29 जून 2010

ब्रूस पार्टिंग्टन प्लॅन्स(३)

"या दुपारच्या वेळात आपल्याला काही लोकांना भेटायचं आहे आणि त्यातला पहिला मान आपण सर जेम्स वॉल्टरना द्यायला हवा."
थेम्स नदीच्या अगदी काठावर असलेल्या एका पांढऱ्याशुभ्र आणि सुंदर हिरवळींनी नटलेल्या प्रचंड मोठ्या वाड्यात सर जेम्स यांचं निवासस्थान होतं. आम्ही तिथे पोचलो तोवर धुकं निवळायला लागलं होतं आणि एक जीव नसलेला फिकट सूर्यप्रकाश पसरायला लागला होता. आम्ही घंटा वाजवली. एका बटलरने दार उघडलं.
"सर जेम्स, सर?" दुःखी चेहऱ्याने तो म्हणाला," आज पहाटे सर जेम्स वारले .."
"देवा रे!" होम्सला आश्चर्याचा धक्का बसला. "कसे काय गेले ते?"
"तुम्ही आत येऊन त्यांच्या बंधूंची, कर्नल व्हॅलेंटाईन यांची भेट का घेत नाही?"
"बरोबर आहे. आम्हाला त्यांची भेट घ्यायला हवी."
त्याने आम्हाला एका मंद प्रकाश असलेल्या बैठकीच्या खोलीत नेले. काही क्षणातच आमची आणि कर्नल व्हॅलेंटाईन यांची भेट झाली. ते साधारण पन्नाशीचे, उंच, देखणे होते. त्यांनी लहनशी दाढी राखलेली होती. त्यांचे तारवटलेले डोळे, लालबुंद गाल आणि विस्कटलेले केस यांच्यावरून त्यांच्यावर अचानक केवढा आघात झाला होता याची कल्पना येत होती. त्यांना नीटपणे बोलताही येत नव्हतं.
"हे प्रकरण फारच बदनामीकारक आहे. माझे बंधू सर जेम्स त्यांच्या कीर्तीला अतिशय जपत असत. हा धक्का त्यांना सहन झाला नाही. त्यांना त्यांच्या खात्याच्या कार्यक्षमतेबद्दल अतिशय अभिमान होता. .."
"ही गुंतागुंत सोडवायला त्यांनी आम्हाला मदत केली असती अशी मला फार आशा होती."
"मी सांगतो तुम्हाला... त्यांनाही हे तितकंच अतर्क्य होतं जितकं तुम्हाला आणि मला. त्यांना माहीत असलेल्या सगळ्या गोष्टी त्यांनी यापूर्वीच पोलिसांना सांगितल्या होत्या. त्यांचं असं मत होतं की कडोगन वेस्ट हाच खरा गुन्हेगार आहे. पण याहून जास्त काही तेही सांगू शकले नाहीत."
"तुम्ही या प्रकरणाबाबत अधिक तपशीलाने काही सांगू शकाल का?"
"जे काही माझ्या वाचनात आलंय किंवा कानावर पडलंय ते सोडल्यास मला याबाबतीत काहीही माहीत नाही. आणि मि. होम्स मी तुमच्याशी उद्धटपणाने वागतो आहे असं कृपा करून समजू नका पण सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन तुम्ही ही भेट आवरती घ्याल तर बरं होईल अशी माझी तुम्हाला विनंती आहे."
आम्ही पुन्हा टॅक्सीत बसल्यावर होम्स मला म्हणाला," हा धक्का खरंच अनपेक्षित होता. त्यांना निसर्गतः मृत्यू आला की त्यांनी आत्महत्या केली कोण जाणे. जर त्यांनी आत्महत्या केली असेल तर कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांचं मन त्यांना खाऊ लागलं म्हणून केली असेल का? सध्या तरी हा प्रश्न आपण येणाऱ्या काळावर सोपवू आणि कडोगन वेस्टकडे मोर्चा वळवू."
कडोगन वेस्टचं घर गावाबाहेर, लहानसं पण नीटनेटकं होतं. तिथे त्याच्या वृद्ध आणि शोकमग्न आईची आणि आमची भेट झाली. अचानक कोसळलेल्या या प्रसंगामुळे तिला इतका धक्का बसला होता की ती आम्हाला काहीच सांगू शकली नाही. पण तिला मदत करायला एक फिकट चेहऱ्याची तरूण मुलगी आली होती. तिने आपली ओळख मिस व्हायोलेट वेस्टबरी अशी करून दिली. ती कडोगनची होणारी बायको होती. त्या रात्री त्याला शेवटचं जिवंतपणी तिनेच पाहिलं होतं.
"मि. होम्स, मी तुम्हाला कशाचाच अर्थ सांगू शकणार नाही. त्या रात्रीपासून माझ्या डोळ्याला डोळा लागलेला नाही. या झाल्या प्रकाराचा अर्थ लावण्याचा मी सतत प्रयत्न करते आहे. दिवसरात्र तेवढ्या एकाच विषयाचा भुंगा माझ्या डोक्याला सतत लागलेला आहे. त्याच्याकडे विश्वासाने सोपवलेली कागदपत्रं अशी सौदा करण्यासाठी कोणाच्या हातात देण्यापूर्वी त्याने आपला हात तोडून टाकला असता. हा सगळा प्रकारच निरर्थक आणि अशक्य कोटीतला आहे."
"पण मिस व्हायोलेट, आपल्या हातात असलेल्या पुराव्यांचं काय?"
"खरं आहे. मी ते खोडू शकणार नाही."
"त्याला पैशांची काही अडचण वगरे होती का?"
"नाही. आजिबात नाही. त्याच्या गरजा अगदी साध्या होत्या आणि त्याच्या पगारात त्याचं अगदी छान भागत असे. त्याने काहीशे पौंड्स साठवले होते आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला आम्ही लग्न करणार होतो."
"त्याची कधी मानसिक चलबिचल वगरे झाल्याचं तुमच्या पाहण्यात आलं होतं का? कृपा करून मला खरी खरी माहिती द्या मिस व्हायोलेट..."
माझ्या मित्राची नजर करडी होती. तिच्या वागण्यातला बदल त्याने अचूक टिपला. तिचा चेहरा आरक्त झाला होता आणि ती संभ्रमात पडली होती.
"होय." अखेरीस ती म्हणाली. "त्याच्या मनात काहीतरी होतं असं मलाही वाटलं होतं..."
"कधीपासून?"
"गेला आठवडाभर तो सतत कसल्यातरी विचारात असायचा. मी त्याला त्याबद्दल विचारलं तेंव्हा तो म्हणाला की त्याच्या ऑफिसमधे काहीतरी झालंय. तो म्हणाला होता की इतक्या लौकर मी तुलाही त्याबद्दल काही सांगू शकत नाही. यापेक्षा जास्त काही मला समजू शकलं नाही"
होम्सचा चेहरा चिंताग्रस्त दिसायला लागला.
"पुढे बोला मिस वेस्टबरी, जरी तुम्हाला अशी भिती वाटली की तुम्ही त्याच्याविरुद्ध बोलताय तरीही तुम्ही बोला. आपल्याला माहीत नाही यातून काय निघेल ते.."
"खरं आहे. पण यापेक्षा जास्त सांगण्यासारखं असं माझ्याकडे काही नाही. एक-दोनदा मला असं वाटलं की तो मला ती गोष्ट सांगून टाकायच्या विचारात होता. एक दिवस संध्याकाळी तो मला त्या गुप्त गोष्टीचं महत्त्व सांगत होता. तो असंही म्हणाल्याचं मला आठवतंय की परकीय हेर ती गुप्त गोष्ट मिळवण्यासाठी खूप मोठी रक्कम द्यायला तयार होतील.
होम्सचा चेहरा आणखी गंभीर झाला.
"अजून काही?"
"तो म्हणाला, या बाबतीत आपण बऱ्याच ढिलाईने वागतो आहोत. ज्यामुळे फितुराला त्या प्लॅन्सपर्यंत पोहोचणं फारसं अवघड जाणार नाहीये."
"तो हे म्हणाला ही गोष्ट अलिकडली आहे?"
"हो अगदी अलिकडली"
"आता त्या दिवशी सांध्याकाळी नक्की काय काय झालं ते सांगा."
"त्या दिवशी संध्याकाळी आम्हाला नाटकाला जायचं होतं. धुकं इतकं दाट होतं की टॅक्सीचा काही उपयोग होण्यासारखा नव्हता. आम्ही चालतच निघालो. जाताना आम्ही त्याच्या ऑफिसच्या जवळ आलो. अचानक तो पळत सुटला आणि धुक्यात दिसेनासा झाला."
"काहीही न बोलता?"
"त्याने एक आश्चर्याचा उद्गार काढला पण तेवढाच. मी त्याची वाट बघितली पण तो परत आलाच नाही. मग मी चालत घरी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिस उघडल्यावर ते त्याच्याबद्दल चौकशी करायला आले. बारा वाजता ती भयंकर बातमी आली. मि. होम्स तुम्ही त्याला या बदनामीतून वाचवा हो.. त्याच्या दृष्टीने त्याची प्रतिष्ठा म्हणजे सर्वस्व होतं."
होम्सने दुःखाने मान हववली.
"चल वॉटसन, आपलं लक्ष्य दुसरीकडे आहे. आता आपल्याला ते प्लॅन्स जिथून चोरीला गेले त्या ऑफिसमधे शोध घ्यायला हवा."
"या माणसाची परिस्थिती मुळातच अवघड होती. या माहितीने ती आणखी अवघड करून ठेवली आहे." टॅक्सी सुरू झाल्यावर तो म्हणाला."त्याचं लग्न जवळ आलं होतं. त्याला पैशांची गरज तर असणारच. त्यामुळे ही गोष्ट गुन्हा करण्यामागचा उद्देश ठरते. ज्या अर्थी तो याबद्दल त्याच्या होणाऱ्या बायकोशी बोलला त्या अर्थी ही कल्पना त्याच्या डोक्यात होती. आणि तिला तो यात सहय्यक म्हणूनही घेणार असेल. ही गोष्ट खूप वाईट आहे."
"पण होम्स, चारित्र्य म्हणून काही गोष्ट असते ना? आणि शिवाय त्या मुलीला रस्त्यात तसंच सोडून एकाएकी तो चोरी करायला का पळाला?"
"बरोबर बोललास. या तर्काला अपवाद आहेतच पण त्यांची समाधानकारक उत्तरं मिळण्यासाठी लोकविलक्षण परिस्थिती गृहित धरावी लागते."
मि. सिडनी जोन्स त्यांच्या ऑफिसमधेच होते. माझ्या मित्राच्या लौकिकाला साजेशा अदबीने त्यांनी आमचं स्वागत केलं. ते बारकुडे होते आणि त्यांना चष्मा होता. ते मध्यमवयीन दिसत होते. त्यांचे गाल खोल गेले होते. त्यांचे हात थरथरत होते आणि त्यावरून त्यांच्यावर पडलेला जबरदस्त मानसिक ताण सहज कळून येत होता.
"हे सगळं फार वाईट आहे मि. होम्स. फार वाईट. तुम्हाला साहेबांच्या मृत्यूबद्दल समजलंच असेल ना?"
"आम्ही आत्ता तिथूनच येत आहोत."
"इथे सगळा गोंधळ झालाय. साहेब या जगात नाहीत. कडोगन वेस्ट मरण पावलाय.आमचे कागद चोरीला गेलेत. सोमवारी संध्याकाळी मी जेंव्हा ऑफिसला कुलूप लावलं तेंव्हा कोणत्याही सरकारी ऑफिसइतकंच हे ऑफिसही कार्यक्षम आणि कार्यरत होतं. आणि कडोगन वेस्टने असं काही करावं हे तर धक्कादायक आहे.... "
"एकूणात तोच खरा गुन्हेगार आहे याबद्दल तुमची खात्री आहे तर"
"मला तरी दुसरी काही शक्यता दिसत नाही. आणि तरीही या प्रकरणात माझा माझ्या स्वतःइतकाच त्याच्यावर विश्वास होता. "
"सोमवारी ऑफिस किती वाजता बंद झालं?"
"पाच वाजता"
"तुम्ही स्वतः ऑफिस बंद केलंत?"
"मी नेहमीच सगळ्यात शेवटी बाहेर पडतो."
"त्या वेळी ते प्लॅन्स कुठे होते?"
"तिजोरीत. मी स्वतःच ते तिथे ठेवले होते."
"या इमारतीला कोणी गुरखा आहे का?"
"आहे पण त्याला इतर विभागांकडेही लक्ष ठेवावं लागतं. तो एक माजी सैनिक आहे आणि अत्यंत विश्वासार्ह आहे. त्याला त्या संध्याकाळी वेगळं असं काहीच दिसलं नाही. अर्थात धुकंही खूप होतं म्हणा.."
"समजा ऑफिस सुटल्यानंतर कडोगन वेस्टला आत यायचं असतं तर त्या कागदांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला एकूण तीन किल्ल्यांची गरज पडली असती. बरोबर?"
"हो. एक बाहेरच्या दरवाज्याची, एक ऑफिसची आणि एक तिजोरीची"
"फक्त सर जेम्स वॉल्टर आणि तुम्ही , तुम्हा दोघांकडेच त्या किल्ल्या होत्या ना?"
"माझ्याकडे दोन्हीही दरवाज्यांच्या किल्ल्या नव्हत्या. फक्त तिजोरीच्या किल्ल्या होत्या."
"सर जेम्स यांचं वागणं नियमित होतं का?"
"हो असणार. माझ्या माहितीप्रमाणे त्या किल्ल्या ते नेहमीच एकत्र एकाच रिंगला अडकवून ठेवत असत. मी ती रिंग अनेकदा पाहिली आहे."
"आणि ती रिंग घेऊन ते लंडनला गेले होते?"
"ते तसं म्हणाले खरे."
"आणि तुमच्याजवळ असलेली किल्ली कायम तुमच्याकडेच होती?"
"हो."
"याचा अर्थ जर वेस्ट गुन्हेगार असेल तर त्याच्याकडे डुप्लिकेट किल्ल्या असणार. आणि तरीही त्याच्या मृतदेहाजवळ त्यातली एकही किल्ली सापडली नाही.अजून एक विचार करण्याजोगा मुद्दा म्हणजे जर या ऑफिसमधल्या एखाद्या कारकुनाला ते कागद विकायचे असते तर मूळ कागद विकायला नेण्याऐवजी, नेहमीच्या पद्धतीप्रमाणॆ इथेच त्यांची एक प्रत करून ती बाहेर नेणं जास्त सयुक्तिक ठरलं नसतं का?"
"त्यांची हुबेहूब प्रत काढायला खूपच सखोल तांत्रिक ज्ञानाची गरज आहे."
"पण सर जेम्स काय ,तुम्ही काय किंवा कडोगन वेस्ट काय तुमच्याकडे ते ज्ञान होतं."
"आमच्याकडे ते ज्ञान होतं यात काहीच शंका नाही. पण मि. होम्स कृपा करून मला याच्यात अडकवू नका. जर ते कागद कडोगन वेस्टकडे सापडले होते तर माझं नाव यात ओढण्यात काय हशील आहे?"
"हम्म. जर त्याला मूळ प्लॅन्स नेण्याऐवजी त्यांची प्रत करून ती नेता येणं शक्य होतं, आणि त्याने त्याचं कामही भागणार होतं तर त्याने मूळ कागदपत्रं नेऊन फारच मोठा धोका पत्करला असं म्हणायला हवं. आणि ही गोष्ट विशेष आहे"
"विशेष तर खरीच. पण त्याने ती केली."
"या प्रकरणाच्या जितक्या खोलात शिरावं तितक्या जास्त अतर्क्य गोष्टी पुढे येतायत. ती हरवलेली तीन पानं खूप महत्त्वाची होती ना?"
"हो."
"तुम्हाला असं म्हणायचंय का की फक्त त्या तीन पानांच्या आधाराने, बाकीची सात पानं हातात नसतानाही बूस पार्टिंग्टन पाणबुडी तयार करता येऊ शकेल?"
"मी ऍडमिरल ऑफिसमधे तसं कळवलं होतं. पण आज जेंव्हा मी ते नकाशे परत एकदा तपासून पाहिले तेंव्हा माझं मत बरंच डळमळीत झालं आहे. जे कागद परत आले त्यात पाणबुडीचा सेल्फ ऍडजस्टिंग स्लॉटचा डबल व्हाल्व्ह काढलेला आहे. त्याच्याशिवाय ती पाणबुडी तयार करणं शक्य नाही. पण ते लोक लौकरच त्या अडचणीवर मात करू शकतील."
"पण ते तीन हरवलेले नकाशे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत."
"प्रश्नच नाही."
"हम्म मला तुम्हाला इतर काही विचारायचं नाहीये. आता तुमची परवानगी असेल तर मी इथल्या आवारात एक फेरी मारून येईन म्हणतो."
त्याने काळजीपूर्वक तिजोरीच्या कुलुपाची तपासणी केली. नंतर त्याने दरवाज्याची पाहणी केली आणि सगळ्यात शेवटी खिडकीचं लोखंडी जाळीचं सरकतं दार नीट तपासून पाहिलं. जेंव्हा आम्ही बाहेरच्या हिरवळीवर गेलो तेंव्हा मात्र त्याची उत्सुकता बरीच जागृत झाली होती. खिडकीच्या बाहेरच्या बाजूला अगदी खेटून एक लॉरेलचं झाड होतं. त्याच्या बऱ्याचश्या फांद्या अलिकडेच कोणीतरी ओढल्या असाव्यात किंवा वाकवल्या असाव्यात तशा दिसत होत्या. त्याने त्या फांद्यांची एका मोठ्या भिंगातून बारकाईने तपासणी केली. नंतर जमिनीवरच्या काही विचित्र खुणांचीही तपासणी केली. नंतर त्याने मि. जोन्सना ती खिडकी लावून घ्यायला सांगितली आणि मला दाखवलं की ती जाळीची सरकती दारं साधारण मध्यावर एकमेकांमधे नीट बसत नव्हती. त्या भोकातून कोणालाही आत काय चाललंय हे व्यवस्थित बघता आलं असतं.
" या खुणा तीन दिवसांपूर्वीच्या आहेत त्यामुळे कितपत उपयोगी पडू शकतील याबद्दल शंकाच आहे. चल वॉटसन, वूलविचमधून आणखी मदत होणार नाही. लंडनमधे काय सापडतंय ते पाहू या. इथून काही गोष्टी मात्र नक्कीच सापडल्यात."
पण वूलविच स्टेशनवर आम्हाला अजून एक गोष्ट सापडली. तिथल्या तिकीट खिडकीतल्या कारकुनाने आम्हला सांगितलं की त्याने कडोगन वेस्टला सोमवारी रात्री वूलविच स्टेशनवर पाहिलं होतं. तो कडोगन वेस्टला चेहऱ्याने ओळखत होता. कडोगन वेस्टने रात्री ८:१५ च्या गाडीचं लंडन ब्रिजपर्यंतचं तिकीट काढलं होतं. त्याच्याबरोबर कोणीही नव्हतं. त्याने एकवेळचं तिसऱ्या वर्गाचं तिकीट काढलं होतं. कडोगन वेस्टच्या अति उत्तेजित वागण्यामुळे त्या कारकुनाला तो प्रसंग चांगलाच लक्षात होता. कडोगन वेस्टचे हात इतके थरथरत होते की त्याला सुटे पैसे नीट उचलताही येत नव्हते म्हणून त्या कारकुनाने ते उचलून दिले होते. रेल्वेच्या वेळापत्रकावरून हेही स्पष्ट झालं की साडेसात वाजता मैत्रीणीला सोडून अदृश्य झालेल्या कडोगनला मिळू शकणारी पहिलीच गाडी म्हणजे ही ८:१५ ची गाडी होती.
अर्धा तास शांतपणे बसून राहिल्यानंतर होम्स मला म्हणाला,"वॉटसन, काय झालं असेल हे आपण क्रमवार पाहू. आपण दोघांनी मिळून जितक्या केसेसवर काम केलंय त्यात समजून घ्यायला याच्याइतकी अवघड केस दुसरी नसेल. पुढे येणारा प्रत्येक नवीन पुरावा आणखी आणखी बुचकळ्यात टाकणारा आहे. तरीही आपण खात्रीने थोडीशी प्रगती केली आहे.
"आपण वूलविचमधे जी चौकशी केली त्यानंतर बऱ्याच गोष्टी कडोगन वेस्टच्या विरुद्ध जात होत्या. पण त्या जाळीच्या दरवाज्याने काही गोष्टी त्याच्या बाजूनेही दाखवायला सुरुवात केली आहे.
आपण असं धरून चालू की कुठल्यातरी परकीय हेराने त्याच्याशी संपर्क साधला होता. त्याला गुप्ततेची शपथ घ्यायला लावली गेली असेल आणि त्यामुळे याबद्दल तो कुठेही बोलू शकला नसेल पण त्याच्या मनात नक्की खळबळ माजली असणार कारण तो त्याच्या होणाऱ्या बायकोजवळ तसं बोलला होता. हम्म हे ठीक आहे. आता आपण असं समजू या की त्या दिवशी संध्याकाळी त्या मुलीबरोबर तो नाटकाला जायला निघाला होता. अचानक त्याला काय दिसलं? दाट धुक्यात त्याला तोच हेर त्याच्या ऑफिसच्या दिशेने जाताना दिसला. तो गरम डोक्याचा माणूस होता आणि चटकन निर्णय घेणारा होता. त्याच्यातल्या कर्तव्यभावनेने उचल खाल्ली. त्याने त्या माणसाचा पाठलाग केला, खिडकीपाशी आला, खिडकीतून कागदपत्रांची चोरी होताना पाहिली. आणि त्या चोराचा माग धरला. असं मानलं तर एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. ते हे की तो जर प्रती तयार करू शकत होता तर कोणालाही मूळ कागदपत्रांना हात लावायची गरज नव्हती. पण त्या हेराला मूळ प्रतीच हव्या होत्या. इथवर तर सगळं जुळतं."
"आता पुढची पायरी कुठली?"
"आता आपल्या अडचणींना सुरुवात होते.अशा परिस्थितीत कडोगन वेस्टने त्या चोराला पकडून अधिकाऱ्यांना सावध करायला हवं होतं. मग त्याने असं का बरं केलं नाही? कागदपत्रं चोरणारा त्याचा कोणी वरिष्ठ तर नसेल? तसं असेल तर वेस्टच्या वागणुकीचा अर्थ लागू शकतो. किंवा त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने धुक्यचा फायदा घेऊन वेस्टला गुंगारा दिला असेल. आणि म्हणून वेस्टने त्याच्या घरीच त्याला पकडायचं या उद्देशाने सरळ लंडनचा रस्ता धरला असेल. अर्थात त्या अधिकाऱ्याचं घर वेस्टला माहीत असेल असं धरून चालायला हवं. पण ती वेळ मोठी आणीबाणीची असणार कारण त्याने आपल्या होणाऱ्या बायकोला धुक्यात एकटीला सोडून दिलं आणि नंतरही तिच्याशी संपर्क साधायचा काहीच प्रयत्न केला नाही. पण आपलं कल्पनाचित्र इथे थांबतं. या घटनेपासून ते प्लॅनची सात पानं खिशात असलेला त्याचा मृतदेह एका भुयारी रेल्वेगाडीच्या टपावर येऊन पडेपर्यंतच्या काळात काय झालं असेल याबद्दल अनेक तर्क आणि शंकाच फक्त हाती राहतात. . मला वाटतं आता आपण दुसऱ्या टोकाकडून कामाला सुरुवात करावी. जर मायक्रॉफ्टने ती यादी पाठवली असेल तर आपल्याला आपला संशयित माणूस शोधून काढणं सोपं जाईल आणि मग एका मार्गाऐवजी आपण एकदम दोन मार्गांवरून जाऊ."

--अदिती

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें