28 अप्रैल 2007

हा कल्पांताचा प्रहर जाहला सुरू....

ऐन्यात जिवाच्या दुःखाचे प्रतिबिंब,
डोळ्यातुन वाहे अश्रू ओलाचिंब
रक्तातुन घुमतो आकांतांचा गाव,
पावलोपावली बसे नवा हा घाव
हे भग्न धुमारे वणव्यातुन उरलेले,
हे सत्य वनाच्या हृदयातुन मुरलेले
ही दिशा नसे गं उदसवाणी आज,
विपरीत येथला दिवस येथली सांज
माथ्यावर दिसतो का पुनवेचा चांद,
रवी मध्यान्हीचा खरा,खरा की चांद
कोवळ्या कळ्यांना वारा गाळीत जाई,
वठलेल्या तरूचे भूत नव्हाळीत गाई
जाणीव न उरली आता दुसरी काही,
वेदनांवाचुनी शब्दच उरला नाही
हा कल्पांताचा प्रहर जाहला सुरू
जळणेच राहिले हाती मग भुरुभुरू

--अदिती
५-१०-२००५

5 अप्रैल 2007

रितेपणा...

पुन्हापुन्हा मला गिळून टाकतो रितेपणा
नवीन जागताच आस वाढतो रितेपणा

निशा -उषा धरून पाठ येत जात सारख्या
कणाकणात शून्यताच शोधतो रितेपणा

न आठवे कशा कधी कुठून लोपल्या सरी
क्षणैक मेघ दाटताच भंगतो रितेपणा

वसंत रास खेळतो भरून रंग वाहती
फुलाफुलास गालबोट लावतो रितेपणा

स्वरात खोल वेदना करात फोल आयुधे
उरात बोल आत आत कोंडतो रितेपणा

(५ एप्रिल २००७)