12 दिसंबर 2007

कृपा तुझी रे अपार आहे

हिवाळ्यातली दुपार आहे,
निजावयाचा विचार आहे ...

शिरा करावा नव्या तुपाचा
'हिचा' मिळाला रुकार आहे

खुलून यावे कसे चवीने ?
घरात नुस्ती गवार आहे...

तळून काढा जरा करंज्या
मस्त मिळाला मटार आहे!

दिवास्वप्न हे लगेच भंगे
चहा पिण्याचा सुमार आहे!

असेच देवा मिळो गिळाया
कृपा तुझी रे अपार आहे!

--अदिती
(२३.११.२००७,
कार्तिक शू १४ शके १९२९)

कधी ...

या तमातुनी मला दिसेल काजवा कधी?
हाय हात हा करी धरेल चांदवा कधी

तोलतो क्षणाक्षणास कारकून बैसला
दादरा कधी धमार मत्त केरवा कधी

कंस फार माजला दया करा प्रभू अता
ध्यास या धरेस उद्धरेल 'आठवा' कधी

साद देत थांबले शकून वाट पाहती
फाल्गुनास दूर पाठवेल पाडवा कधी

फेर लाख मांडलेस, खेळ चालला तुझा
सांग संपणार का खरेच जोगवा कधी

एकलाच प्रश्न जाळतो पुन्हा पुन्हा मला
एकलाच ध्यास लागला असे जिवा 'कधी' !

--अदिती
(२४ ऑक्टोबर २००७,
कोजागिरी पौर्णिमा , शके १०२९)

वर्तुळ

नावडती कामे करता करता घुमती
या मनामधे किति आशावादी स्वगते
खंडकाव्य ओव्या अभंग कविता गाणी
मी मनात माझ्या बसल्या बसल्या लिहिते

मन म्हणते, मजला संधी दे गं थोडी
एक लेखणी, अशी रिकामी पाने
मग पाहशील तू दिपल्या डोळ्यांपुढती
साहित्य जंगले अन् कवितांची राने

मी हसते तरिही जरा झुकवुनी मान
सांगते मनाला 'कर तू मनाप्रमाणे'
मन आवेशाने खरडायाला बसते
धडपडते, रुसते, लिहितेही नेटाने

त्या वेळ फारसा अजून झाला नाही
तोवर प्रतिभेचा आटत जातो झरा
छे.. जमतच नाही... काय लिहावे आता
मन मलाच पुसते यक्षप्रश्न हा खरा

मज अर्धेमुर्धे ते काव्याचे तुकडे
वाकुल्या दाखवत दात काढुनी हसती
यमकांच्या जोड्या,शब्दांच्या आगीनगाड्या
'ठेसनी' मनाच्या संप पुकारुन बसती

वल्गना मनाच्या वांझोट्या ठरताना मी
सोडून उसासा कामे उरकाया वळते
मिनिटात दहा मन पुन्हा नव्याने बेटे
स्वप्नास नव्या काव्याच्या बघून चळते......

--अदिती
(११ ऑक्टोबर २००७
भाद्रपद वद्य १४,
शके १९२९)

दिवाळी पहाट

आली पहाट हलके हसऱ्या धुक्याची
अंगी खट्याळ हसरा फुलवीत काटा
दारी दिव्यात उजळे हळुवार नक्षी
तेजाळ थेंब ढळती उजळीत वाटा

अंधार थंड बुजरा लपतोच कोठे
ज्योतीस वात धरता उचलून माथी
तेजात चूर अवघे जग रंगताना
झेपा अनार हिरवे उसळून घेती

एकेक हास्य उजळे प्रतिमा घराची
स्व्प्नातलेच दिसते घरकूल माझे
ये सांगता न असले सुख लाभता हे
डोळ्यांत चंद्रनिवल्या प्रतिबिंब साजे

आकाशदीप डुलतो हसतात झाडे
लावी पहाट टिकली रविरूप भाळी
आनंद नाचत फिरे गगनी,धरेशी
तेजात न्हात बघ ही उतरे दिवाळी!
--अदिती