29 जून 2010

ब्रूस पार्टिंग्टन प्लॅन्स(४)


अपेक्षेप्रमाणे बेकर स्ट्रीटवरच्या घरात एक सरकारी शिपाई एक चिठ्ठी घेऊन आमची वाट पहात होता. होम्सने त्यावरून नजर फिरवली आणि तो कागद माझ्याकडे दिला.

'सध्या चिलटांची संख्या तशी भरपूर आहे पण इतकं मोठं प्रकरण हाताळू शकणारे मोठे किडे त्या मानाने थोडे आहेत. यातले सध्या विचारात घेण्याजोगे लोक म्हणजे

ऍडॉल्फ मेयर : १३ ग्रेट जॉर्ज स्ट्रीट, वेस्टमिन्स्टर,
लुईस ल रोथिअर : कॅंपडेन मॅन्शन, नॉटिंग हिल आणि
ह्यूगो ऑबरस्टिन : १३ कोल्फिल्ड गार्डन्स, केंझिंग्टन.
यातला ह्यूगो सोमवारी शहरातच होता आणि आता देशाबाहेर आहे अशी खबर आहे. तुला आशेचा काही किरण दिसतो आहे हे ऐकून आनंद झाला. तुझ्या रिपोर्टची वाट सगळं मंत्रीमंडळ बघतंय. वरपासून लोकांचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत. तुला गरज पडली तर देशातली सगळी संरक्षक फळी तुझ्या पाठीशी उभी रहायला सज्ज आहे.
--मायक्रॉफ्ट.'


"दुर्दैवाने राणीचे सगळे घोडे आणि राणीचे सगळे सैनिक सुद्धा मला मदत करू शकणार नाहीत." हम्प्टी डम्प्टी कवितेतली ती प्रसिद्ध ओळ उद्धृत करत तो म्हणाला. त्याने लंडन शहराचा नकाशा टेबलावर पसरला आणि त्याच्यावर ओणव्याने वाकून तो उभा राहिला.

"वा. क्या बात है!" समाधानाचा एक सुस्कारा सोडत तो म्हणाला. "परिस्थिती एकदाची आपल्या दिशेने वळायला लागलेली आहे. वॉटसन, बहुतेक आपण योग्य ते सूत्र पकडून ते ओढू शकू. "
अचानक हर्षवायूचा झटका आल्यासारखं हसत माझ्या पाठीवर त्याने एक जोराची थाप मारली.
"मी जरा बाहेर जाऊन येतो. घाबरू नकोस तुला घेतल्याशिवाय मी कुठलंही काम करणार नाही. शेवटी तू माझा सगळ्यात जवळचा मित्र आणि चरित्रकार आहेस. मला यायला तासाभरापेक्षा जास्त वेळ लागला तर तुझी वही उघड आणि तू देशाला कसं वाचवलंस ते लिहून काढायला सुरुवात कर. तवर मी येतोच..."
या त्याच्या उत्साहाचा परिणाम माझ्यावर झाल्यावाचून कसा राहील? एरवीच्या गंभीर होम्सकडे बघता त्याच्यात झालेला एवढा बदल हे खरंच कुठल्यातरी चांगल्या गोष्टीचं लक्षण होतं. नोव्हेंबर महिन्यातली ती संध्याकाळ इतकी कंटाळवाणी आणि न संपणारी होती तरीही मी अतिशय उत्सुकतेने त्याची वाट पहात होतो. शेवटी नऊ वाजता एक माणूस त्याचा निरोप घेऊन आला. त्यात असं लिहिलं होतं:

'मी गोल्डिनि रेस्टॉरन्ट, ग्लुसेस्टर रोड, केन्झिन्गटन इथे जेवायला तुझी वाट पाहातो आहे. तू लौकरात लौकर इकडे ये. आंणि येताना एक जेमी, एक कंदील, एक चिझेल आणि एक रिव्हॉल्व्हर घेऊन ये.

एस. एच.'

बाहेर साठलेलं धुकं आणि विचित्र अंधारी हवा यामुळे एखादा सभ्य निरुपद्रवी माणूस जर या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन गेला तर त्यात कोणालाच काही वावगं वाटलं नसतं. मी काळजीपूर्वक माझ्या ओव्हरकोटाच्या आतल्या खिशांमधे या वस्तू ठेवल्या आणि सरळ सांगितलेल्या ठिकाणाची वाट धरली. तिथे एका जुनाट इटालिअयन रेस्टॉरंटमधे दाराजवळच एका लहान गोल टेबलापाशी माझा मित्र माझी वाटच पहात बसला होता.

"तुझं खाणं झालंय म्हणतोस? मग आपण कॉफी घेऊ. इथल्या सिगार्स चांगल्या आहेत. कमी विषारी. बरं तू हत्यारं आणलीयेस ना?"
"ही काय. माझ्या ओव्हरकोटाच्या खिशात"
"छान. आता मी तुला आत्तापर्यंत मी काय काय केलंय आणि यापुढे काय करायचंय हे सांगतो.
वॉटसन, तुला मी मागेच म्हणालो होतो की कडोगन वेस्टचा मृतदेह गाडीच्या टपावरून खाली पडला. ज्या क्षणी ही गोष्ट माझ्या लक्षात आली की तो मृतदेह गाडीतून नव्हे तर टपावरून खाली पडला होता त्याच क्षणी हेही माझ्या लक्षात आलं की तो तिथे ठेवण्यात आला होता."
"तो पुलावरून खाली टाकला गेलेला असू शकतो का?"
"नाही. तशी शक्यता आजिबात नाही. तू जर एखाद्या डब्याचं टप नीट पाहिलंस तर तुझ्या असं लक्षात येईल की ते किंचित वर्तुळाकार आहे आणि त्याच्या आजूबाजूल रेलिंगसारखं काही नाही. त्यामुळे आपण असं खात्रीपूर्वक म्हणू शकतो की तो मृतदेह तिथे ठेवण्यात आला होता."
"पण कसा?"
"याच प्रश्नाचं उत्तर मला शोधायचं होतं. तुला माहीतच आहे की भुयारी रेल्वेमार्गावर वेस्ट एन्डजवळच्या काही भागात बोगदा नाहीये. या मार्गाने प्रवास करत असताना गाडीच्या टपाला वरच्या बाजूने जवळजवळ लागूनच काही खिडक्या पाहिल्याचं मला अंधुकसं आठवत होतं. आता अशी कल्पना कर की अशा एखाद्या खिडकीच्या खाली गाडी उभी असताना, तो मृतदेह टपावर ठेवणं हे कितपत अवघड जाईल?"
"पण हे किती अतर्क्य वाटतं आहे..."
"वॉटसन, जेंव्हा आपल्याकडे असलेल्या सर्व शक्यता संपतात तेंव्हा मागे राहिलेला पर्याय कितीही अशक्य कोटीतला वाटला तरीही तोच खरा असला पाहिजे हे तुला माहीत आहे. इथे आपल्याकडच्या सगळ्या शक्यता संपल्या आहेत. आपल्या प्रमुख संशयित हेरांपैकी एक, जो नुकताच लंडन शहराबाहेर गेला आहे तो भुयारी मार्गालगतच्या एका वसाहतीतच रहात होता हे मला कळल्यावर मला किती हर्षवायू झाला होता हे पाहून तू आश्चर्यचकित झालास. "
"अच्छा. असा प्रकार होता तर तो..."
"होय. १३ कॉलफिल्ड रोड इथे राहणारा ह्युगो ऑबर्स्टिन हा माझ्या हालचालींचं केंद्र बनला. मी ग्लुसेस्टर रोड स्टेशनवर येऊन माझ्या कामाला सुरुवात केली. स्टेशनवरच्या एका अतिशय तत्पर अधिकाऱ्याने माझ्या बरोबर येऊन कॉलफिल्ड गार्डन्स वसाहतीतल्या घरांच्या मागच्या बाजूच्या खिडक्या मला प्रत्यक्ष दाखवल्या. एवढंच नाही तर, त्यापुढे जाऊन त्याने मला एक मोलाची बातमी दिली, ती अशी की भुयारी मार्ग आणि साधा रेल्वेमार्ग हे एकमेकांना छेदून जात असल्यामुळे त्याच विवक्षित ठिकाणी भुयारी गाड्या बरेचदा बराच वेळ तिथे उभ्या असतात."
"अ प्र ति म! होम्स तू बाजी मारलीस की!"
"इथपर्यंत ठीक आहे वॉटसन. आपण प्रगती करतोय. पण आपलं ध्येय अजून खूप लांब आहे. असो. तर कॉलफिल्ड गार्डन्सच्या मागच्या भागाची पाहणी करून झाल्यावर मी पुढूनही जाऊन या गोष्टीची खातरजमा केली की आपलं पाखरू घरट्यात नाही. ते घर तसं वैशिष्ट्यपूर्ण आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे तिथलं फर्निचर फक्त घराच्या वरच्या मजल्यावर ठेवलेलं आहे. ऑबरस्टिन त्याच्या एकाच हरकाम्या नोकराबरोबर तिथे रहात होता. बहुधा हा नोकर त्याचाच विश्वासू हस्तक असेल. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की ऑबरस्टिन त्याचं डबोलं पोचवण्यासाठी देशाबाहेर गेलेला आहे. पण त्याला अटक होईल अशी साधी शंकाही त्याच्या मनात नसणार. त्याच्या घरी एखादी लहानशी घरफोडी घडून येईल असं त्याला स्वप्नातही वाटलं नसेल....
आत्ता आपण तेच करणार आहोत!"
"आपण एखादं वॉरंट मिळवून कायदेशीर झडती घेऊ शकणार नाही का?"
"आपल्याकडे काहीच पुरावा नाही."
"नक्की काय करायचंय आपल्याला?"
"तिथे संपर्काची कुठली माध्यमं असू शकतील आपल्याला माहीत नाही..."
"होम्स मला हे पसंत नाही..."
"अरे बाबा, तू फक्त रस्त्यावर उभं राहून नजर ठेवायचीस. घरफोडीचं काम मी करणार आहे. ही वेळ नैतिक गोष्टींबद्दल विचार करत बसण्याची नाही. मायक्रॉफ्ट, कॅबिनेट, नौदलाचं ऑफिस आणि इतर कितीतरी लोक आपल्याकडे आशेने डोळे लावून बसले आहेत. आपल्याला गेलंच पाहिजे."
यावर उत्तरादाखल मी खुर्चीतून उठून उभा राहिलो.
"खरंय तुझं म्हणणं होम्स. आपल्याला गेलंच पाहिजे..."
तो एकदम उठून उभा राहिला. त्याने माझा हात हातात घेतला.
"वॉटसन,मला माहीत होतं तू या गोष्टीला नक्की तयार होशील." एक क्षणभर त्याच्या डोळ्यात त्याच्या स्नेहार्द्र मनाचं प्रतिबिंब थरथरताना मला दिसलं. आजवर मला मिळालेली त्याच्या स्नेहाची ही सगळ्यात मोठी पावती होती. पण क्षणभरातच त्याच्यातला तो कार्यशील माणूस पुन्हा जागा झालेला मला दिसला.
"ते ठिकाण इथून अर्ध्या मैलावर आहे. पण घाई करण्यासारखं काही नाहीये. आपण चालतच जाऊ. चुकूनसुद्धा हत्यारं खाली पडू देऊ नकोस. आत्ता या वेळी संशयास्पद परिस्थितीमधे तुला जर अटक झाली तर भलतीच आफत ओढवेल..."
कॉल्फिल्ड गार्डन्स म्हणजे लंडनच्या वेस्ट एन्ड भागातल्या मध्य विक्टोरियन युगाचं ठळक प्रतीक असणाऱ्या मोठे मोठे खांब असलेल्या वैषिष्ट्यपूर्ण वास्तुशैलीतल्या घरांच्या ओळीतली आणि परिसराला शोभेश्या सर्व वस्तुवैशिष्ट्यांनी नटलेली एक इमारत होती.त्याच्या शेजारच्या घरातून मुलांच्या हसण्या खिदळण्याचे आणि पियानोवर वाजवल्या जाणाऱ्या संगीताचे आवाज येत होते. तिथे बहुधा एखादी लहान मुलांची पार्टी चाललेली असावी.धुकं अजूनही रेंगाळत होतं. त्याच्या पडद्यातून होम्सने आपल्या हातातला कंदील त्या घराच्या प्रचंड दरवाज्यावर उजेड पडेल असा धरला.
"हम्म ही जरा अडचणीची गोष्ट आहे. या दाराला कुलूप लावलेलं आहे आणि कड्याही घातलेल्या आहेत. मला वाटतं, आपल्याला एरियामधे*२ जावं लागेल. शिवाय एखाद्या अतिउत्साही हवालदाराने आपल्या कामात अडथळा आणू नये म्हणून खाली जायला एक छान बंदिस्त वाट आहे तिथे आपल्याला लपता येईल. चल मला खाली जायला मदत कर आणि मी तुला खाली ओढून घेतो.
मिनिटभरातच आम्ही एरियामधे होतो आणि तेंव्हाच एका पोलीस हवालदाराच्या पावलांचा आवाज आमच्या डोक्यावरून दूर गेला.होम्सने खालच्या दाराचे स्क्रू काढायला सुरुवात केली त्याला बरीच ताकद लावायला लागत होती पण अखेरीस एक जोरदार आवाज करत ते उघडलं गेलं. आम्ही आत गेलो आणि ते दार आतून लावून घेतलं. होम्सने हातात धरलेल्या कंदिलाच्या प्रकाशात आम्ही एका गोल जिन्यावरून वर जायला सुरुवात केली. कंदिलाच्या प्रकाशात आम्हाला एक जमिनीलगतची खिडकी दिसली.
"ही बघ वॉटसन, हीच ती खिडकी असणार..." त्याने ती खिडकी उघडली आणि त्याच क्षणी बाहेरून एक हलकासा आवाज यायला लागला आणि काही क्षणातच कानठळ्या बसतील इतका वाढला. धडधड आवाज करत एक भुयारी गाडी अंधारातच आमच्या समोरून निघून गेली. होम्सने खिडकीच्या तावदानावर प्रकाश पडेल अशा बेताने कंदील पुढे नेला. ते तावदान गाड्यांच्या चिमण्यांमधून उडणाऱ्या धुराच्या काजळीने भरलं होतं पण त्या काळ्या पृष्ठभागावर मधून मधून काजळी पुसली गेल्याच्या खुणा होत्या.
"त्यांनी ते प्रेत कुठे ठेवलं होतं त्याच्या खुणा दिसतायत बघ... अरेच्या! हे बघ काय आहे.खात्रीने हा रक्ताचा डाग आहे. " खिडकीच्या लाकडी चौकटीला पडलेल्या एका फिक्या डागाकडे त्याने निर्देश केला. "आणि जिन्याच्या दगडावरही डाग आहे ! आपली तपासणी झाली. आपण एखादी ट्रेन इथे थांबेपर्यंत वाट पाहू या.."
आम्हाला फार वेळ वाट पहावी लागली नाही. पुढचीच गाडी रोरावत बोगद्यातून बाहेर आली पण तिचा वेग कमी कमी झाला आणि आमच्या समोरच ती थांबली. खिडकीची चौकट आणि गाडीचं टप यांच्यात चार फुटाचंदेखील अंतर नव्हतं. होम्सने हळूच ती खिडकी बंद केली.
"आत्तापर्यंतच्या गोष्टी तर सगळ्या पटण्याजोग्या दिसताहेत. वॉटसन, तुझं काय म्हणणं आहे यावर?"
"बिनतोड! ही तुझी आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे! "
"नाही मला तुझं म्हणणं मान्य नाही. मृतदेह गाडीच्या टपावरून खाली पडला असावा ही शक्यता माझ्या लक्षात येणं ही काही फार मोठी गोष्ट नव्हती आणि ज्या क्षणी ती माझ्या डोक्यात आली त्या क्षणापासून हे पुढचं सगळं अपरिहार्यच होतं. जर हे प्रकरण इतकं गंभीर नसतं तर आपला इथवरचा प्रवास फारच क्षुल्लक ठरला असता. आपले प्रश्न अजून संपलेले नाहीत पण आपल्याला इथे काहीतरी महत्त्वाची वस्तू सापडेल अशी शक्यता आहे."
स्वयंपाकघराकडे जाणारा जिना चढून आम्ही पहिल्या मजल्यावरच्या खोल्यांजवळ आलो.एका खोलीत जेवणघर होतं. फारच वाईट पद्धतीने दुर्लक्षित आणि महत्त्वाचं असं काहीच नसणारं. मग एक झोपयची खोली होती पण तीही रिकामी होती. उरलेली एकमेव खोली मात्र बरीच उपकारक ठरली. होम्सने तिची काळजीपूर्वक आणि तपशीलवारपणे तपासणी केली. तिचा उपयोग स्टडी म्हणून केला जात असणार कारण जिकडेतिकडे पुस्तकं आणि कागद पसरलेले होते. पद्धतशीरपणे तरीही भराभर होम्सने सगळे ड्रॉवर्स आणि कपाटं मोकळी केली पण त्यात महत्त्वाचं असं काही सापडलं नाही. त्याच्या गंभीर चेहऱ्यावरचं चिंतेचं सावट हटलं नाही. एक तासानंतरही तो तसाच चिंतित दिसत होता.
"त्याने त्याचा माग पुसून टाकलाय. त्याला अडचणीत आणू शकणारा पत्रव्यवहार नष्ट केलाय. ही आपली शेवटची संधी होती."
लिहिण्याच्या टेबलावर एक पत्र्याची पैशांची पेटी होती. आपल्या कानशीच्या मदतीने होम्सने ती उघडली. आत अनेक कागदपत्रांच्या सुरनळ्या होत्या. त्यांच्यावर चित्रविचित्र संख्या, हिशेब अणि आकडेमोडी होत्या पण हे सगळं कशासंदर्भात होतं हे कळायला काहीच मार्ग नव्हता. पण जिथे तिथे दिसणाऱ्या 'पाण्याचा दाब' आणि 'प्रति चौरस इंच दाब' या शब्दांवरून असं वाटत होतं की त्यांचा पाणबुडीशी काहीतरी संबंध असावा. होम्सने वैतागाने ते कागद बाजूला सारले. त्यांच्या खाली फक्त एका पाकिटात काही जाहिराती कापून ठेवलेल्या होत्या. होम्सने ती सगळी कात्रणं बाहेर काढून समोर पसरली. त्याच्या चेहऱ्यावर प्रकटलेली उत्सुकता पाहून त्याला काहीतरी मिळालंय हे मी ओळखलं.
"वॉटसन, हे काय असेल? हा? याच्या टाईपावरून आणि आकारावरून असं वाटतंय की डेली टेलिग्राफ वर्तमानपत्राच्या ऍगनी कॉलमची कात्रणं असावीत ही.पानाचा उजव्या हाताचा वरचा कोपरा. तारखा नाहीयेत. पण हे संदेश ओळीनेच ठेवलेले दिसताहेत. हा बघ. हा पहिला असणार "

अटी मान्य आहेत. पत्राची वाट पाहतोय, लौकर कळवा. कार्डावर दिलेल्या पत्त्यावर सविस्तर लिहा.

पिएरॉट


पुढचा संदेश


वर्णन करून सांगणे अवघड आहे. सखोल रिपोर्ट हवा आहे. मोबदला तयार आहे वस्तू पोचवल्यात की मिळेल.

पिएरॉट


मग हा -


घाई करा. अटी पूर्ण झाल्या नाहीत तर ठरलेला मोबदला रद्द करावा लागेल. पत्र पाठवून अपॉईंटमेंट घ्या. मी जाहिरातीद्वारे कळवीन

पिएरॉट


आणि शेवटचा संदेश -


सोमवारी रात्री नऊ नंतर. दोनदा थाप ही खूण. संशयास्पद असं काही वागू नका. वस्तू मिळताच रोख मोबदला

पिएरॉट


"वा! चांगलीच आहे नोंद. परिपूर्ण! जर आपल्याला या दुसऱ्या बाजूकडल्या माणसाला गाठता आलं तर किती बरं होईल" टेबलाच्या पृष्ठभागावर आपली बोटं नाचवीत तो काही वेळ विचारमग्न बसूनच राहिला. शेवटी तो उठला.

"कदाचित ही गोष्ट तितकी अवघड जाऊ नये... चल वॉटसन, आपलं इथलं काम संपलं आहे. आता आपण डेली टेलिग्राफच्या ऑफिसमधे जाऊ आणि तिथून सरळ घरी जाऊ. आजचा दिवस बराच चांगला गेला आहे.."

--अदिती
(तळटीप २ : एरिया म्हणजे काय याचा गूगलवर शोध घेतल्यावर बांधकामाच्या परिभाषेत 'एरिया म्हणजे तळघरातल्या खोल्यांमधे हवा-उजेड पोचण्यासाठी घराभोवती असलेला मोकळा खंदकासारखा भाग' अशी माहिती मिळाली.(an excavated area around the walls of a building, designed to admit light into its basement )
त्यापुढे जाऊन शोध घेतल्यावर जी माहिती मिळाली ती इथे वाचता येईल.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें