाला तास दोन तास वेळ देऊ शकशील का? आपण अल्ड्गेट स्टेशनपासून सुरुवात करू.
बराय मायक्रॉफ्ट, निघतो आम्ही. मी तुला संध्याकाळपर्यंत काय होतंय ते कळवीनच पण फार अपेक्षा ठेवून बसू नकोस..."
तासाभरानंतर मी, लेस्ट्रेड आणि होम्स अल्ड्गेट स्टेशनच्या थोडंसं अलिकडे, बोगद्याच्या तोंडाशी, जिथून भुयारी रेल्वेमार्ग बोगद्यातून बाहेर पडतो तिथे उभे होतो. तिथे एक अतिशय सभ्य, लाल तोंडाचे आजोबा उभे होते. ते रेल्वे कंपनीत कर्मचारी आहेत असं कळलं.
रुळांपासून अंदाजे तीन फूट अंतरावरच्या एका जागेकडे बोट करीत आजोबा म्हणाले " त्या माणसाचं प्रेत या ठिकाणी सापडलं. ते वरून खाली टाकलं असणं शक्य नाही कारण याच्या आजूबाजूला मोकळ्या भिंती आहेत. हे प्रेत गाडीतूनच आलं आणि आपण असा अंदाज बांधू शकतो की सोमवारी मध्यरात्रीच्या गाडीतून ते आलं असणार."
"गाडीचे डबे तपासलेत का? कुठे काही झटापटीची खूण वगैरे मिळाली का?"
"तशा काही खुणा मिळलेल्या नाहीत आणि त्याच्याकडे तिकीटही सापडलेलं नाहीं."
"एखाद्या डब्याचं दार चुकून उघडं राहिलं होतं का?"
"नाही"
"आज सकाळी आम्हाला काही नवीन गोष्टी कळल्या आहेत."लेस्ट्रेड म्हणाला. "सोमवारी रात्री ११:४० च्या साध्या गाडीतून जात असलेल्या एका प्रवाश्याने आज आम्हाला येऊन सांगितलं की अल्ड्गेट स्टेशनच्या जरा आधी त्याने एखादी जड वस्तू जमिनीवर पडल्यावर होईल तसा धप्प आवाज ऐकला. पण धुकं इतकं दाट होतं की त्याला काहीच दिसलं नाही. म्हणून यापूर्वी त्याने याबाबतीत काही सांगितलं नाही. काय झालं मि. होम्स?"
रेल्बेचे रूळ एक बाकदार वळण घेऊन बोगद्यातून बाहेर येत होते. त्या वळणाकडे होम्स एकटक पहात होता. त्याच्या मुद्रेवर उत्सुकतेचं आणि एकाग्रतेचं मिश्रण दिसत होतं. अल्ड्गेट हे एक जंक्शन आहे. त्यामुळे तिथे मोठ्या संख्येने रुळांचे सांधे होते. त्या सांध्यांकडे त्याची नजर रोखली गेली होती. त्याने ओठ आवळले होते. त्याचा संपूर्ण चेहरा अचानक जिवंत वाटायला लागला होता. त्याच्या नाकपुड्या थरथरत होत्या आणि कपळाला त्याच चिरपरिचित आठ्या पडल्या होत्या.
"सांधे! सांधे..." तो स्वतःशीच पुटपुटला.
"त्यांचं काय? काय सुचवायचंय तुम्हाला?"
"माझ्या अंदाजाप्रमाणे या मार्गावर असे सांधे बरेच कमी असतील."
"हो. फार नाहीत."
"शिवाय इथे एक वळणही आहे. सांधे आणि वळण... अरे! असं कसं होऊ शकेल?"
"काय झालं मि. होम्स? तुम्हाला काही क्लू मिळाला का?"
"फक्त कल्पना आहे. तशी सूचक आहे. पण हे मान्य करायलाच हवं की ही केस फारच रोचक होत चालली आहे. अशा प्रकारची ही एकमेव केस असावी. आणि तरीही... का नाही? या रुळांवर कुठे रक्ताच्या खुणा दिसत नाहीयेत."
"तिथे रक्ताचा एकही डाग नाही."
"पण तो आवाज बऱ्यापैकी मोठा होता. खरंय ना?"
"त्याची हाडं मोडली आहेत. पण बाहेरून दिसेल अशी एकही जखम नाही त्याच्या अंगावर. "
"आणि तरीही रक्त वाहिलं असणार. तशी अपेक्षा करणं निश्चितच चुकीचं ठरणार नाही. तो आवाज ऐकणारा माणूस ज्या गाडीत होता त्या गाडीची मला तपासणी करायची आहे. हे जमू शकेल का?"
"नाही. त्या गाडीचे डबे कधीच वेगळे केले गेले आहेत. एव्हाना ते वेगवेगळ्या गाड्यांना जोडले पण गेले असतील."
"मि. होम्स, प्रत्येक डब्याची कसून तपासणी झाली आहे याबद्दल तुम्ही खात्री बाळगा. मी स्वतःच त्यात लक्ष घातलं होतं." लेस्ट्रेड म्हणाला.
माझ्या प्रिय मित्रामधला एक विशेष दोष म्हणजे आणीबाणीच्या वेळी त्याच्यासमोर कोणी मूर्खासारखं वागलं की त्याला स्वतःवर ताबा ठेवणं कठीण जात असे.
"हरकत नाही." तोंड फिरवत तो म्हणाला. "मला डब्यांची तपासणी करायची नव्हती.. वॉटसन, आपलं इथलं काम झालेलं आहे. मि. लेस्ट्रेड आम्ही तुमचा अधिक वेळ घेणार नाही. आता आम्हाला वूलविचला जायला हवं."
लंडन ब्रिजवर पोचल्यावर त्याने त्याच्या भावाला एक तार केली. ती पाठवण्यासाठी तिचा मसुदा लिहिलेला कागद त्याने माझ्याकडे सरकवला. यात असं लिहिलेलं होतं,

' अंधारात एक किरण दिसतो आहे पण तो खोटाही ठरू शकेल. बरं, संध्याकाळी एका माणसाकरवी लंडनमधे असलेल्या आणि तुला माहीत असलेल्या सर्व परकीय गुप्तहेरांची आणि आंतरराष्ट्रीय हेरांची एक यादी नावपत्त्यांसहित बेकर स्ट्रीटवर पाठव आणि त्याला मी येईपर्यंत वाट पहायला सांग.
-- शेरलॉक'

आम्ही वूलविचला जाणाऱ्या गाडीत बसल्यावर तो मला म्हणाला," ही यादी बरीच उपयुक्त ठरणार आहे. एका अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण केसकडे आपलं लक्ष वेधून घेतल्याबद्दल मायक्रॉफ्टदादाचे आभारच मानायला हवेत."
त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि एकाग्रतेचं तेच मिश्रण होतं. तो इतका तयारीत दिसत होता की कुठल्यातरी नवीन आणि मेंदूला खुराक ठरणाऱ्या कल्पनेने त्याला आपली चुणूक दाखवली होती याबद्दल माझी अगदी खात्रीच झाली. एखादा फॉक्सहाऊंड जसा कान पाडून, उगाचच शेपूट इकडेतिकडे नाचवत निवांतपणे बसलेला असताना, अचानक त्याचे डोळे चमकायला लागतात, स्नायू ताणले जातात आणि अखेरीस तो आपल्या छातीइतका उंच असलेला मागही जसा अचूक पकडतो त्याचीच आठवण होम्सकडे पाहताना मला झाली. आज सकाळी धुकंभरल्या खोलीत, आळशीपणे, रडका सूर काढत, करड्या रंगाच्या गाऊनमधे, आरामखुर्चीत लोळणाऱ्या त्या माणासात आणि आत्ताच्या होम्समधे हा एवढा फरक होता.
"या केसमधे दम आहे. चांगलाच दम आहे. आत्तापर्यंत हे माझ्या लक्षात न येण्याइतका मी मूर्ख कसा?"
"मला तर हे सगळं अजूनही तितकंच अगम्य आहे."
"या प्रकरणाचा शेवट काय आहे याबद्दल मीही तुझ्याइतकाच अंधारात आहे पण मला एक धागा मिळाला आहे. जो आपल्या उपयोगी पडू शकतो. त्या माणसाचा मृत्यू दुसरीकडे झाला आणि त्याचं प्रेत त्या डब्याच्या टपावर होतं."
"टपावर?"
"कल्पना सुरेख आहे ना! पण जरा विचार करून बघ. वळण आणि त्यानंतर लगेच आलेला सांधा पार करण्यासाठी गाडी जिथे नागमोडी जाते तिथेच ते प्रेत सापडावं? टपावर ठेवलेली वस्तू याच टप्प्यावर एकदम खाली पडेल ना? सांध्याची वळणं गाडीच्या आत असलेल्या वस्तूंना काही करणार नाहीत. तसं जर नसेल तर हा मोठा विचित्र योगायोग म्हणायला हवा. आता ही गोष्ट लक्षात घे की तिथे एकही रक्ताचा डाग नव्हता. जर ते रक्त आधीच दुसरीकडे वाहून गेलं असेल तर इथे रक्ताचे डाग पडणार नाहीत. या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या तर एक मोठी गोष्ट हाती लागू शकेल."
"आणि तिकिटाचाही उलगडा होईल.." मी ओरडलो.
"अगदी बरोबर. तिकिट नसण्याचं कारण देणं अवघड होतं. पण या तर्काने त्याचंही समाधानकारक उत्तर मिळतंय. "
"पण एवढं सगळं होऊनही त्याच्या मृत्यूमागचं रहस्य सोडवण्याच्या बाबतीत आपण काहीच प्रगती केलेली नाही. हा गुंता सुटायच्या ऐवजी आणखी गुंतत चाललाय."
"शक्य आहे. शक्य आहे..." असं म्हणून तो विचार समाधीत गुंग झाला. ही समाधी आमची मंदगतीने जाणारी गाडी अखेरीस वूलविच स्टेशनमधे उभी राहीपर्यंत कायम राहिली. वूलविचला उतरल्यावर त्याने एका टॅक्सीला हात केला. खिशातून मायक्रॉफ्टने दिलेला कागद बाहेर काढला.

--अदिती

ब्रूस पार्टिंग्टन प्लॅन्स(३)

"या दुपारच्या वेळात आपल्याला काही लोकांना भेटायचं आहे आणि त्यातला पहिला मान आपण सर जेम्स वॉल्टरना द्यायला हवा."
थेम्स नदीच्या अगदी काठावर असलेल्या एका पांढऱ्याशुभ्र आणि सुंदर हिरवळींनी नटलेल्या प्रचंड मोठ्या वाड्यात सर जेम्स यांचं निवासस्थान होतं. आम्ही तिथे पोचलो तोवर धुकं निवळायला लागलं होतं आणि एक जीव नसलेला फिकट सूर्यप्रकाश पसरायला लागला होता. आम्ही घंटा वाजवली. एका बटलरने दार उघडलं.
"सर जेम्स, सर?" दुःखी चेहऱ्याने तो म्हणाला," आज पहाटे सर जेम्स वारले .."
"देवा रे!" होम्सला आश्चर्याचा धक्का बसला. "कसे काय गेले ते?"
"तुम्ही आत येऊन त्यांच्या बंधूंची, कर्नल व्हॅलेंटाईन यांची भेट का घेत नाही?"
"बरोबर आहे. आम्हाला त्यांची भेट घ्यायला हवी."
त्याने आम्हाला एका मंद प्रकाश असलेल्या बैठकीच्या खोलीत नेले. काही क्षणातच आमची आणि कर्नल व्हॅलेंटाईन यांची भेट झाली. ते साधारण पन्नाशीचे, उंच, देखणे होते. त्यांनी लहनशी दाढी राखलेली होती. त्यांचे तारवटलेले डोळे, लालबुंद गाल आणि विस्कटलेले केस यांच्यावरून त्यांच्यावर अचानक केवढा आघात झाला होता याची कल्पना येत होती. त्यांना नीटपणे बोलताही येत नव्हतं.
"हे प्रकरण फारच बदनामीकारक आहे. माझे बंधू सर जेम्स त्यांच्या कीर्तीला अतिशय जपत असत. हा धक्का त्यांना सहन झाला नाही. त्यांना त्यांच्या खात्याच्या कार्यक्षमतेबद्दल अतिशय अभिमान होता. .."
"ही गुंतागुंत सोडवायला त्यांनी आम्हाला मदत केली असती अशी मला फार आशा होती."
"मी सांगतो तुम्हाला... त्यांनाही हे तितकंच अतर्क्य होतं जितकं तुम्हाला आणि मला. त्यांना माहीत असलेल्या सगळ्या गोष्टी त्यांनी यापूर्वीच पोलिसांना सांगितल्या होत्या. त्यांचं असं मत होतं की कडोगन वेस्ट हाच खरा गुन्हेगार आहे. पण याहून जास्त काही तेही सांगू शकले नाहीत."
"तुम्ही या प्रकरणाबाबत अधिक तपशीलाने काही सांगू शकाल का?"
"जे काही माझ्या वाचनात आलंय किंवा कानावर पडलंय ते सोडल्यास मला याबाबतीत काहीही माहीत नाही. आणि मि. होम्स मी तुमच्याशी उद्धटपणाने वागतो आहे असं कृपा करून समजू नका पण सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन तुम्ही ही भेट आवरती घ्याल तर बरं होईल अशी माझी तुम्हाला विनंती आहे."
आम्ही पुन्हा टॅक्सीत बसल्यावर होम्स मला म्हणाला," हा धक्का खरंच अनपेक्षित होता. त्यांना निसर्गतः मृत्यू आला की त्यांनी आत्महत्या केली कोण जाणे. जर त्यांनी आत्महत्या केली असेल तर कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांचं मन त्यांना खाऊ लागलं म्हणून केली असेल का? सध्या तरी हा प्रश्न आपण येणाऱ्या काळावर सोपवू आणि कडोगन वेस्टकडे मोर्चा वळवू."
कडोगन वेस्टचं घर गावाबाहेर, लहानसं पण नीटनेटकं होतं. तिथे त्याच्या वृद्ध आणि शोकमग्न आईची आणि आमची भेट झाली. अचानक कोसळलेल्या या प्रसंगामुळे तिला इतका धक्का बसला होता की ती आम्हाला काहीच सांगू शकली नाही. पण तिला मदत करायला एक फिकट चेहऱ्याची तरूण मुलगी आली होती. तिने आपली ओळख मिस व्हायोलेट वेस्टबरी अशी करून दिली. ती कडोगनची होणारी बायको होती. त्या रात्री त्याला शेवटचं जिवंतपणी तिनेच पाहिलं होतं.
"मि. होम्स, मी तुम्हाला कशाचाच अर्थ सांगू शकणार नाही. त्या रात्रीपासून माझ्या डोळ्याला डोळा लागलेला नाही. या झाल्या प्रकाराचा अर्थ लावण्याचा मी सतत प्रयत्न करते आहे. दिवसरात्र तेवढ्या एकाच विषयाचा भुंगा माझ्या डोक्याला सतत लागलेला आहे. त्याच्याकडे विश्वासाने सोपवलेली कागदपत्रं अशी सौदा करण्यासाठी कोणाच्या हातात देण्यापूर्वी त्याने आपला हात तोडून टाकला असता. हा सगळा प्रकारच निरर्थक आणि अशक्य कोटीतला आहे."
"पण मिस व्हायोलेट, आपल्या हातात असलेल्या पुराव्यांचं काय?"
"खरं आहे. मी ते खोडू शकणार नाही."
"त्याला पैशांची काही अडचण वगरे होती का?"
"नाही. आजिबात नाही. त्याच्या गरजा अगदी साध्या होत्या आणि त्याच्या पगारात त्याचं अगदी छान भागत असे. त्याने काहीशे पौंड्स साठवले होते आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला आम्ही लग्न करणार होतो."
"त्याची कधी मानसिक चलबिचल वगरे झाल्याचं तुमच्या पाहण्यात आलं होतं का? कृपा करून मला खरी खरी माहिती द्या मिस व्हायोलेट..."
माझ्या मित्राची नजर करडी होती. तिच्या वागण्यातला बदल त्याने अचूक टिपला. तिचा चेहरा आरक्त झाला होता आणि ती संभ्रमात पडली होती.
"होय." अखेरीस ती म्हणाली. "त्याच्या मनात काहीतरी होतं असं मलाही वाटलं होतं..."
"कधीपासून?"
"गेला आठवडाभर तो सतत कसल्यातरी विचारात असायचा. मी त्याला त्याबद्दल विचारलं तेंव्हा तो म्हणाला की त्याच्या ऑफिसमधे काहीतरी झालंय. तो म्हणाला होता की इतक्या लौकर मी तुलाही त्याबद्दल काही सांगू शकत नाही. यापेक्षा जास्त काही मला समजू शकलं नाही"
होम्सचा चेहरा चिंताग्रस्त दिसायला लागला.
"पुढे बोला मिस वेस्टबरी, जरी तुम्हाला अशी भिती वाटली की तुम्ही त्याच्याविरुद्ध बोलताय तरीही तुम्ही बोला. आपल्याला माहीत नाही यातून काय निघेल ते.."
"खरं आहे. पण यापेक्षा जास्त सांगण्यासारखं असं माझ्याकडे काही नाही. एक-दोनदा मला असं वाटलं की तो मला ती गोष्ट सांगून टाकायच्या विचारात होता. एक दिवस संध्याकाळी तो मला त्या गुप्त गोष्टीचं महत्त्व सांगत होता. तो असंही म्हणाल्याचं मला आठवतंय की परकीय हेर ती गुप्त गोष्ट मिळवण्यासाठी खूप मोठी रक्कम द्यायला तयार होतील.
होम्सचा चेहरा आणखी गंभीर झाला.
"अजून काही?"
"तो म्हणाला, या बाबतीत आपण बऱ्याच ढिलाईने वागतो आहोत. ज्यामुळे फितुराला त्या प्लॅन्सपर्यंत पोहोचणं फारसं अवघड जाणार नाहीये."
"तो हे म्हणाला ही गोष्ट अलिकडली आहे?"
"हो अगदी अलिकडली"
"आता त्या दिवशी सांध्याकाळी नक्की काय काय झालं ते सांगा."
"त्या दिवशी संध्याकाळी आम्हाला नाटकाला जायचं होतं. धुकं इतकं दाट होतं की टॅक्सीचा काही उपयोग होण्यासारखा नव्हता. आम्ही चालतच निघालो. जाताना आम्ही त्याच्या ऑफिसच्या जवळ आलो. अचानक तो पळत सुटला आणि धुक्यात दिसेनासा झाला."
"काहीही न बोलता?"
"त्याने एक आश्चर्याचा उद्गार काढला पण तेवढाच. मी त्याची वाट बघितली पण तो परत आलाच नाही. मग मी चालत घरी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिस उघडल्यावर ते त्याच्याबद्दल चौकशी करायला आले. बारा वाजता ती भयंकर बातमी आली. मि. होम्स तुम्ही त्याला या बदनामीतून वाचवा हो.. त्याच्या दृष्टीने त्याची प्रतिष्ठा म्हणजे सर्वस्व होतं."
होम्सने दुःखाने मान हववली.
"चल वॉटसन, आपलं लक्ष्य दुसरीकडे आहे. आता आपल्याला ते प्लॅन्स जिथून चोरीला गेले त्या ऑफिसमधे शोध घ्यायला हवा."
"या माणसाची परिस्थिती मुळातच अवघड होती. या माहितीने ती आणखी अवघड करून ठेवली आहे." टॅक्सी सुरू झाल्यावर तो म्हणाला."त्याचं लग्न जवळ आलं होतं. त्याला पैशांची गरज तर असणारच. त्यामुळे ही गोष्ट गुन्हा करण्यामागचा उद्देश ठरते. ज्या अर्थी तो याबद्दल त्याच्या होणाऱ्या बायकोशी बोलला त्या अर्थी ही कल्पना त्याच्या डोक्यात होती. आणि तिला तो यात सहय्यक म्हणूनही घेणार असेल. ही गोष्ट खूप वाईट आहे."
"पण होम्स, चारित्र्य म्हणून काही गोष्ट असते ना? आणि शिवाय त्या मुलीला रस्त्यात तसंच सोडून एकाएकी तो चोरी करायला का पळाला?"
"बरोबर बोललास. या तर्काला अपवाद आहेतच पण त्यांची समाधानकारक उत्तरं मिळण्यासाठी लोकविलक्षण परिस्थिती गृहित धरावी लागते."
मि. सिडनी जोन्स त्यांच्या ऑफिसमधेच होते. माझ्या मित्राच्या लौकिकाला साजेशा अदबीने त्यांनी आमचं स्वागत केलं. ते बारकुडे होते आणि त्यांना चष्मा होता. ते मध्यमवयीन दिसत होते. त्यांचे गाल खोल गेले होते. त्यांचे हात थरथरत होते आणि त्यावरून त्यांच्यावर पडलेला जबरदस्त मानसिक ताण सहज कळून येत होता.
"हे सगळं फार वाईट आहे मि. होम्स. फार वाईट. तुम्हाला साहेबांच्या मृत्यूबद्दल समजलंच असेल ना?"
"आम्ही आत्ता तिथूनच येत आहोत."
"इथे सगळा गोंधळ झालाय. साहेब या जगात नाहीत. कडोगन वेस्ट मरण पावलाय.आमचे कागद चोरीला गेलेत. सोमवारी संध्याकाळी मी जेंव्हा ऑफिसला कुलूप लावलं तेंव्हा कोणत्याही सरकारी ऑफिसइतकंच हे ऑफिसही कार्यक्षम आणि कार्यरत होतं. आणि कडोगन वेस्टने असं काही करावं हे तर धक्कादायक आहे.... "
"एकूणात तोच खरा गुन्हेगार आहे याबद्दल तुमची खात्री आहे तर"
"मला तरी दुसरी काही शक्यता दिसत नाही. आणि तरीही या प्रकरणात माझा माझ्या स्वतःइतकाच त्याच्यावर विश्वास होता. "
"सोमवारी ऑफिस किती वाजता बंद झालं?"
"पाच वाजता"
"तुम्ही स्वतः ऑफिस बंद केलंत?"
"मी नेहमीच सगळ्यात शेवटी बाहेर पडतो."
"त्या वेळी ते प्लॅन्स कुठे होते?"
"तिजोरीत. मी स्वतःच ते तिथे ठेवले होते."
"या इमारतीला कोणी गुरखा आहे का?"
"आहे पण त्याला इतर विभागांकडेही लक्ष ठेवावं लागतं. तो एक माजी सैनिक आहे आणि अत्यंत विश्वासार्ह आहे. त्याला त्या संध्याकाळी वेगळं असं काहीच दिसलं नाही. अर्थात धुकंही खूप होतं म्हणा.."
"समजा ऑफिस सुटल्यानंतर कडोगन वेस्टला आत यायचं असतं तर त्या कागदांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला एकूण तीन किल्ल्यांची गरज पडली असती. बरोबर?"
"हो. एक बाहेरच्या दरवाज्याची, एक ऑफिसची आणि एक तिजोरीची"
"फक्त सर जेम्स वॉल्टर आणि तुम्ही , तुम्हा दोघांकडेच त्या किल्ल्या होत्या ना?"
"माझ्याकडे दोन्हीही दरवाज्यांच्या किल्ल्या नव्हत्या. फक्त तिजोरीच्या किल्ल्या होत्या."
"सर जेम्स यांचं वागणं नियमित होतं का?"
"हो असणार. माझ्या माहितीप्रमाणे त्या किल्ल्या ते नेहमीच एकत्र एकाच रिंगला अडकवून ठेवत असत. मी ती रिंग अनेकदा पाहिली आहे."
"आणि ती रिंग घेऊन ते लंडनला गेले होते?"
"ते तसं म्हणाले खरे."
"आणि तुमच्याजवळ असलेली किल्ली कायम तुमच्याकडेच होती?"
"हो."
"याचा अर्थ जर वेस्ट गुन्हेगार असेल तर त्याच्याकडे डुप्लिकेट किल्ल्या असणार. आणि तरीही त्याच्या मृतदेहाजवळ त्यातली एकही किल्ली सापडली नाही.अजून एक विचार करण्याजोगा मुद्दा म्हणजे जर या ऑफिसमधल्या एखाद्या कारकुनाला ते कागद विकायचे असते तर मूळ कागद विकायला नेण्याऐवजी, नेहमीच्या पद्धतीप्रमाणॆ इथेच त्यांची एक प्रत करून ती बाहेर नेणं जास्त सयुक्तिक ठरलं नसतं का?"
"त्यांची हुबेहूब प्रत काढायला खूपच सखोल तांत्रिक ज्ञानाची गरज आहे."
"पण सर जेम्स काय ,तुम्ही काय किंवा कडोगन वेस्ट काय तुमच्याकडे ते ज्ञान होतं."
"आमच्याकडे ते ज्ञान होतं यात काहीच शंका नाही. पण मि. होम्स कृपा करून मला याच्यात अडकवू नका. जर ते कागद कडोगन वेस्टकडे सापडले होते तर माझं नाव यात ओढण्यात काय हशील आहे?"
"हम्म. जर त्याला मूळ प्लॅन्स नेण्याऐवजी त्यांची प्रत करून ती नेता येणं शक्य होतं, आणि त्याने त्याचं कामही भागणार होतं तर त्याने मूळ कागदपत्रं नेऊन फारच मोठा धोका पत्करला असं म्हणायला हवं. आणि ही गोष्ट विशेष आहे"
"विशेष तर खरीच. पण त्याने ती केली."
"या प्रकरणाच्या जितक्या खोलात शिरावं तितक्या जास्त अतर्क्य गोष्टी पुढे येतायत. ती हरवलेली तीन पानं खूप महत्त्वाची होती ना?"
"हो."
"तुम्हाला असं म्हणायचंय का की फक्त त्या तीन पानांच्या आधाराने, बाकीची सात पानं हातात नसतानाही बूस पार्टिंग्टन पाणबुडी तयार करता येऊ शकेल?"
"मी ऍडमिरल ऑफिसमधे तसं कळवलं होतं. पण आज जेंव्हा मी ते नकाशे परत एकदा तपासून पाहिले तेंव्हा माझं मत बरंच डळमळीत झालं आहे. जे कागद परत आले त्यात पाणबुडीचा सेल्फ ऍडजस्टिंग स्लॉटचा डबल व्हाल्व्ह काढलेला आहे. त्याच्याशिवाय ती पाणबुडी तयार करणं शक्य नाही. पण ते लोक लौकरच त्या अडचणीवर मात करू शकतील."
"पण ते तीन हरवलेले नकाशे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत."
"प्रश्नच नाही."
"हम्म मला तुम्हाला इतर काही विचारायचं नाहीये. आता तुमची परवानगी असेल तर मी इथल्या आवारात एक फेरी मारून येईन म्हणतो."
त्याने काळजीपूर्वक तिजोरीच्या कुलुपाची तपासणी केली. नंतर त्याने दरवाज्याची पाहणी केली आणि सगळ्यात शेवटी खिडकीचं लोखंडी जाळीचं सरकतं दार नीट तपासून पाहिलं. जेंव्हा आम्ही बाहेरच्या हिरवळीवर गेलो तेंव्हा मात्र त्याची उत्सुकता बरीच जागृत झाली होती. खिडकीच्या बाहेरच्या बाजूला अगदी खेटून एक लॉरेलचं झाड होतं. त्याच्या बऱ्याचश्या फांद्या अलिकडेच कोणीतरी ओढल्या असाव्यात किंवा वाकवल्या असाव्यात तशा दिसत होत्या. त्याने त्या फांद्यांची एका मोठ्या भिंगातून बारकाईने तपासणी केली. नंतर जमिनीवरच्या काही विचित्र खुणांचीही तपासणी केली. नंतर त्याने मि. जोन्सना ती खिडकी लावून घ्यायला सांगितली आणि मला दाखवलं की ती जाळीची सरकती दारं साधारण मध्यावर एकमेकांमधे नीट बसत नव्हती. त्या भोकातून कोणालाही आत काय चाललंय हे व्यवस्थित बघता आलं असतं.
" या खुणा तीन दिवसांपूर्वीच्या आहेत त्यामुळे कितपत उपयोगी पडू शकतील याबद्दल शंकाच आहे. चल वॉटसन, वूलविचमधून आणखी मदत होणार नाही. लंडनमधे काय सापडतंय ते पाहू या. इथून काही गोष्टी मात्र नक्कीच सापडल्यात."
पण वूलविच स्टेशनवर आम्हाला अजून एक गोष्ट सापडली. तिथल्या तिकीट खिडकीतल्या कारकुनाने आम्हला सांगितलं की त्याने कडोगन वेस्टला सोमवारी रात्री वूलविच स्टेशनवर पाहिलं होतं. तो कडोगन वेस्टला चेहऱ्याने ओळखत होता. कडोगन वेस्टने रात्री ८:१५ च्या गाडीचं लंडन ब्रिजपर्यंतचं तिकीट काढलं होतं. त्याच्याबरोबर कोणीही नव्हतं. त्याने एकवेळचं तिसऱ्या वर्गाचं तिकीट काढलं होतं. कडोगन वेस्टच्या अति उत्तेजित वागण्यामुळे त्या कारकुनाला तो प्रसंग चांगलाच लक्षात होता. कडोगन वेस्टचे हात इतके थरथरत होते की त्याला सुटे पैसे नीट उचलताही येत नव्हते म्हणून त्या कारकुनाने ते उचलून दिले होते. रेल्वेच्या वेळापत्रकावरून हेही स्पष्ट झालं की साडेसात वाजता मैत्रीणीला सोडून अदृश्य झालेल्या कडोगनला मिळू शकणारी पहिलीच गाडी म्हणजे ही ८:१५ ची गाडी होती.
अर्धा तास शांतपणे बसून राहिल्यानंतर होम्स मला म्हणाला,"वॉटसन, काय झालं असेल हे आपण क्रमवार पाहू. आपण दोघांनी मिळून जितक्या केसेसवर काम केलंय त्यात समजून घ्यायला याच्याइतकी अवघड केस दुसरी नसेल. पुढे येणारा प्रत्येक नवीन पुरावा आणखी आणखी बुचकळ्यात टाकणारा आहे. तरीही आपण खात्रीने थोडीशी प्रगती केली आहे.
"आपण वूलविचमधे जी चौकशी केली त्यानंतर बऱ्याच गोष्टी कडोगन वेस्टच्या विरुद्ध जात होत्या. पण त्या जाळीच्या दरवाज्याने काही गोष्टी त्याच्या बाजूनेही दाखवायला सुरुवात केली आहे.
आपण असं धरून चालू की कुठल्यातरी परकीय हेराने त्याच्याशी संपर्क साधला होता. त्याला गुप्ततेची शपथ घ्यायला लावली गेली असेल आणि त्यामुळे याबद्दल तो कुठेही बोलू शकला नसेल पण त्याच्या मनात नक्की खळबळ माजली असणार कारण तो त्याच्या होणाऱ्या बायकोजवळ तसं बोलला होता. हम्म हे ठीक आहे. आता आपण असं समजू या की त्या दिवशी संध्याकाळी त्या मुलीबरोबर तो नाटकाला जायला निघाला होता. अचानक त्याला काय दिसलं? दाट धुक्यात त्याला तोच हेर त्याच्या ऑफिसच्या दिशेने जाताना दिसला. तो गरम डोक्याचा माणूस होता आणि चटकन निर्णय घेणारा होता. त्याच्यातल्या कर्तव्यभावनेने उचल खाल्ली. त्याने त्या माणसाचा पाठलाग केला, खिडकीपाशी आला, खिडकीतून कागदपत्रांची चोरी होताना पाहिली. आणि त्या चोराचा माग धरला. असं मानलं तर एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. ते हे की तो जर प्रती तयार करू शकत होता तर कोणालाही मूळ कागदपत्रांना हात लावायची गरज नव्हती. पण त्या हेराला मूळ प्रतीच हव्या होत्या. इथवर तर सगळं जुळतं."
"आता पुढची पायरी कुठली?"
"आता आपल्या अडचणींना सुरुवात होते.अशा परिस्थितीत कडोगन वेस्टने त्या चोराला पकडून अधिकाऱ्यांना सावध करायला हवं होतं. मग त्याने असं का बरं केलं नाही? कागदपत्रं चोरणारा त्याचा कोणी वरिष्ठ तर नसेल? तसं असेल तर वेस्टच्या वागणुकीचा अर्थ लागू शकतो. किंवा त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने धुक्यचा फायदा घेऊन वेस्टला गुंगारा दिला असेल. आणि म्हणून वेस्टने त्याच्या घरीच त्याला पकडायचं या उद्देशाने सरळ लंडनचा रस्ता धरला असेल. अर्थात त्या अधिकाऱ्याचं घर वेस्टला माहीत असेल असं धरून चालायला हवं. पण ती वेळ मोठी आणीबाणीची असणार कारण त्याने आपल्या होणाऱ्या बायकोला धुक्यात एकटीला सोडून दिलं आणि नंतरही तिच्याशी संपर्क साधायचा काहीच प्रयत्न केला नाही. पण आपलं कल्पनाचित्र इथे थांबतं. या घटनेपासून ते प्लॅनची सात पानं खिशात असलेला त्याचा मृतदेह एका भुयारी रेल्वेगाडीच्या टपावर येऊन पडेपर्यंतच्या काळात काय झालं असेल याबद्दल अनेक तर्क आणि शंकाच फक्त हाती राहतात. . मला वाटतं आता आपण दुसऱ्या टोकाकडून कामाला सुरुवात करावी. जर मायक्रॉफ्टने ती यादी पाठवली असेल तर आपल्याला आपला संशयित माणूस शोधून काढणं सोपं जाईल आणि मग एका मार्गाऐवजी आपण एकदम दोन मार्गांवरून जाऊ."

--अदिती

ब्रूस पार्टिंग्टन प्लॅन्स(४)


अपेक्षेप्रमाणे बेकर स्ट्रीटवरच्या घरात एक सरकारी शिपाई एक चिठ्ठी घेऊन आमची वाट पहात होता. होम्सने त्यावरून नजर फिरवली आणि तो कागद माझ्याकडे दिला.

'सध्या चिलटांची संख्या तशी भरपूर आहे पण इतकं मोठं प्रकरण हाताळू शकणारे मोठे किडे त्या मानाने थोडे आहेत. यातले सध्या विचारात घेण्याजोगे लोक म्हणजे

ऍडॉल्फ मेयर : १३ ग्रेट जॉर्ज स्ट्रीट, वेस्टमिन्स्टर,
लुईस ल रोथिअर : कॅंपडेन मॅन्शन, नॉटिंग हिल आणि
ह्यूगो ऑबरस्टिन : १३ कोल्फिल्ड गार्डन्स, केंझिंग्टन.
यातला ह्यूगो सोमवारी शहरातच होता आणि आता देशाबाहेर आहे अशी खबर आहे. तुला आशेचा काही किरण दिसतो आहे हे ऐकून आनंद झाला. तुझ्या रिपोर्टची वाट सगळं मंत्रीमंडळ बघतंय. वरपासून लोकांचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत. तुला गरज पडली तर देशातली सगळी संरक्षक फळी तुझ्या पाठीशी उभी रहायला सज्ज आहे.
--मायक्रॉफ्ट.'


"दुर्दैवाने राणीचे सगळे घोडे आणि राणीचे सगळे सैनिक सुद्धा मला मदत करू शकणार नाहीत." हम्प्टी डम्प्टी कवितेतली ती प्रसिद्ध ओळ उद्धृत करत तो म्हणाला. त्याने लंडन शहराचा नकाशा टेबलावर पसरला आणि त्याच्यावर ओणव्याने वाकून तो उभा राहिला.

"वा. क्या बात है!" समाधानाचा एक सुस्कारा सोडत तो म्हणाला. "परिस्थिती एकदाची आपल्या दिशेने वळायला लागलेली आहे. वॉटसन, बहुतेक आपण योग्य ते सूत्र पकडून ते ओढू शकू. "
अचानक हर्षवायूचा झटका आल्यासारखं हसत माझ्या पाठीवर त्याने एक जोराची थाप मारली.
"मी जरा बाहेर जाऊन येतो. घाबरू नकोस तुला घेतल्याशिवाय मी कुठलंही काम करणार नाही. शेवटी तू माझा सगळ्यात जवळचा मित्र आणि चरित्रकार आहेस. मला यायला तासाभरापेक्षा जास्त वेळ लागला तर तुझी वही उघड आणि तू देशाला कसं वाचवलंस ते लिहून काढायला सुरुवात कर. तवर मी येतोच..."
या त्याच्या उत्साहाचा परिणाम माझ्यावर झाल्यावाचून कसा राहील? एरवीच्या गंभीर होम्सकडे बघता त्याच्यात झालेला एवढा बदल हे खरंच कुठल्यातरी चांगल्या गोष्टीचं लक्षण होतं. नोव्हेंबर महिन्यातली ती संध्याकाळ इतकी कंटाळवाणी आणि न संपणारी होती तरीही मी अतिशय उत्सुकतेने त्याची वाट पहात होतो. शेवटी नऊ वाजता एक माणूस त्याचा निरोप घेऊन आला. त्यात असं लिहिलं होतं:

'मी गोल्डिनि रेस्टॉरन्ट, ग्लुसेस्टर रोड, केन्झिन्गटन इथे जेवायला तुझी वाट पाहातो आहे. तू लौकरात लौकर इकडे ये. आंणि येताना एक जेमी, एक कंदील, एक चिझेल आणि एक रिव्हॉल्व्हर घेऊन ये.

एस. एच.'

बाहेर साठलेलं धुकं आणि विचित्र अंधारी हवा यामुळे एखादा सभ्य निरुपद्रवी माणूस जर या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन गेला तर त्यात कोणालाच काही वावगं वाटलं नसतं. मी काळजीपूर्वक माझ्या ओव्हरकोटाच्या आतल्या खिशांमधे या वस्तू ठेवल्या आणि सरळ सांगितलेल्या ठिकाणाची वाट धरली. तिथे एका जुनाट इटालिअयन रेस्टॉरंटमधे दाराजवळच एका लहान गोल टेबलापाशी माझा मित्र माझी वाटच पहात बसला होता.

"तुझं खाणं झालंय म्हणतोस? मग आपण कॉफी घेऊ. इथल्या सिगार्स चांगल्या आहेत. कमी विषारी. बरं तू हत्यारं आणलीयेस ना?"
"ही काय. माझ्या ओव्हरकोटाच्या खिशात"
"छान. आता मी तुला आत्तापर्यंत मी काय काय केलंय आणि यापुढे काय करायचंय हे सांगतो.
वॉटसन, तुला मी मागेच म्हणालो होतो की कडोगन वेस्टचा मृतदेह गाडीच्या टपावरून खाली पडला. ज्या क्षणी ही गोष्ट माझ्या लक्षात आली की तो मृतदेह गाडीतून नव्हे तर टपावरून खाली पडला होता त्याच क्षणी हेही माझ्या लक्षात आलं की तो तिथे ठेवण्यात आला होता."
"तो पुलावरून खाली टाकला गेलेला असू शकतो का?"
"नाही. तशी शक्यता आजिबात नाही. तू जर एखाद्या डब्याचं टप नीट पाहिलंस तर तुझ्या असं लक्षात येईल की ते किंचित वर्तुळाकार आहे आणि त्याच्या आजूबाजूल रेलिंगसारखं काही नाही. त्यामुळे आपण असं खात्रीपूर्वक म्हणू शकतो की तो मृतदेह तिथे ठेवण्यात आला होता."
"पण कसा?"
"याच प्रश्नाचं उत्तर मला शोधायचं होतं. तुला माहीतच आहे की भुयारी रेल्वेमार्गावर वेस्ट एन्डजवळच्या काही भागात बोगदा नाहीये. या मार्गाने प्रवास करत असताना गाडीच्या टपाला वरच्या बाजूने जवळजवळ लागूनच काही खिडक्या पाहिल्याचं मला अंधुकसं आठवत होतं. आता अशी कल्पना कर की अशा एखाद्या खिडकीच्या खाली गाडी उभी असताना, तो मृतदेह टपावर ठेवणं हे कितपत अवघड जाईल?"
"पण हे किती अतर्क्य वाटतं आहे..."
"वॉटसन, जेंव्हा आपल्याकडे असलेल्या सर्व शक्यता संपतात तेंव्हा मागे राहिलेला पर्याय कितीही अशक्य कोटीतला वाटला तरीही तोच खरा असला पाहिजे हे तुला माहीत आहे. इथे आपल्याकडच्या सगळ्या शक्यता संपल्या आहेत. आपल्या प्रमुख संशयित हेरांपैकी एक, जो नुकताच लंडन शहराबाहेर गेला आहे तो भुयारी मार्गालगतच्या एका वसाहतीतच रहात होता हे मला कळल्यावर मला किती हर्षवायू झाला होता हे पाहून तू आश्चर्यचकित झालास. "
"अच्छा. असा प्रकार होता तर तो..."
"होय. १३ कॉलफिल्ड रोड इथे राहणारा ह्युगो ऑबर्स्टिन हा माझ्या हालचालींचं केंद्र बनला. मी ग्लुसेस्टर रोड स्टेशनवर येऊन माझ्या कामाला सुरुवात केली. स्टेशनवरच्या एका अतिशय तत्पर अधिकाऱ्याने माझ्या बरोबर येऊन कॉलफिल्ड गार्डन्स वसाहतीतल्या घरांच्या मागच्या बाजूच्या खिडक्या मला प्रत्यक्ष दाखवल्या. एवढंच नाही तर, त्यापुढे जाऊन त्याने मला एक मोलाची बातमी दिली, ती अशी की भुयारी मार्ग आणि साधा रेल्वेमार्ग हे एकमेकांना छेदून जात असल्यामुळे त्याच विवक्षित ठिकाणी भुयारी गाड्या बरेचदा बराच वेळ तिथे उभ्या असतात."
"अ प्र ति म! होम्स तू बाजी मारलीस की!"
"इथपर्यंत ठीक आहे वॉटसन. आपण प्रगती करतोय. पण आपलं ध्येय अजून खूप लांब आहे. असो. तर कॉलफिल्ड गार्डन्सच्या मागच्या भागाची पाहणी करून झाल्यावर मी पुढूनही जाऊन या गोष्टीची खातरजमा केली की आपलं पाखरू घरट्यात नाही. ते घर तसं वैशिष्ट्यपूर्ण आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे तिथलं फर्निचर फक्त घराच्या वरच्या मजल्यावर ठेवलेलं आहे. ऑबरस्टिन त्याच्या एकाच हरकाम्या नोकराबरोबर तिथे रहात होता. बहुधा हा नोकर त्याचाच विश्वासू हस्तक असेल. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की ऑबरस्टिन त्याचं डबोलं पोचवण्यासाठी देशाबाहेर गेलेला आहे. पण त्याला अटक होईल अशी साधी शंकाही त्याच्या मनात नसणार. त्याच्या घरी एखादी लहानशी घरफोडी घडून येईल असं त्याला स्वप्नातही वाटलं नसेल....
आत्ता आपण तेच करणार आहोत!"
"आपण एखादं वॉरंट मिळवून कायदेशीर झडती घेऊ शकणार नाही का?"
"आपल्याकडे काहीच पुरावा नाही."
"नक्की काय करायचंय आपल्याला?"
"तिथे संपर्काची कुठली माध्यमं असू शकतील आपल्याला माहीत नाही..."
"होम्स मला हे पसंत नाही..."
"अरे बाबा, तू फक्त रस्त्यावर उभं राहून नजर ठेवायचीस. घरफोडीचं काम मी करणार आहे. ही वेळ नैतिक गोष्टींबद्दल विचार करत बसण्याची नाही. मायक्रॉफ्ट, कॅबिनेट, नौदलाचं ऑफिस आणि इतर कितीतरी लोक आपल्याकडे आशेने डोळे लावून बसले आहेत. आपल्याला गेलंच पाहिजे."
यावर उत्तरादाखल मी खुर्चीतून उठून उभा राहिलो.
"खरंय तुझं म्हणणं होम्स. आपल्याला गेलंच पाहिजे..."
तो एकदम उठून उभा राहिला. त्याने माझा हात हातात घेतला.
"वॉटसन,मला माहीत होतं तू या गोष्टीला नक्की तयार होशील." एक क्षणभर त्याच्या डोळ्यात त्याच्या स्नेहार्द्र मनाचं प्रतिबिंब थरथरताना मला दिसलं. आजवर मला मिळालेली त्याच्या स्नेहाची ही सगळ्यात मोठी पावती होती. पण क्षणभरातच त्याच्यातला तो कार्यशील माणूस पुन्हा जागा झालेला मला दिसला.
"ते ठिकाण इथून अर्ध्या मैलावर आहे. पण घाई करण्यासारखं काही नाहीये. आपण चालतच जाऊ. चुकूनसुद्धा हत्यारं खाली पडू देऊ नकोस. आत्ता या वेळी संशयास्पद परिस्थितीमधे तुला जर अटक झाली तर भलतीच आफत ओढवेल..."
कॉल्फिल्ड गार्डन्स म्हणजे लंडनच्या वेस्ट एन्ड भागातल्या मध्य विक्टोरियन युगाचं ठळक प्रतीक असणाऱ्या मोठे मोठे खांब असलेल्या वैषिष्ट्यपूर्ण वास्तुशैलीतल्या घरांच्या ओळीतली आणि परिसराला शोभेश्या सर्व वस्तुवैशिष्ट्यांनी नटलेली एक इमारत होती.त्याच्या शेजारच्या घरातून मुलांच्या हसण्या खिदळण्याचे आणि पियानोवर वाजवल्या जाणाऱ्या संगीताचे आवाज येत होते. तिथे बहुधा एखादी लहान मुलांची पार्टी चाललेली असावी.धुकं अजूनही रेंगाळत होतं. त्याच्या पडद्यातून होम्सने आपल्या हातातला कंदील त्या घराच्या प्रचंड दरवाज्यावर उजेड पडेल असा धरला.
"हम्म ही जरा अडचणीची गोष्ट आहे. या दाराला कुलूप लावलेलं आहे आणि कड्याही घातलेल्या आहेत. मला वाटतं, आपल्याला एरियामधे*२ जावं लागेल. शिवाय एखाद्या अतिउत्साही हवालदाराने आपल्या कामात अडथळा आणू नये म्हणून खाली जायला एक छान बंदिस्त वाट आहे तिथे आपल्याला लपता येईल. चल मला खाली जायला मदत कर आणि मी तुला खाली ओढून घेतो.
मिनिटभरातच आम्ही एरियामधे होतो आणि तेंव्हाच एका पोलीस हवालदाराच्या पावलांचा आवाज आमच्या डोक्यावरून दूर गेला.होम्सने खालच्या दाराचे स्क्रू काढायला सुरुवात केली त्याला बरीच ताकद लावायला लागत होती पण अखेरीस एक जोरदार आवाज करत ते उघडलं गेलं. आम्ही आत गेलो आणि ते दार आतून लावून घेतलं. होम्सने हातात धरलेल्या कंदिलाच्या प्रकाशात आम्ही एका गोल जिन्यावरून वर जायला सुरुवात केली. कंदिलाच्या प्रकाशात आम्हाला एक जमिनीलगतची खिडकी दिसली.
"ही बघ वॉटसन, हीच ती खिडकी असणार..." त्याने ती खिडकी उघडली आणि त्याच क्षणी बाहेरून एक हलकासा आवाज यायला लागला आणि काही क्षणातच कानठळ्या बसतील इतका वाढला. धडधड आवाज करत एक भुयारी गाडी अंधारातच आमच्या समोरून निघून गेली. होम्सने खिडकीच्या तावदानावर प्रकाश पडेल अशा बेताने कंदील पुढे नेला. ते तावदान गाड्यांच्या चिमण्यांमधून उडणाऱ्या धुराच्या काजळीने भरलं होतं पण त्या काळ्या पृष्ठभागावर मधून मधून काजळी पुसली गेल्याच्या खुणा होत्या.
"त्यांनी ते प्रेत कुठे ठेवलं होतं त्याच्या खुणा दिसतायत बघ... अरेच्या! हे बघ काय आहे.खात्रीने हा रक्ताचा डाग आहे. " खिडकीच्या लाकडी चौकटीला पडलेल्या एका फिक्या डागाकडे त्याने निर्देश केला. "आणि जिन्याच्या दगडावरही डाग आहे ! आपली तपासणी झाली. आपण एखादी ट्रेन इथे थांबेपर्यंत वाट पाहू या.."
आम्हाला फार वेळ वाट पहावी लागली नाही. पुढचीच गाडी रोरावत बोगद्यातून बाहेर आली पण तिचा वेग कमी कमी झाला आणि आमच्या समोरच ती थांबली. खिडकीची चौकट आणि गाडीचं टप यांच्यात चार फुटाचंदेखील अंतर नव्हतं. होम्सने हळूच ती खिडकी बंद केली.
"आत्तापर्यंतच्या गोष्टी तर सगळ्या पटण्याजोग्या दिसताहेत. वॉटसन, तुझं काय म्हणणं आहे यावर?"
"बिनतोड! ही तुझी आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे! "
"नाही मला तुझं म्हणणं मान्य नाही. मृतदेह गाडीच्या टपावरून खाली पडला असावा ही शक्यता माझ्या लक्षात येणं ही काही फार मोठी गोष्ट नव्हती आणि ज्या क्षणी ती माझ्या डोक्यात आली त्या क्षणापासून हे पुढचं सगळं अपरिहार्यच होतं. जर हे प्रकरण इतकं गंभीर नसतं तर आपला इथवरचा प्रवास फारच क्षुल्लक ठरला असता. आपले प्रश्न अजून संपलेले नाहीत पण आपल्याला इथे काहीतरी महत्त्वाची वस्तू सापडेल अशी शक्यता आहे."
स्वयंपाकघराकडे जाणारा जिना चढून आम्ही पहिल्या मजल्यावरच्या खोल्यांजवळ आलो.एका खोलीत जेवणघर होतं. फारच वाईट पद्धतीने दुर्लक्षित आणि महत्त्वाचं असं काहीच नसणारं. मग एक झोपयची खोली होती पण तीही रिकामी होती. उरलेली एकमेव खोली मात्र बरीच उपकारक ठरली. होम्सने तिची काळजीपूर्वक आणि तपशीलवारपणे तपासणी केली. तिचा उपयोग स्टडी म्हणून केला जात असणार कारण जिकडेतिकडे पुस्तकं आणि कागद पसरलेले होते. पद्धतशीरपणे तरीही भराभर होम्सने सगळे ड्रॉवर्स आणि कपाटं मोकळी केली पण त्यात महत्त्वाचं असं काही सापडलं नाही. त्याच्या गंभीर चेहऱ्यावरचं चिंतेचं सावट हटलं नाही. एक तासानंतरही तो तसाच चिंतित दिसत होता.
"त्याने त्याचा माग पुसून टाकलाय. त्याला अडचणीत आणू शकणारा पत्रव्यवहार नष्ट केलाय. ही आपली शेवटची संधी होती."
लिहिण्याच्या टेबलावर एक पत्र्याची पैशांची पेटी होती. आपल्या कानशीच्या मदतीने होम्सने ती उघडली. आत अनेक कागदपत्रांच्या सुरनळ्या होत्या. त्यांच्यावर चित्रविचित्र संख्या, हिशेब अणि आकडेमोडी होत्या पण हे सगळं कशासंदर्भात होतं हे कळायला काहीच मार्ग नव्हता. पण जिथे तिथे दिसणाऱ्या 'पाण्याचा दाब' आणि 'प्रति चौरस इंच दाब' या शब्दांवरून असं वाटत होतं की त्यांचा पाणबुडीशी काहीतरी संबंध असावा. होम्सने वैतागाने ते कागद बाजूला सारले. त्यांच्या खाली फक्त एका पाकिटात काही जाहिराती कापून ठेवलेल्या होत्या. होम्सने ती सगळी कात्रणं बाहेर काढून समोर पसरली. त्याच्या चेहऱ्यावर प्रकटलेली उत्सुकता पाहून त्याला काहीतरी मिळालंय हे मी ओळखलं.
"वॉटसन, हे काय असेल? हा? याच्या टाईपावरून आणि आकारावरून असं वाटतंय की डेली टेलिग्राफ वर्तमानपत्राच्या ऍगनी कॉलमची कात्रणं असावीत ही.पानाचा उजव्या हाताचा वरचा कोपरा. तारखा नाहीयेत. पण हे संदेश ओळीनेच ठेवलेले दिसताहेत. हा बघ. हा पहिला असणार "

अटी मान्य आहेत. पत्राची वाट पाहतोय, लौकर कळवा. कार्डावर दिलेल्या पत्त्यावर सविस्तर लिहा.

पिएरॉट


पुढचा संदेश


वर्णन करून सांगणे अवघड आहे. सखोल रिपोर्ट हवा आहे. मोबदला तयार आहे वस्तू पोचवल्यात की मिळेल.

पिएरॉट


मग हा -


घाई करा. अटी पूर्ण झाल्या नाहीत तर ठरलेला मोबदला रद्द करावा लागेल. पत्र पाठवून अपॉईंटमेंट घ्या. मी जाहिरातीद्वारे कळवीन

पिएरॉट


आणि शेवटचा संदेश -


सोमवारी रात्री नऊ नंतर. दोनदा थाप ही खूण. संशयास्पद असं काही वागू नका. वस्तू मिळताच रोख मोबदला

पिएरॉट


"वा! चांगलीच आहे नोंद. परिपूर्ण! जर आपल्याला या दुसऱ्या बाजूकडल्या माणसाला गाठता आलं तर किती बरं होईल" टेबलाच्या पृष्ठभागावर आपली बोटं नाचवीत तो काही वेळ विचारमग्न बसूनच राहिला. शेवटी तो उठला.

"कदाचित ही गोष्ट तितकी अवघड जाऊ नये... चल वॉटसन, आपलं इथलं काम संपलं आहे. आता आपण डेली टेलिग्राफच्या ऑफिसमधे जाऊ आणि तिथून सरळ घरी जाऊ. आजचा दिवस बराच चांगला गेला आहे.."

--अदिती
(तळटीप २ : एरिया म्हणजे काय याचा गूगलवर शोध घेतल्यावर बांधकामाच्या परिभाषेत 'एरिया म्हणजे तळघरातल्या खोल्यांमधे हवा-उजेड पोचण्यासाठी घराभोवती असलेला मोकळा खंदकासारखा भाग' अशी माहिती मिळाली.(an excavated area around the walls of a building, designed to admit light into its basement )
त्यापुढे जाऊन शोध घेतल्यावर जी माहिती मिळाली ती इथे वाचता येईल.

ब्रूस पार्टिंग्टन प्लॅन्स(५)

मायक्रॉफ्ट आणि लेस्ट्रेड दोघंही आधी कळवल्याप्रमाणे ब्रेकफास्टनंतर लगेचच हजर झाले. होम्सने त्यांना आधल्या दिवशीच्या सगळ्या घटना तपशीलवारपणे सांगितल्या. घरफोडीचा वृत्तांत ऐकून लेस्ट्रेडने खिन्नपणे मान हलवली.
"पोलिसांना असं काही करता येत नाही. आत्ता मला कळलं की तुम्हाला एवढं यश कसं मिळतं ते. पण एखाद्या दिवशी तुम्ही तुमच्या सीमा ओलांडाल आणि फार मोठ्या अडचणीत याल. फक्त तुम्हीच नाही. तुमचा मित्रदेखील "
"इंग्लंडसाठी, घरासाठी किंवा कुर्बान होण्यासारख्या सौंदर्यासाठी आम्ही आनंदाने हौतात्म्य पत्करू. हो की नाही वॉटसन! पण मायक्रॉफ्ट, या सगळ्याबद्दल तुला काय वाटतं ते तू सांगितलं नाहीस..."
"फारच छान. कौतुकास्पद आहे. पण या सगळ्याचा उपयोग तू कसा काय करून घेणार हे मला कळत नाहीये"
टेबलावरचा डेली टेलिग्राफ उचलीत होम्स म्हणाला, " तू पिएरॉटची आजची जाहिरात पाहिलीस का?"
"आजची जाहिरात? त्याने पुन्हा जाहिरात दिली आहे?"
"हो ही बघ."
आज रात्री. नेहेमीच्याच वेळी. दोन थापांची खूण. अतिशय महत्त्वाची मसलत. तुमची सुरक्षितता धोक्यात आहे.
पिएरॉट


"अरे देवा! जर त्याने उत्तर दिलं तर आपण पकडू शकतो त्याला..."

"ही जाहिरात मी दिली आहे. मला वाटतं तुम्ही दोघेही जर आज रात्री आठाच्या सुमाराला कोल्फिल्ड गार्डन्सपाशी आलात तर आपण हे रहस्य सोडवण्याच्या खूप जवळ असू..."
जेंव्हा होम्सची अशी खात्री होत असे की प्राप्त परिस्थितीमधे आपण योग्य वेळेची वाट पहाण्याखेरीज इतर काहीच करू शकत नाही तेंव्हा तो आपलं सगळं लक्ष आपल्या आवडीच्या गोष्टींमधे गुंतवत असे. त्या दिवशीही पूर्ण वेळ तो एका मोनोग्राफमधे डोकं घालून बसला होता. माझ्याकडे मात्र असा काही जादूचा मंत्र नसल्यामुळे मी कसाबसा वेळ काढत होतो आणि वेळ जाता जात नव्हता. या प्रकरणाचं गांभीर्य, त्याचे देशावर होणारे परिणाम, कॅबिनेटपासून सर्वत्र चिंतेने ग्रासलेले लोक, आम्ही करत असलेल्या प्रयोगाचा काय निष्कर्ष निघेल अशा अनेक गोष्टींनी मला भंडावून सोडलं होतं. माझी अस्वस्थता क्षणाक्षणाला वाढत होती. शेवटी थोडंसं जेवून आम्ही जेंव्हा कामाला बाहेर पडलो तेंव्हा मला खरंच हायसं वाटलं. ठरवल्याप्रमाणे ग्लुसेस्टर रोड स्टेशनपाशी मायक्रॉफ्ट आणि लेस्ट्रेड आम्हाला भेटले. कॉल्फिल्ड गार्डनमधल्या एरियाचं दार आम्ही उघडंच ठेवलं होतं. मायक्रॉफ्टने साफ नकार दिल्यामुळे कुंपणावरून चढून आत उतरून ते त्या दारातून जाऊन हॉलचं दार उघडायची जबाबदारी माझ्याच गळ्यात येऊन पडली. नऊ वाजायच्या आत आम्ही सगळे आमच्या सावजाची वाट पहात स्टडीमधे दबा धरून बसलो होतो.
एक तास गेला. अजून एक तास गेला. अकरा वाजले. शेजारच्या चर्चच्या घड्याळाचे ते गोड पण गंभीर टोले आमच्या आशांवर पाणी फिरवताहेत असंच मला वाटायला लागलं. लेस्ट्रेड आणि मायक्रॉफ्ट चुळबुळत त्यांच्या खुर्च्यांमधे बसले होते. दर मिनिटाला दोनदा घड्याळाकडे पहात होते. होम्स मात्र शांत आणि निस्तब्धपणे अर्धोन्मीलित डोळ्यांनी पण अतिशय सावधपणे बसला होता. अचानक त्याने मानेला एक झटका दिला आणि डोकं वर उचललं.
"तो येतोय..." होम्स म्हणाला.
पावलांचा आवाज दाराजवळ येऊन पुढे गेला. मग परत आला. पावलांची अनिश्चित हालचाल आणि मग दारावरच्या नॉकरच्या दोन थापा. आम्हाला तसंच बसून रहायची खूणा करत होम्स उठला. बाहेरच्या हॉलमधे अंधार होता. दाराच्या फटीतून एक प्रकाशाचा बिंदू आत आला. त्याने बाहेरचं दार उघडलं. एक काळी आकृती त्याच्या शेजारून आत शिरली. होम्सने दार लावून घेतलं. "इकडून या" होम्सच आवाज आला आणि पुढच्याच क्षणी आमचं सावज आमच्या समोर होतं. होम्स त्याच्या पाठीमागेच होता. जेंव्हा त्या माण्साने एक किंकाळी फोडून मागे वळायला सुरुवात केली तेंव्हा होम्सने त्याची गचांडी धरली आणि त्याला पुन्हा खोलीत लोटलं. त्या माणासाला तोल सावरायला जेवढा वेळ लागला तेवढ्या वेळात होम्सने दार बंद केलं आणि बंद दाराला आपली पाठ टेकवून तो उभा राहिला. त्या माणसाने होम्सकडे डोळे वटारून पाहिलं, तो अडखळला आणि जमिनीवर कोसळला. त्या धक्क्याने त्याची मोठी कड असलेली हॅट जमिनीवर पडली आणि फिक्या रंगाची लांब दाढी असणारा कर्नल व्हॅलेंटाईन वॉल्टर यांचा देखणा चेहरा प्रकट झाला.
होम्सने आश्चर्याने एक शीळ घातली.
"वॉटसन, मी शुद्ध मूर्ख आहे असं या वेळी तू खुशाल लिहू शकतोस. आपली यांच्याशी गाठ पडेल असं मला मुळीच वाटलं नव्हतं..."
"कोण आहे हा" - मायक्रॉफ्ट .
"पाणबुडी विभागाचे प्रमुख ,कैलासवासी सर जेम्स वॉल्टर यांचा धाकटा भाऊ. आता मला दिसतंय सगळं एकमेकाला कसं जोडलंय ते. मला वाटतं याचा जबाब घ्यायचं काम तुम्ही माझ्यावरच सोपवावं..."
आम्ही त्याला उचलून सोफ्यावर ठेवलं. तो शुद्धीवर आला, उठून बसला. त्याच्या चेहऱ्यावर अतिशय घाबरलेले भाव होते. एकूणच तो फार शुद्धीत नसावा असं वाटत होतं.
"हे सगळं काय आहे? मी तर मि. ऑबरस्टीनना भेटायला आलो होतो..."
"आम्हाला सगळं कळलेलं आहे कर्नल वॉल्टर.. एखादा इंग्लिश माणूस असं काही कसं करू शकतो हे मी कधीच समजू शकणार नाही. पण मि. ऑबरस्टीनबरोबरचे तुमचे संबंध आणि तुमचा पत्रव्यवहार आम्हाला ठाऊक आहे. शिवाय कडोगन वेस्टचा मृत्यू कसा झाला हेही आम्हाला माहीत आहे. आता निदान माझ्या काही प्रश्नांची सुधेपणाने उत्तरं द्या जी फक्त तुमच्याकडूनच मिळू शकतात..."
एक उसासा सोडून त्याने आपल्या ओंजळीत तोंड लपवलं.बराच वेळ तो काही न बोलता बसून होता.
"आम्हाला बऱ्याच गोष्टी समजल्या आहेत. तुम्हाला पैशांची गरज होती. तुम्ही तुमच्या भावाकडच्या किल्ल्यांचे ठसे घेतलेत. तुम्ही ऑबर्स्टीनच्या संपर्कात होतात आणि तो तुम्हाला डेली टेलिग्राफमधून उत्तरं देत होता. आम्हाला हेही माहिती आहे की सोमवारी संध्याकाळी धुक्यातून तुम्ही शस्त्रागारापाशी गेला होतात पण कडोगन वेस्टने तुम्हाला पाहिलं आणि तुमचा पाठलाग केला. त्याला काही कारणाने आधीपासूनच तुमचा संशय आला होता. त्याने तुम्हाला पानं चोरताना पाहिलं पण तो तुमच्या चोरीबद्दल कोणाला सांगू शकला नाही कारण अशी शक्यता होती की तुम्ही तुमच्या भावाकडे न्यायला म्हणून ते कागद घेतले होतेत. एखाद्या आदर्श नागरिकाप्रमाणे - होय तो आदर्श नागरिकच होता..., त्याने तुमचा पाठलाग केला आणि एक क्षणभरही तुमचा माग न सोडता तो या घरापाशी येऊन पोहोचला. त्याने जेंव्हा तुमच्या हेतूमधे अडथळा आणला तेंव्हा तुम्ही त्याच्या रक्ताने आपले हात रंगवून घेतलेत.
"नाही. नाही देवाशप्पथ सांगतो मी हे केलं नाही"
"मग आम्हाला सांगा की कडोगन वेस्टचा मृत्यू कसा झाला? त्याच्या मृत्यूनंतर तुम्ही त्याला एका भुयारी रेल्वेगाडीच्या टपावर ठेवून दिलंत."
"सांगतो. सांगतो. ही गोष्ट मी केली. मी कबूल करतो. स्टॉक एक्सचेंज मधे मला बरंच देणं होतं. मला पैशांची अतिशय निकड होती. ऑबर्स्टीनने मला पाच हजार पौंड देऊ केले. ते मिळाले नसते तर मी धुळीला मिळालो असतो. पण खुनाच्या प्रकरणात मात्र मी तुमच्याइतकाच निर्दोष आहे हो..."
"काय काय झालं ते नीट सांगा आम्हाला..."
"तुम्ही म्हणालात ते खरं आहे. त्याला माझा संशय आला होता आणि त्याने माझा पाठलाग केला. पण मी इथे दारापाशी पोहोचेपर्यंत मला या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती. धुकं फारच दाट होतं आणि मला तीन यार्डांच्या पलिकडे काहीही दिसत नव्हतं. मी दोनदा दार वाजवलं आणि ऑबरस्टीन दार उघडायला आला. कडोगन वेस्ट अचानक मधे घुसला आणि आम्हाला ती पानं कशाला हवी आहेत याचा जाब विचारायला त्याने सुरुवात केली. ऑबरस्टीनच्या खिशात नेहमी एक शस्त्र असे. (कप्पाळ माझं! life preserver म्हणजे काय म्हणणार पण?) कडोगन वेस्ट आमच्या मागोमाग आत घुसला आणि ऑबरस्टीनने त्याच्या डोक्यावर वार केला. तो वार प्राणघातक ठरला आणि पाच मिनिटांच्या आत कडोगन वेस्टने प्राण सोडला. आम्हाला काय करावं काही सुचेना. तेवढ्यात ऑबरस्टीनच्या डोक्यात ही कल्पना आली. त्याच्या घराच्या मागच्या भागात रेल्वेगाड्या थांबायच्या. त्याने माझ्याकडच्या पानांपैकी तीन पानं निवडली. ती पानं सगळ्यात महत्त्वाची असल्यामुळे तो ती ठेवून घेणार होता. मी त्याला म्हटलंसुद्धा की तू ती ठेवू शकत नाहीस. उद्या सकाळी जर ती सापडली नाहीत तर वूलविचमधे हलकल्लोळ माजेल. पण तो म्हणाला की ती इतकी किचकट आहेत की ती उतरवून घेणं वेळेच्या आत पूर्ण होणंच शक्य नाही. मी त्याला सांगितलं की सगळी पानं एकत्रितपणे आजच्या आज जागेवर परत जायला हवीत. मग तो म्हणाला आपण असं करू, ही तीन पानं मी ठेवून घेतो आणि उरलेली सात पानं आपण या माणसाच्या खिशात ठेवू या. जेंव्हा हे सगळं प्रकरण उघडकीला येईल तेंव्हा सगळा संशय त्याच्यावरच जाईल. मलाही यातून बाहेर पडायचा दुसरा मार्ग दिसेना. एक गाडी तिथे थांबेपर्यंत साधारण अर्धा तास आम्हाला वाट पहावी लागली. धुकं इतकं होतं की काहीच दिसत नव्हतं. आम्हाला वेस्टचं प्रेत गाडीच्या टपावर ठेवायला काहीच त्रास झाला नाही. माझ्यापुरतं हे प्रकरण इथेच संपलं होतं. "
"आणि तुमच्या भावाबद्दल काय सांगाल?"
"तो कधी बोलला नाही पण त्याने एकदा मला त्याच्या किल्ल्या पाहताना पकडलं होतं. त्याला माझा संशय आला असणार. त्याच्या डोळ्यात तसे भाव दिसत होते. त्यानंतर तो कधीच मान ताठ ठेवून वावरू शकला नाही... " खोलीत एकदम शांतता पसरली. मग मायक्रॉफ्ट म्हणाला,
"झाला प्रकार निस्तरायला तुम्ही मदत करू शकता का? त्याने तुमची शिक्षा कमी होईल आणि कदाचित तुमची सदसद्विवेकबुद्धी तुम्हाला कमी त्रास देईल..."
"मी काय करू शकतो?"
"ती पानं घेऊन ऑबरस्टीन कुठे गेला आहे?"
"मला माहीत नाही..."
"त्याने तुम्हाला काही पत्ता नाही दिला का?"
"तो म्हणाला होता की पॅरिसमधल्या दु लूव्र हॉटेलच्या पत्त्यावर पाठवलेली पत्र त्याला पोचतील म्हणून..."
"तसं असेल तर तुम्ही नक्कीच मदत करू शकाल..." होम्स म्हणाला.
"तुम्ही काय सांगाल ते मी करीन. मला या माणसाबद्दल काहीच दयामाया वाटत नाही. त्याने माझा सत्यानाश केला आहे..."
"हा घ्या कागद आणि हे घ्या पेन. इथे बसा आणि मी सांगतो तसं पत्र लिहा. नंतर त्या पाकिटावर तुम्हाला सांगितलेला पत्ता लिहा.
हं लिहा --"

सर,

आपल्यात झालेल्या व्यवहारानंतर तुमच्या असं लक्षात आलंच असेल की एक महत्त्वाचा भाग अजूनही माझ्याकडे आहे. या भागाची आकृती मिळवण्यासाठी मला बरेच प्रयास पडले आहेत त्यामुळे तुम्ही मला पाचशे पौंड जादा द्यायला हवेत. माझा पोस्ट खात्यावर विश्वास नाही आणि नोटा किंवा सोनं सोडून मी दुसरं काहीच स्वीकारणार नाही. जर मी तुम्हाला भेटायला तिकडे आलो तर अशा वेळी मी देशाबाहेर गेल्यामुळे इथे बरीच बोंबाबोंब होईल. म्हणून तुम्हीच शनिवारी दुपारी बारा वाजता चेरिंग क्रॉस हॉटेलच्या स्मोकिंग रूममधे मला येऊन भेटा. लक्षात ठेवा, फक्त खऱ्या ब्रिटिश नोटा किंवा सोनं.


"ठीक आहे. जर हे पत्र आपल्या माशाला जाळ्यात पकडू शकलं नाही तर मला खूप आश्चर्य वाटेल."

---आणि त्या पत्राने आमचा मासा पकडला! एखाद्या देशाचा छुपा इतिहास खऱ्या इतिहासापेक्षा किती रंजक असतो नाही! आपल्याकडची माहिती पूर्ण करून आयुष्यातली महत्त्वाची कामगिरी पार पाडायला आतुर असलेला ऑबरस्टीन सहजपणे जाळ्यात सापडला आणि पंधरा वर्षांसाठी गजाआड झाला. त्याच्या बॅगेत ब्रूस पार्टिंग्टन पाणबुडीचे ते अमूल्य प्लॅन्स होते. त्याने साऱ्या युरोपभरातील नौदलांशी त्यांच्या लिलावासाठी बोलणी केली होती.
तुरुंगवासातील दुसऱ्याच वर्षी कर्नल वॉल्टर देवाघरी गेले. होम्स नेहेमीप्रमाणे उत्साहाने आपल्या मोनोग्राफमधे डोकं घालून बसला. त्या मोनोग्राफबद्दलची त्याची मतं छापून त्याने जवळच्या व्यक्तींना दिली आणि त्यांच्या मंडळातील लोकांचं असं ठाम मत आहे की त्या क्षेत्रात होम्स हा सर्वश्रेष्ठ आहे. काही दिवसांनंतर मला माझ्या असं ऐकण्यात आलं की होम्सने विंडसरला एक अख्खा दिवस घालवला. परत येताना त्याच्याकडे एक अमूल्य अशी पाचूची टाय पिन होती. मी जेंव्हा त्याला विचारलं की ती पिन त्याने कुठून विकत घेतली तेंव्हा तो म्हणाला की त्याने केलेल्या एका कामगिरीबद्दल एका बाईसहेबांकडून त्याला ती बक्षीस मिळाली होती. तो जरी याहून जास्त काही बोलला नाही तरी त्या बाईसाहेबांचं नाव ओळखायला मला काहीच प्रयास पडले नाहीत. आणि ती पाचूची पिन त्याला नेहेमीच ब्रूस पार्टिंग्टन प्लॅन्स च्या प्रकरणाची आठवण करून देत राहील यात काहीच शंका नाही....

--अदिती

30 मार्च 2009

राम रामेति रामेति...

परवाच गुढीपाडवा दणक्यात साजरा झाला. या वर्षी पाडव्यानिमित्त सुट्टी मिळाल्यामुळे असेल कदाचित पण यंदा पाडव्याला सगळ्यांचाच उत्साह ओसंडून वाहत होता. खूपच छान वाटलं. फाल्गुन संपला आणि चैत्र सुरू झाला. मला चैत्र फार आवडतो. चैत्रामध्ये मला सगळ्यात काय आवडत असेल त्या महिन्यात भरगच्च असलेले खास दिवस. आणि, आपल्यासारखाच देवांनाही उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून देवासमोर भरून ठेवायचं चांदीचं इटुकलं तांब्या-भांडं. देवावर मनुष्यत्वाचा आरोप ( म्हणजे आळ नव्हे! हा अलंकारिक आरोप आहे याची कृपया नोंद घ्यावी!! ) केल्यावर तो माणसांच्या जास्त जवळ येत असावा. लंगडा बाळकृष्ण, रामनवमी - गोकुळाष्टमीला रामकृष्णांना पाळण्यात घालून केले जाणारे त्यांच्या जन्माचे सोहळे, विठ्ठलाला लावली जाणारी चंदनाची उटी, सारसबागेतल्या गणपतीला घातलेला स्वेटर ही याची काही उदाहरणे असावीत. आपल्या श्रद्धेला अमूर्त तत्त्वापेक्षा हे सगुण साकार परब्रह्म जास्त भावतं असं दिसतंय. ( अमूर्तवादी लोकांनी निर्जीव मूर्तीमध्ये देव खरंच अस्तित्वात असतो का इ. प्रश्नांची सरबत्ती करू नये कारण जर तो चराचरात भरलेला असेल तर पाषाणाच्या मूर्तीमध्ये तो नाही असं होणारच नाही. ) या संदर्भात कुसुमाग्रजांनी कुठेतरी लिहिलेलं एक वाक्य आठवतं. "देव आहे किंवा नाही याचं उत्तर माझ्या मते तरी, ज्याला त्याची गरज आहे त्याच्यासाठी तो आहे, ज्यांना त्याची गरज नाही त्यांच्यासाठी तो नाही असं आहे" असं कुसुमाग्रज म्हणाले होते. आस्तिक लोकांचा देव आहे यावर दांडगा विश्वास असतो तर नास्तिकांचा देव नाही यावर, पण देव आहे म्हटलं काय आणि नाही म्हटलं काय, दोघेही शेवटी देवावरच विश्वास ठेवतात ना! असा एक मार्मिक आणि मिस्कील युक्तिवादही कोणीतरी केल्याचं कानावर आलं होतं. त्या माणसाच्या चातुर्याला मात्र दाद द्यावीशी वाटली होती.

परवा काही कामानिमित्त तुळशीबागेत गेले होते. बऱ्याच वर्षांपासून कानातली - गळ्यातली - क्लिपा आणि इतर छप्पन्न गोष्टी आणायला म्हणून  आमची ये-जा तुळशीबागेपेक्षा तुळशीबागेच्या मागील बोळातच जास्त असते. त्यामुळे तुळशीबागेत गेल्यावर मला खूपच वेगळं वाटत होतं. तिथलं रामाचं देऊळ, राम - सीता - लक्ष्मणाच्या देखण्या मूर्ती, समोरचा सभामंडप आणि देवळासमोरच असलेलं हनुमंताचं इवलं देऊळ पाहूनच चित्तवृत्ती शांत झाल्या. चैत्री नवरात्रानिमित्त सगळीकडे मांडव घातलेला होता. नऊवारीतल्या आजीबाई आणि काकूबाई छापाच्या स्त्रिया अंबाड्यात सोनचाफ्याचं फूल किंवा पोनीटेलवर मोगऱ्याचा सुगंधी गजरा माळून भक्तिभावाने रामाला हात जोडत होत्या. प्रदक्षिणेचा मार्ग लोकांनी फुलून गेला होता. काहीतरी विलक्षण सात्त्विक असं तिथे दाटलं होतं. त्या समस्त स्त्रीवर्गाच्या चेहऱ्यावरचे भाव इतके प्रसन्न आणि शांत होते की, "विठ्ठलापेक्षा त्याच्यापुढे लोटांगण घालणाऱ्या वारकऱ्याच्याच दर्शनाची मला अधिक ओढ वाटते" हे पुलंच मत आठवलं, पटलं. तितक्यात माझ्या ओळखीच्या एक आजीबाई भेटल्या. माझ्या गुरुंच्या त्या आई त्यामुळे मला लहानपणापासून ओळखतात. "काय गं तब्येत किती खराब करून घेतलीयेस! आपल्याला नाही बाबा आवडत हे असलं काही. पुढच्या वेळी मला तू चांगली जाडजूड झालेली दिसली पाहिजेस! " असं फर्मान काढून त्यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा रामरायाकडे वळवला. मला जरा हसूच आलं. अनेक दिवस सकाळी फिरायला जाऊन आणि डाएटच्या नावाखाली पोटाला चिमटे काढून जरा आटोक्यात आलेला माझा देहविस्तार ही माझी 'खराब' झालेली प्रकृती नाही हे त्यांना कसं सांगणार! त्यातून आजीची नजरच वेगळी असावी.

लालबुंद भरजरी वस्त्रं नेसवलेल्या राम - सीता - लक्ष्मणाच्या मूर्तींकडे कितीही वेळ बघत राहिलं तरी समाधान होणार नाही असं वाटत होतं. मी कितीतरी वेळ टक लावून त्यांच्याकडे बघत उभी होते. शेवटी माझ्या मागेही बरीच गर्दी ताटकळते आहे याची जाणीव झाल्यावर मात्र मी तिथून बाजूला झाले. पुजाऱ्याचा तीन चार वर्षांचा नातू मोठ्या ऐटीत बसून साखरफुटाण्यांचा प्रसाद आल्यागेल्याला देत होता. आजोबांची नक्कल करायला मिळाल्यामुळे त्याला झालेला आनंद त्याच्या चिमुकल्या चेहऱ्यावर मावत नव्हता. माझ्याही हातावर त्याने चार साखरफुटाणे ठेवले. ठेवताना तो आतल्या रामाइतकाच सुंदर हसला. मला पटकन त्यालाच एक नमस्कार करावासा वाटला. गर्दीमधून मी प्रदक्षिणा पूर्ण केली. पुन्हा एकदा देवासमोर आले. सावळ्या रामचंद्राचं तुळशीबागेतलं रुपडं मात्र संगमरवरी आहे. मनोमन त्याची प्रार्थना करत असतानाच माझे विचार रामामागेच धावत राहिले.

राम हा तसा खूप लहानपणीच अनेक गोष्टीमधून भेटलेला देव. आकाशातला चांदोबा मागणाऱ्या रामाची गंमत वाटायची. जाड अक्षरांमध्ये छपलेलं रामायणातील गोष्टींचं एक पुस्तक माझ्याकडे होतं. त्यात, शेवटी रामाने शरयू नदीत उडी मारली आणि रामायण संपलं अशी एक गोष्ट होती. ती मला मुळीच न आवडल्याने मी ते पुस्तक वाचणारच नाहीये अशी मी आईकडे तक्रार केल्याचं आठवतंय. बाबा मला झोपवताना
पहिली माझी ओवी । दुसरा माझा नेम ॥
तुळशीखाली राम पोथी वाची ॥
ही ओवी म्हणत असत. रामायण ही दूचिवा मालिका सुरू झाल्यावर तर धमालच होती. रामासारखं धनुष्य करण्याच्या नादात मी कितीतरी खराट्याच्या काड्या मोडल्या आहेत. पण आमचा खरा हीरो होता गदाधारी हनुमान. प्लॅस्टिकची गदा तशी सुरक्षित असल्याने मनसोक्त खेळायला मिळायची. शिवाय त्या पडद्यावरच्या पुचाट रामापेक्षा अरविंद त्रिवेदींचा रावणच 'लई भारी' वाटायचा हे तेंव्हाही जाणवलं होतं. तेंव्हा राम हा धनुष्यबाण लीलया वापरत असल्यामुळे सॉलिड वाटायचा. ढिशुम ढिशुम मारामाऱ्या करणारा वाटायचा. खूप मजा वाटायची. आज मात्र राम म्हटलं की शांत, स्थिर, शाश्वत मूल्यांचा पाईक आणि कठोर खडतर कर्मवादाचा पुतळा वाटतो. तो सोळा कलांचा परमेश्वराचा पूर्णावतार आहे वगैरे गोष्टी माहीत आहेत. पण मला आदर वाटतो, भक्ती वाटते ती कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता आलेल्या प्रसंगाला तोंड देत, संकटांशी दोन हात करत संस्कृतीच्या शाश्वत मूल्यांचे रक्षण करत कर्म करत राहा हा संदेश देणाऱ्या प्रभू रामचंद्राबद्दल. राम हा माझ्या मते माणूस होता आणि म्हणूनच काही चुकाही त्याने केल्या असतील( सीतात्याग!  त्या मुद्द्यावर त्याचा रागराग येतो ) पण अंगभूत गुणांनी आदर्शांनाच मानवीभूत करण्याची जी अफाट मानसिक आणि शारीरिक शक्ती त्याने वापरून दाखवली ती त्याला देवपदाला नेण्यास समर्थ आहे. बनवाबनवी, खोटेपणा, राजकारणे, दलबदलू स्वार्थ यांनी अजगरासारखा विळखा घातलेल्या आजच्या जगात रामाकडे पाहिल्यावरच आधार वाटतो. अजून रामनवमी यायची आहे. त्या दिवशी नकळत तुळशीबागेत जायची ओढ लागते कारण त्या आभाळाएवढ्या परमेश्वररूपाचं ते मनोहर बाळरूप पाहून जीव सुखावतो. आज बाप्पाचा 'हॅप्पी बर्थडे '  आहे का?  असं  आजीला विचारणाऱ्या लहान मुलीची गोष्ट आठवावी  तितका.... :)

--अदिती
(चैत्र शुद्ध ४ शके १९३१,
३० मार्च २००९)

17 मार्च 2009

सच है दुनियावलों....

काही वर्षांपूर्वी एका मराठी नाटककाराचं आत्मचरित्र वाचण्याचा योग आला होता. त्यांनी मुख्यतः संगीत नाटके लिहिली असावीत. त्यांच्या पुस्तकाचं पहिलंच वाक्य होतं " मी केशराचं शेत लावलं आहे आणि गाढवांना त्यात चरायला सोडलेलं आहे' संदर्भ सोडून लक्षात राहिलेलं हे वाक्य नेमकं आत्ताच का आठवलं? मराठी संगीत रंगभूमी ही केशराची बाग असेलही पण आयटी इंडस्ट्री ही केशराची बाग कधीच नव्हती. ती होती एक दुभती गाय. वाहत्या गंगेत हात धुवून घेणारे असंख्य लोक आज आयटीने अक्षरशः अन्नाला लावले आहेत. मी हे जे काही लिहिते आहे ते मी लिहावं का लिहू नये हे अनेक दिवस मला ठरवता आलेलं नाही. पण तरीही लिहिते आहे. खरंखुरं मत मांडते आहे. एखाद्याला ते अतिस्वार्थीपणाचं वाटेल कदाचित. हे सगळं लिहिण्यामागे व्यक्तिगत आकस नाही. सॉफ्टवेअरचं अतिरिक्त कौतुकही नाही. आणि कुठल्याही प्रकारे विवक्षित माणसांकडे किंवा कंपन्यांकडे बोट दाखवण्याचाही हेतू त्यामागे नाही.

आम्ही सगळे करीयरचे निर्णय घ्यायच्या वयात आलो तेंव्हा जिकडे तिकडे आयटीचं पेव फुटलं होतं आणि वायटुकेच्या अदृश्य भुताने जगाला पछाडलं होतं. कॉम्प मधलं शिक्षण अनेकांना अमेरिकेत जायच्या व्हिसासारखं दिसत होतं. कधी एकदा हे जुलमाचं शिक्षण संपतंय आणि खऱ्या आयटीमध्ये आपण प्रवेश करतोय! अशी घाई झालेले आम्ही सारे येरू तेंव्हा एकमेव असलेल्या सॉफ्टवेअर पार्ककडे एखाद्या लहान मुलाने डिस्नेलँडकडे बघावं तसे बघायचो. तिथली चित्रविचित्र आकारांच्या इमारतींमध्ये भरणारी ऑफिसेस, विन्डोज एक्स-पी च्या प्रसिद्ध डेस्कटॉपवरच्या चित्रासारखे त्यांचे हिरवेगार परिसर, गळ्यातली रंगीत पट्ट्याची आय-कार्ड्स आणि एक पाय ऑन साईट - एक पाय ऑफ शोअर असे एकेक पाय नाचिवणारे गोविंद हे सगळं खूप अप्रूपाचं, हवंहवंसं होतं. अर्थातच संगणकशास्त्रावर मनापासून प्रेम करणारे आमच्यासारखेही त्या गर्दीत होतेच.

प्रोग्रामिंग लँग्वेजेस आम्ही मातृभाषेसारख्या शिकलो. डेटाबेसेस मधले नॉर्मल फॉर्म्स वेड्यासारखे पाठ केले. ( प्रत्यक्षात पर्फॉर्मन्स साठी ती टेबल्स डिनॉर्मलाइझ करावी लागतात हे पाहून मला एक विकट हास्य करावंसं वाटलं होतं. ) लेक्स - याक पासून ते फाईनाईट ऑटोमेटापर्यंत सग्ग्ळं सग्ग्ळं शिकायचा मनापासून प्रयत्न केला. बरेच उंबरठे झिजवल्यावर अकस्मात् एखाद्या मुलीचं लग्न ठरावं तशी ध्यानीमनी नसताना एक दिवस नोकरीही मिळाली आणि मुलगी मार्गी लागली म्हणून पालकांनी निःश्वास सोडले. त्यांना हायसं वाटलं असलं तरी मला मात्र त्या दिवसापासून आजपर्यंत जिवाला स्वस्थता म्हणून लाभलेली नाही.

जे आम्ही शिकलो ते प्रत्यक्षात वापरलं जात नव्हतं आणि जे वापरलं जात होतं ते आमच्या अभ्यासक्रमात नव्हतं. आल्या प्रसंगाला तोंड दिलं, टक्के टोणपे खाल्ले की आपल्याला अनुभव मिळेल आणि त्यातून ज्ञान मिळेल अशी माझी समजूत होती. पण या सगळ्या वरवरच्या चमचमाटाखाली मला तरी फक्त भ्रमनिरासच होताना दिसलेला आहे. ओ. एस. कन्सेप्ट्स , सी , सी++, डीएस कन्सेप्ट्स , विन्डोज - युनिक्स इंटर्नल्स हा या सगळ्याचा गाभा आहे. प्रत्येक इंटर्व्ह्यूमध्ये या गोष्टींची अगदी कसून तपासणी होते. आयआयटी एंट्रन्स पासून कसले कसले प्रश्न विचारले जातात. हे सगळं विचारायला माझी ना नाही. पण प्रत्यक्ष काम हे या सगळ्याशी अगदी असंबद्ध असं का असतं? मास्टर्स लेव्हलच्या कँडिडेटला प्रॉडक्शन मॉनिटरिंग करायला का बसवतात? माणसाला रिसोर्स असं गोंडस नाव दिल्यावर प्रत्यक्षात भिंतीवरच्या खुंटीइतकीही किंमत का दिली जात नाही? सरकारी ऑफिसमध्ये शोभेल अशी ब्युरोक्रसी आयटीमध्ये का राबवली जाते? कामाचे अनिर्बंध तास आणि ज्युनियर लेव्हलच्या माणसाने चोवीस तास कंपनीतच राहिलं पाहिजे अशी अपेक्षा करणारे पी एम्स अप्रेझलच्या वेळी रिसोर्सने केलेलं काम सोयिस्करपणे कसं विसरू शकतात?

सॉफ्टवेअर कंपनी असं नाव देऊन प्रत्यक्षात फक्त सॉफ्टवेअर्स अल्टर करणाऱ्या कंपन्यांमध्ये ज्यांना संगणकशास्त्राची आवड आहे अशा माणसांनी कसा काय तग धरायचा? प्रत्यक्षातली आयटी म्हणजे फक्त शेअर मार्केटचे रक्तदाबासारखे चढणारे - उतरणारे आकडे, डॉलर आणि रुपयामधल्या फरकातून पैसे कमावू पाहणाऱ्या कंपन्या आणि दुसऱ्याला पायाखाली गाडून आपली उंची वाढवू पाहणारे गळेकापू मॅनेजर्स एवढंच आहे का? आणि का आहे? चाळीशीत स्पाँडिलायटिस झालेले, हृदयविकाराने ग्रस्त, डायबेटिक आणि इतर कसल्याकसल्या आजारांच्या साखळ्यांच्या कॅप्सूल्स धारण करणाऱ्या लोकांची पैदास करणाऱ्या या आयटीनेच मला दोन वेळची भाकरी आणि दर महिन्याला मिळणाऱ्या पगाराच्या रकमेची सुरक्षित हमी दिली आहे. आयटीबद्दल प्रेम, संगणकशास्त्राबद्दल अपार माया आणि आपल्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्याची ओढ असणाऱ्या माझ्यासारख्या मुलीने या विश्वाचा द्वेष करायचा की आपण आपली मूल्ये सोडून या गळे कापण्याच्या धंद्यात सामील होऊ शकत नाही म्हणून आपला पराभव मान्य करायचा?

पैशापेक्षा ज्ञान , अनुभव , चांगल्या कामातून मिळणारा बौद्धिक आनंद महत्त्वाचा मानणाऱ्या माणसाने केवळ वरिष्ठापुढे हांजीहांजी करण्याच्या क्षमतेला दिलेलं बेस्ट पर्फॉर्मन्सचं सर्टिफिकेट किंवा बेकारी असा सवाल समोर आला तर काय पर्याय निवडावा? हे प्रश्न मला पडतात. इतर कोणाला पडतात किंवा कसं मला माहीत नाही.

परीक्षेचा अभ्यास कसा करावा हे मला कळतं पण ऑफिसमध्ये त्या लोकांना अपेक्षित परफॉर्मन्स कसा द्यावा हे मला कळत नाही. आम्हाला कॉलेजमध्ये शिकवलेली आयटी आणि प्रत्यक्षातली आयटी यात खूपच अंतर आहे आणि या जगाशी कसं जुळवून घ्यावं हे मला कळत नाही. प्रत्येक वेळी कामे करूनही नाकर्तेपणाचा शिक्का कपाळावर बसल्यानंतर मला शेवटी असंच म्हणवंसं वाटतं
-सबकुछ सीखा हमने, ना सीखी होशियारी

सच है दुनियावालों के हम है अनाडी.....

27 जनवरी 2009

शुद्ध कल्याण...

कल्याण हा तसा कल्याणकारी राग आहे. शिवाय तो थाटही आहे.
गायन शिकायला सुरुवात करताना पहिली ओळख होते ती यमन रागाची. हिंदीत याला कदाचित ती यमन म्हणत असतील ( उ. विलायत खाँसाहेबांच्या लेकीचं नाव यमन होतं असं कुठेतरी वाचल्याचं स्मरतंय ) पण प्रत्यक्षात मात्र हा आहे रागांचा राजा. याची प्रकृती अगदी पैलवानी थाटाची असल्यामुळे याचं सगळंच अगदी मर्दानी डौलाचं आहे. काही लोक यमन आणि कल्याण हे वेगळे राग मानतात कारण परंपरेनुसार यमन रागात पंचम वर्ज्य आहे तर कल्याण हा थाट असल्यामुळे त्यात आरोही -अवरोही पंचम घेतला जातो. कल्याण थाटातलाच अजून एक राजयोगावर जन्माला आलेला राग म्हणजे भूप. हा राग म्हणजे अंबारीसहित हत्तीचा डौल आहे. रडक्या कोमल स्वरांची भानगड नसलेला आणि पाचच सूर असल्यामुळे शिकायला खूप सोपा असलेला भूप वातावरण प्रसन्न करून सोडतो. पण प्रत्यक्षात गायला आणि विशेषतः रंगवायला मात्र अति अवघड. विशेषतः ताना घेताना गायकाच्या गळ्याचा अगदी कस लागतो. हा रागसंगीताचा चक्रवर्ती सम्राट आहे. त्याच्या वाटेला जाणं हे येरागबाळाचे काम नोहे. भूप म्हटला की मला हटकून आठवण होते ती पुलंच्या आवाज आवाज या लेखाची(आम्हाला जिकडे तिकडे सतत पुलं आठवत असल्यामुळे ज्यांना पुलं तोंडपाठ नाहीत अशा लोकांची जरा पंचाईतच होते... असो) तर, रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या बर्थवर असलेल्या पंख्यातून म्हणे सतारीसारख्या गती वाजतात. फर्स्ट क्लासच्या बर्थवर झोपावं आणि पंख्याला "चलो बेटा आज भूपही सुनेंगे" अशी फर्माईश करावी. पंख्यातून अक्षरशः भूप सुरू होतो. इच्छुकांनी स्वतःच्या जबाबदारीवर भूप गाऊन पाहावा - इति पुलं!
असे हे यमन आणि भूप . अलिकडे हे दोन्ही राग फारसे ऐकायलाच मिळत नाहीत. पण निगाहे मिलाने को जी चाहता है हा ढोबळमानाने यमन आणि किशोरीबाईंचं सहेला रे आ मिल गाये म्हणजे साक्षात भूप असं म्हटलं तरी त्या दोघांची ती चमकदार रूपं डोळ्यांसमोर तरळतात. तसे हे दोघं स्वभावाने अगदी प्रेमळ आहेत. नवशिके गायक यांच्याशी जी काही झटापट , क्वचित कुस्तीसुद्धा करतात ती हे उदार मनाने ऐकून घेतात. नवशिक्या तबलजीला "बजाओ बेटे , घबराओ मत.. मी आहे ना तुझ्या पाठीशी" असं म्हणत सहज सांभाळून घेणाऱ्या वसंतराव देशपांड्यांसारखेच! पण पोरंसोरं यांच्याशी खेळत असली तरी हे राग गाणं म्हणजे मुळीच पोरखेळ नाही. मला तर यमन म्हणजे बाहेर सांजावलेलं पाहून कोणीतरी पितळेची उंच सहस्रदळी समईच उजळली आहे असं वाटतं. आणि भूप म्हणजे तर उंच छताला टांगलेलं आणि पूर्णपणे उजळलेलं लखलखतं बिलोरी झुंबरच! यांच्यात डावं उजवं कसं करणार?
हे दोन राग जेंव्हा एकत्रितपणे गायले जातात तेंव्हा त्यातून तयार होतो तो शुद्ध कल्याण. शुद्ध कल्याण म्हणजे सोन्याला सुगंध! ऑलिंपिक मध्ये जेंव्हा दोन जिम्नॅस्ट एकसारख्या हालचालींचा समन्वय दाखवतात तेंव्हा जसं वाटतं तसंच शुद्ध कल्याण ऐकताना होऊन जातं. यमन आणि भूप यांचं जोडकाम असला तरी शुध कल्याण या दोघांपेक्षा वेगळा आहे. शुद्ध कल्याण म्हणजे एखाद्या आकाशगंगेतला अनेक ताऱ्यांनी भरलेला तेजोमेघ आहे. प्रसन्नतेचं भारून टाकणारं गारुड आहे. कानांना आणि कानांवाटे मनाला सुखावून टाकणारी बासुंदी आहे. आजवर फक्त आस्वादलेला शुद्ध कल्याण काल थोडासा गायला मिळाला आणि जीव नेचे नेचे होतो सारा....
पूरिया - मारव्यासारखा हा कातर करत नाही. बसंत-बहारीसारखा हुरहूर लावीत नाही. बिहाग-मारू बिहाग नंदासारखा लालित्यपूर्ण पदन्यास करीत नाही. शुद्ध कल्याण हा अण्णांसारखा आहे. आपल्या रांगड्या मर्दानी आवेशाने डोळे दिपवून टाकणारा, कानांचं पारणं फेडणारा. लताबाई - आशाबाई एकत्र गाताहेत असा भास निर्माण करणारा. कोकणातल्या प्रलयंकारी पावसात हसत हसत भिजणाऱ्या रायगडासारखा. दर्या खवळे तिळभर न ढळे अशा जंजिऱ्यासारखा. विराट तरीही देखणा. राकट तरीही नितळ हसरा गुळगुळीत. तेजोमय... प्रकाशपूजक... उत्सवी....


--अदिती

25 जनवरी 2009

एकवार आज फिरून ....

नव्या वर्षात आजवर दुर्लक्षित असलेल्या ब्लॉगकडे जरा (जास्त) नियमितपणे लक्ष द्यावं असा संकल्प केल्यामुळे आज या पानावर जमलेली धूळ झटकली जाते आहे. सर्व संकल्पांचे रंग हे तेरड्यासारखेच तीन दिवसांत उडून जाणारे असतात. हा किती दिवस टिकतो पहायचं...
हे लिहितालिहिताच बालपणापासून अनेकवेळा जाणवलेलं सत्य नकळत पुन्हा एकदा आठवलं. उत्स्फूर्तता, बेभान-बेधुंद अवस्थेच्या सतत प्रेमात असलेल्या माणसांना सगळ्यात जर कसला कंटाळा येत असेल तर तो असतो नियमितपणा या गोष्टीचा. 'नेमेची येतो मग पावसाळा असे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ' ही ओळ घातली की निबंधाला कसं वजन येतं, त्यामुळे मार्क मिळवण्यासाठीच्या अनेक युक्त्या-क्लृप्त्यांमधली ही पेटंट युक्ती असली तरीही त्या नियमितपणाचा कंटाळाच प्रत्यक्षात जास्त जाणवलेला आहे. रोजचं आठ-ते-पाच चं चक्र पाळताना ' रुटिनः ज ntu' झालेल्या चाकरमानी पामरांना हे नियमितपणाचं खूळ पाठीवरच्या सिंदबादच्या म्हाताऱ्याइतकं जड वाटल्यास नवल ते काय? तरीसुद्धा आवडतं काम करायला वेळकाळ पहायचा नसतो. म्हणूनच हे जालनिशी - लेखन करायच्या निश्चयाने उसळी मारली आहे.
मराठी जालनिश्यांमध्ये नंदन, ट्युलिप, धोंडोपंत ही माझ्या माहितीतील काही पॉप्युलर नावं. ज्या तन्मयतेने आणि निष्ठेने हे लोक ब्लॉग लिहितात आणि तो सजव्तात ते पाहून तेथे कर माझे जुळती अशीच माझी अवस्था होते. अलिकडे केतन कुल्कर्णींचा असंच-आपलं हा ब्लॉग वाचला. खूप छान वाटलं वाचून. निष्ठेने आणि नियमाने जाललेखन करणाऱ्या या सर्व रथी महारथींना दंडवत घालून 'आयुष्यग्रंथाचं नवं पान उलटते आहे'(सुज्ञांस सांगणे न लगे... )
हे नमनाला बुधलाभर तेल वाया घालवल्यावर आता काहीतरी(च) लिहिणं क्रमप्राप्त आहे म्हणून हा प्रयत्न...

--अदिती

12 दिसंबर 2007

कृपा तुझी रे अपार आहे

हिवाळ्यातली दुपार आहे,
निजावयाचा विचार आहे ...

शिरा करावा नव्या तुपाचा
'हिचा' मिळाला रुकार आहे

खुलून यावे कसे चवीने ?
घरात नुस्ती गवार आहे...

तळून काढा जरा करंज्या
मस्त मिळाला मटार आहे!

दिवास्वप्न हे लगेच भंगे
चहा पिण्याचा सुमार आहे!

असेच देवा मिळो गिळाया
कृपा तुझी रे अपार आहे!

--अदिती
(२३.११.२००७,
कार्तिक शू १४ शके १९२९)

कधी ...

या तमातुनी मला दिसेल काजवा कधी?
हाय हात हा करी धरेल चांदवा कधी

तोलतो क्षणाक्षणास कारकून बैसला
दादरा कधी धमार मत्त केरवा कधी

कंस फार माजला दया करा प्रभू अता
ध्यास या धरेस उद्धरेल 'आठवा' कधी

साद देत थांबले शकून वाट पाहती
फाल्गुनास दूर पाठवेल पाडवा कधी

फेर लाख मांडलेस, खेळ चालला तुझा
सांग संपणार का खरेच जोगवा कधी

एकलाच प्रश्न जाळतो पुन्हा पुन्हा मला
एकलाच ध्यास लागला असे जिवा 'कधी' !

--अदिती
(२४ ऑक्टोबर २००७,
कोजागिरी पौर्णिमा , शके १०२९)

वर्तुळ

नावडती कामे करता करता घुमती
या मनामधे किति आशावादी स्वगते
खंडकाव्य ओव्या अभंग कविता गाणी
मी मनात माझ्या बसल्या बसल्या लिहिते

मन म्हणते, मजला संधी दे गं थोडी
एक लेखणी, अशी रिकामी पाने
मग पाहशील तू दिपल्या डोळ्यांपुढती
साहित्य जंगले अन् कवितांची राने

मी हसते तरिही जरा झुकवुनी मान
सांगते मनाला 'कर तू मनाप्रमाणे'
मन आवेशाने खरडायाला बसते
धडपडते, रुसते, लिहितेही नेटाने

त्या वेळ फारसा अजून झाला नाही
तोवर प्रतिभेचा आटत जातो झरा
छे.. जमतच नाही... काय लिहावे आता
मन मलाच पुसते यक्षप्रश्न हा खरा

मज अर्धेमुर्धे ते काव्याचे तुकडे
वाकुल्या दाखवत दात काढुनी हसती
यमकांच्या जोड्या,शब्दांच्या आगीनगाड्या
'ठेसनी' मनाच्या संप पुकारुन बसती

वल्गना मनाच्या वांझोट्या ठरताना मी
सोडून उसासा कामे उरकाया वळते
मिनिटात दहा मन पुन्हा नव्याने बेटे
स्वप्नास नव्या काव्याच्या बघून चळते......

--अदिती
(११ ऑक्टोबर २००७
भाद्रपद वद्य १४,
शके १९२९)

दिवाळी पहाट

आली पहाट हलके हसऱ्या धुक्याची
अंगी खट्याळ हसरा फुलवीत काटा
दारी दिव्यात उजळे हळुवार नक्षी
तेजाळ थेंब ढळती उजळीत वाटा

अंधार थंड बुजरा लपतोच कोठे
ज्योतीस वात धरता उचलून माथी
तेजात चूर अवघे जग रंगताना
झेपा अनार हिरवे उसळून घेती

एकेक हास्य उजळे प्रतिमा घराची
स्व्प्नातलेच दिसते घरकूल माझे
ये सांगता न असले सुख लाभता हे
डोळ्यांत चंद्रनिवल्या प्रतिबिंब साजे

आकाशदीप डुलतो हसतात झाडे
लावी पहाट टिकली रविरूप भाळी
आनंद नाचत फिरे गगनी,धरेशी
तेजात न्हात बघ ही उतरे दिवाळी!
--अदिती

15 जून 2007

मळभ

खिडकी बाहेरचं दाटलं मळभ
आता मला वेढून टाकतं
आतबाहेर काळोख सारा
वारा येतो, दार लागतं

आभाळाच्या पायथ्याशी
उजेडाचा हात आहे
म्हणून आपलं मानायचं, की,
अजूनही दिवस आहे

मोहमयी जरतारी
कुठल्याच ढगाला नाही कडा
नुसताच आव पावसाचा
आणि रस्ता सगळा कोरडा

पाऊस येईल म्हणताना
क्षण क्षण ढकलायचा
कंटाळ्याचा करडा पक्षी
पुन्हा पुन्हा हाकलायचा

शिणले, थकले डोळे मग
जरा मिटू मिटू होतात
झोप जरा लागत नाही
फक्त कुढणे हेच हातात

घुसमट अशी होते रोज
तरी श्वास सावरायचा
आकाशाचा निळा रंग
पुन्हा करड्यात कालवायचा

मळभ काही हटत नाही
पाऊस काही पडत नाही
पडो बापडा पडेल तेंव्हा...
माझं काही अडत नाही

निर्विकार कोडगेपणा,
बाहेर सगळं कोरडं आकाश
आंधळ्या झालेल्या मनाला
होतात पहाटेचे भास....

(१४ जून २००७,
अधिक ज्येष्ठ अमावास्या,
भारतीय सौर शके १९२९)

28 अप्रैल 2007

हा कल्पांताचा प्रहर जाहला सुरू....

ऐन्यात जिवाच्या दुःखाचे प्रतिबिंब,
डोळ्यातुन वाहे अश्रू ओलाचिंब
रक्तातुन घुमतो आकांतांचा गाव,
पावलोपावली बसे नवा हा घाव
हे भग्न धुमारे वणव्यातुन उरलेले,
हे सत्य वनाच्या हृदयातुन मुरलेले
ही दिशा नसे गं उदसवाणी आज,
विपरीत येथला दिवस येथली सांज
माथ्यावर दिसतो का पुनवेचा चांद,
रवी मध्यान्हीचा खरा,खरा की चांद
कोवळ्या कळ्यांना वारा गाळीत जाई,
वठलेल्या तरूचे भूत नव्हाळीत गाई
जाणीव न उरली आता दुसरी काही,
वेदनांवाचुनी शब्दच उरला नाही
हा कल्पांताचा प्रहर जाहला सुरू
जळणेच राहिले हाती मग भुरुभुरू

--अदिती
५-१०-२००५

5 अप्रैल 2007

रितेपणा...

पुन्हापुन्हा मला गिळून टाकतो रितेपणा
नवीन जागताच आस वाढतो रितेपणा

निशा -उषा धरून पाठ येत जात सारख्या
कणाकणात शून्यताच शोधतो रितेपणा

न आठवे कशा कधी कुठून लोपल्या सरी
क्षणैक मेघ दाटताच भंगतो रितेपणा

वसंत रास खेळतो भरून रंग वाहती
फुलाफुलास गालबोट लावतो रितेपणा

स्वरात खोल वेदना करात फोल आयुधे
उरात बोल आत आत कोंडतो रितेपणा

(५ एप्रिल २००७)

3 जनवरी 2007

शब्द माझ्या अंतरीचे आरसे

आत काही दाटले अंधारसे
शब्द माझ्या अंतरीचे आरसे

ही अवस्था कोणती सांगू कसे?
नाही तिचे कोणीच केले बारसे

जाऊ दे ना ही लढाई संपली
संपले कोठे लढाऊ वारसे

मध्यरात्रीला निमाला तो दिवा
वातीस उरले तेल नव्हते फारसे

स्मरते मला ती वेळ सायंकाळची
दोन तारा बोलल्या गंधारसे

आज माझिया कणाकणात कान जागले.....

आज माझिया कणाकणात कान जागले
चोरपावलातले कुठून नाद बोलले?

अंबरात अंतरात एक बिंब हे कसे?
पाहुनी हसू तुझे मनास खूळ लागले

ज्योत नाचरी दिव्यात झुंबरातली प्रभा
वीज हे तुझेच रूप , तेज होय धाकले

दोन आसवे चुकार सांडली अखेरची
फूल ते मिटायला क्षणात दूर चालले

आज पाहते उभा पुढ्यात काळ वेगळा
सांधतील का कधी नव्यास खंड मागले?

वाट धावते तरी तिला न वाट सापडे
अंत ना तिला मुळी कधी न पाय थांबले

--अदिती(६.१०.०६)

झुळूक

आवाज ना कुणाचा
ही शांत सावली
ही झुळूक नाचरी
खुळी आकाशबावरी

तिची निळीशी काया
तरल सचेतन स्पर्श
फुलाफुलावर फिरते
कणाकणात शिरते

तो पिंपळ हिरवासा
हसतो सोडून मौन
चमचमणाऱ्या टिकल्या
जीर्ण पालव्या पिकल्या

जाते उडवून खट्याळ
उंच टोपी माडाची
खुद्कन आंबा हसतो
तिथे शेवगा रुसतो

ती जाते अल्लड तेंव्हा
एक उसासा सुटतो
मन क्षणभर बावरते
तिला पुन्हा आळवते

करकरत्या खाटेवरती
पुन्हा लागते डुलकी
ती स्वप्नी येऊन जाते
पण खुणा सोडून जाते....

--अदिती(१७.१०.०६)

22 दिसंबर 2006

आंतरजातीय विवाह!

(एका ई-पत्रातून माझ्यापर्यंत आलेली ही कथा. मनोरंजक वाटली म्हणून इथे टंकलिखित करते आहे. मी केलेला तिचा हा स्वैर अनुवाद आहे.)"
.... विवेकदादाच्या लग्नाचा प्रश्न आता ऐरणीवर आला होता. विक्रम और वेताळ मधल्या विक्रमराजासारखे बाबा अथकपणे त्याची पत्रिका घेऊन ज्योतिष्याकडे जायचे. सुंदर, दादाला साजेशा, मुख्य म्हणजे त्याची पत्रिका ज्यांच्याशी जुळायची अशा अय्यर मुलींची यादी घेऊन यायचे. नंतर ती यादी दादाला पाठवून द्यायचे. पण त्याचा आपला कायम नकार असायचा. दादाची म्हणजे सगळी मजामजाच होती. एक पाऊल अमेरिकेत आणि दुसरं कोचीनला ऑफिसात असणाऱ्या दादाला तिसरं पाऊल घरी टाकायला अधूनमधून वेळ मिळायचा हीच आपली गेल्या जन्मीची पुण्याई आहे असं आईचं मत होतं.
तसं आमचं घराणं कर्मठ. बाबा अजूनही रोज कपाळावर गंधाचं त्रिपुंड्र लावायचे. आई सगळे उपास तापास व्रतवैकल्यं न चुकता करायची. आजीचा तर जप दिवसरात्र सुरूच असायचा. त्या दिवशी, कोचीनहून विवेकदादाचा फोन खणखणला तेंव्हा आमच्या घरात तीच सोवळी शांतता नांदत होती. त्या फोनने त्या शांततेला भगदाड पाडलं. दादाने फोन करून बाबांना सांगितलं की त्याची बार्बरा नावाची एक अमेरिकन मैत्रीण काही कामानिमित्त दोन आठवडे त्रिवेंद्रमला येणार होती. तिची राहण्या-जेवण्याची व्यवस्था आमच्या घरी करायचं त्याने तिला कबूल केलं होतं.
दादाचा फोन आल्यापासून साधारण तिसऱ्या दिवशी काहीशा नाखुशीनेच बाबा आणि त्यांच्या मागोमाग मी असे विमानतळावर गेलो. सकाळचे आठ वाजले होते.बाबा, समोरून येणाऱ्या सर्व गोऱ्या मुलींकडे बघायचं टाळत, हातात 'वेलकम बार्बरा' असा फलक घेऊन उभे होते. अखेरीस एक उंच आणि धिप्पाड मुलगी आमच्या दिशेने आली. आळसावलेल्या चेहऱ्याने, इवलीशी ट्रॅव्हल बॅग ओढत ती आमच्याकडे आली तेंव्हा बाबांच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव बघून मला फुटणारं हसू दाबायला मला जाम प्रयास पडले. तिचा वेष तर सगळ्यात नमुनेदार होता. गुडघ्याच्या वर येणारी अर्धी पँट, बिनबाह्यांचा टी शर्ट आणि उंच टाचांचे टॉक टॉक वाजणारे बूट. तिच्या टी शर्टचा गळा इतका खोल होता की तो बघून आईला आणि आजीला नक्कीच झीट येणार या विचाराने मला परत एकदा हसू आवरेना. माझा हात हातात घेऊन ती "हाय वायजयन्ती" असं म्हणाली. मीही तिच्याकडे बघून हॅलो केलं. ती बाबांकडे वळणार इतक्यात कसल्यातरी घाईत असल्यासारखे तिच्या नावाचा तो फलक उचलीत ते पार्किंगच्या दिशेनं चालूही लागले. दोन लहान भारतीय-अमेरिकन मुलं माझा हात धरून अमेरिकन ऍक्सेन्टमधे मला आन्ट वायजयन्ती ,अशी हाक मारताहेत असं चित्र माझ्या मनःचक्षूंपुढे दिसू लागलं. गाडीतही तिच्याकडे बघायचं टाळत बाबांनी जोरात गाडी हाकली. एरवी वाहतुकीचे सगळे नियम पाळणाऱ्या बाबांनी आज किती सिग्नल तोडले हे त्यांच्या लक्षात आलं नाही हेच बरं झालं.आम्ही घरी पोचलो. आई-आजी अंघोळी उरकून शुचिर्भूतपणे सकाळाची स्तोत्रं म्हणत होत्या. बार्बराने एकदम आत जाऊन आईला मिठी मारली. सोवळ्याचं असं पिठलं झालेलं बघून आईचा चेहरा बघण्यासारखा झाला. आईने भराभरा बार्बराला तिच्या खोलीत नेऊन सोडलं आणि तू फ्रेश हो तोवर जेवायची तयारी करते असं म्हणत तिथून काढता पाय घेतला. आजी सवयीने फक्त माळेतले मणी फिरवत होती. जपाचे मंत्र म्हणायचं भानही तिला राहिलं नव्हतं. आणि मी मात्र एकीकडे स्वतःशी हसत, ही सगळी गंमत याहूवर दादाला मिनिट बाय मिनिट रिअल टाईम अपडेट म्हणून सांगत होते.
बार्बरा जेवायला टेबलावर येऊन बसली तेंव्हा तिने कपडे बदलले होते. आत्ताचा तिचा टॉप तर इतका तोकडा होता की बास... "इट्स टू हॉट..." असं म्हणत तिने पानात काय वाढलंय हे बघायला सुरुवात केली. एक तर ती बाबांच्या समोरच बसली होती. त्यातून "आय थॉट वी वुड हॅव इंडियन चिकन " हे तिचं हे वाक्य ऐकून बाबांनी आपली मान जोरजोरात हालवली आणि आढ्याकडे बघायला सुरुवात केली. ही पारा तापमापक फोडून बाहेर पडण्याइतका चढला आहे याची खूण आहे आम्हाला सवयीने माहीत होतं. पण याची काहीच कल्पना नसल्याने बार्बराने आपलेच घोडे दामटले.' यू नो व्हॉट गोज वेल विथ इंडियन चिकन? इंडियन बियर' असं म्हणून एक बियरची बाटली टेबलावर ठेवली. आता मात्र बाबा तिथून निघूनच गेले. आईने तिला 'आम्ही कर्मठ ब्राह्मण आहोत, आम्ही मांस खात नाही वगैरे जुजबी समजूत घातली आणि कशीबशी जेवणं उरकली.
दुपारी चहाच्या वेळी ती आपल्या खोलीतून बाहेर आली. तिने लॅपटॉप सुरू केला आणि दादाचे फोटो दाखवायला सुरुवात केली. समुद्रकिनाऱ्यावर पोहोण्याच्या पोषाखात दादा आणि अत्यंत तोकडे कपडे घालून त्याला खेटून उभी असलेली बार्बरा पाहून आई-आजीला धरणी आपल्याला पोटात घेईल तर बरे असं वाटायला लागलंय हे स्पष्ट दिसत होतं. पुढचे फोटो पाहणं नको म्हणून बाबा बाहेर निघून गेले. आई स्वयंपाकघरात गेली आणि आजीने डोळे मिटून जप करायला सुरुवात केली. दोन दिवसात आमच्या घरातलं वातावरणच बदललं. दादाने जर या बयेशी लग्न केलं तर काय होईल या चिंतेने आईला रात्री झोप लागेनाशी झाली. केवळ पाहुण्यांशी नीट वागलं पाहिजे म्हणून आई सगळं ओढत होती. बार्बराच्या परत जाण्याच्या दिवसाची सगळेच वाट बघत होते. या सगळ्यावर कळस ठरणारी गोष्ट दुसऱ्या दिवशी सकाळी घडली. सकाळी अंघोळीला म्हणून बार्बरा मोरीत शिरली आणि आतून कोरड्या ओकाऱ्यांचे आवाज यायला लागले तेंव्हा मात्र आजीने हाय खाल्ली. आमच्याकडे लग्नाआधी मुलं झालेली चालत नाहीत वगैरे गोष्टी बार्बराला कशा समजावून सांगायच्या या विचाराने आईची अवस्था अगदी वाईट झाली. उरलेला वेळ भयंकर तणावाखाली गेला. आजीने "विवेकला सद्बुद्धी मिळावी" म्हणून विश्वेश्वराला नवस बोलायला सुरुवात केली. बार्बरा सून म्हणून घरी आली आहे या कल्पनेनेच आई बाबांचे चेहरे उतरले. नकळत काही दिवसांपूर्वी घडलेला प्रसंग मला आठवला. माझ्या आत्याच्या मुलाने एका तेलुगू ख्रिश्चन मुलीशी पळून जाऊन लग्न केल्यामुळे घरात हाहाःकार उडाला होता. आत्या धाय मोकलून रडत होती आणि बाबा तिच्या अकलेचा उद्धार करत होते.
"याच्यासाठी मुलांना फालतू स्वातंत्र्य द्यायचं नसतं..."
"दादा, ही वेळ तुझ्यावर येईल तेंव्हा कळेल तुला..."
"माझ्या मुलाने जर असं काही केलं तर मी त्याच्या तोंडावर दार धडकवून त्याला घराबाहेर हाकलून देईन..."
"बघू या काय होतंय ते.."
आता हा प्रकार आत्याच्या कानावर गेल्यावर ती कशी हसेल याच्या कल्पनेने मला फुटलेलं हसू लपवायला मला टेबलाखाली लपावं लागलं.
अखेरीस बार्बराचा परत जाण्याचा दिवस उजाडला. डोक्यावरून एखादं मणामणाचं ओझं उतरावं अशा आविर्भावात बाबा तिला घेऊन विमानतळावर निघाले. तिला सोडून घरी परत आल्या आल्या दादाला फोन करायचा असा त्यांनी निश्चय केला होता.
गंमत म्हणजे दादाचाच फोन आला. त्याची कॉलेजमधली मैत्रीण कोचीनमधे एका कॉन्फरन्ससाठी येणार होती. हैदरबादला एका प्रथितयश संस्थेत ती चाईल्ड सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करत होती. तिचं नाव डॉ. समीरा शेख. ती दोन दिवसांनंतर येणार होती. दादाने तिचीही काही दिवस आमच्या घरी राहण्याची व्यवस्था केली होती. दादाने तिला आणायला जायची बाबांना गळ घातली. नाईलाजाने बाबा हो म्हणाले. मग काय दोन दिवसांनी पुन्हा एकदा बाबा आणि मी विमानतळावर हातात 'वेलकम समीरा' चा फलक घेऊन उभे. थोड्या वेळाने नाजूक नक्षीचं भरतकाम केलेला सुंदर सलवार कुडता घातलेली एक मुलगी आमच्या दिशेने आली. तिचे केस खूप लांब आणि सुंदर होते. छानसं हसत तिने बाबांकडे बघून हात जोडले.
"नमस्कार" ती म्हणाली. बाबा एकदम खूश झाले.
"नमस्कार!"
"कशी आहेस वैजयन्ती?"
"मजेत आहे" आम्ही घरी आलो.
आता आपल्यापुढे कोणतं ताट वाढून ठेवलं आहे या काळजीने अर्धमेल्या झालेल्या आई-आजीने सोडलेला निःश्वास मला कळला. आत आल्याआल्या तिने आजीला वाकून नमस्कार केला आणि पिशवीतून एक सुरेखशी शाल काढून तिच्यासमोर ठेवली. समीराने आईसाठी साडी आणि माझ्यासाठी हैदराबादी बांगड्या आणल्या होत्या.
"असंच गंमत म्हणून..." असं पुटपुटत ती हात-पाय धुवायला गेली. थोड्या वेळाने आईने जेवायला हाक मारली. समीरा माझ्या शेजारी बसली होती. पानात वाढलेले पदार्थ पाहून ती छान हसली.
"सांबार फारच सुंदर झालंय... मला कधीच जमत नाही असं सांबार..." समीरा आईला म्हणाली.
"त्यात काय मी शिकवीन की तुला..." आजवर आईने कोणत्याही मुसलमान माणसाला तिच्या स्वयंपाकघराचा उंबरा ओलांडू दिला नव्हता. पण त्या दिवशी दुपारी सगळं काही धुडाकावून लावत समीराला घेऊन आई स्वयंपाकघरात गेली आणि अस्सल अय्यर सांबार कसं करायचं हे तिला शिकवायला आईने सुरुवात केली. दोन दिवस देवघरापासून समीरा कटाक्षाने दूर रहात होती. तिसऱ्या दिवशी बाबांनी आपणहून तिला हाक मारली आणि आपल्या देव्हाऱ्यातल्या मूर्ती तिला कौतुकाने दाखवायला सुरुवात केली. आपल्याला कुठल्या मूर्ती वारशाने कशा मिळाल्या हे तिला सांगण्यात ते अगदी रंगून गेले होते.
समीरा घरी आल्याला तीन दिवस उलटून जातात न जातात तोच विवेकने बायको म्हणून हिचीच निवड करावी असे नवस बोलायला सुरुवात झाली होती. त्या आठवड्यातल्या शनिवारी अचानक जेंव्हा दादा घरी आला तेंव्हा तर समीराचं 'स्थळ' त्याच्यासाठी खुद्द आईबाबांनीच पसंत केलं असावं अशा आविर्भावात त्यांनी तिची दादाशी ओळखही करून दिली. माझी मात्र हसता हसता अक्षरशः पुरेवाट झाली होती.
दोन महिन्यांनी दादा आणि समीराचं लग्न झालं.रिसेप्शनच्या वेळी अमेरिकेतून दादाच्या सेक्रेटरीने म्हणजेच बार्बराने एक मोठ्ठा फुलांचा गुच्छ खास तिकडून पाठवला होता. त्याला जोडलेल्या कार्डावर लिहिलं होतं
"फ्लॉवर्स २ डॉलर
पोस्टेज १० डॉलर
ट्रिप टु इंडिया १५०० डॉलर
इंडियन व्हॅल्यूज प्राईसलेस"

--अदिती

गाजराची पुंगी!

कधी जायचा निघून विखार
कधी यायचे फुलून शिवार

नवी मागणी हरेक क्षणात
पुरे व्हायचा कुठून पगार

तुला पाहता उदास मनात
पुन्हा यायचे भरून विकार

तुला पाहता समोर क्षणात
पुन्हा जायचे पळून विचार

नवा डाव हा , जरी जन तेच
करा तोच ओरडून प्रचार !

--अदिती(१९ ऑक्टोबर २००६)
धनत्रयोदशी, शके १९२८