30 मार्च 2009

राम रामेति रामेति...

परवाच गुढीपाडवा दणक्यात साजरा झाला. या वर्षी पाडव्यानिमित्त सुट्टी मिळाल्यामुळे असेल कदाचित पण यंदा पाडव्याला सगळ्यांचाच उत्साह ओसंडून वाहत होता. खूपच छान वाटलं. फाल्गुन संपला आणि चैत्र सुरू झाला. मला चैत्र फार आवडतो. चैत्रामध्ये मला सगळ्यात काय आवडत असेल त्या महिन्यात भरगच्च असलेले खास दिवस. आणि, आपल्यासारखाच देवांनाही उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून देवासमोर भरून ठेवायचं चांदीचं इटुकलं तांब्या-भांडं. देवावर मनुष्यत्वाचा आरोप ( म्हणजे आळ नव्हे! हा अलंकारिक आरोप आहे याची कृपया नोंद घ्यावी!! ) केल्यावर तो माणसांच्या जास्त जवळ येत असावा. लंगडा बाळकृष्ण, रामनवमी - गोकुळाष्टमीला रामकृष्णांना पाळण्यात घालून केले जाणारे त्यांच्या जन्माचे सोहळे, विठ्ठलाला लावली जाणारी चंदनाची उटी, सारसबागेतल्या गणपतीला घातलेला स्वेटर ही याची काही उदाहरणे असावीत. आपल्या श्रद्धेला अमूर्त तत्त्वापेक्षा हे सगुण साकार परब्रह्म जास्त भावतं असं दिसतंय. ( अमूर्तवादी लोकांनी निर्जीव मूर्तीमध्ये देव खरंच अस्तित्वात असतो का इ. प्रश्नांची सरबत्ती करू नये कारण जर तो चराचरात भरलेला असेल तर पाषाणाच्या मूर्तीमध्ये तो नाही असं होणारच नाही. ) या संदर्भात कुसुमाग्रजांनी कुठेतरी लिहिलेलं एक वाक्य आठवतं. "देव आहे किंवा नाही याचं उत्तर माझ्या मते तरी, ज्याला त्याची गरज आहे त्याच्यासाठी तो आहे, ज्यांना त्याची गरज नाही त्यांच्यासाठी तो नाही असं आहे" असं कुसुमाग्रज म्हणाले होते. आस्तिक लोकांचा देव आहे यावर दांडगा विश्वास असतो तर नास्तिकांचा देव नाही यावर, पण देव आहे म्हटलं काय आणि नाही म्हटलं काय, दोघेही शेवटी देवावरच विश्वास ठेवतात ना! असा एक मार्मिक आणि मिस्कील युक्तिवादही कोणीतरी केल्याचं कानावर आलं होतं. त्या माणसाच्या चातुर्याला मात्र दाद द्यावीशी वाटली होती.

परवा काही कामानिमित्त तुळशीबागेत गेले होते. बऱ्याच वर्षांपासून कानातली - गळ्यातली - क्लिपा आणि इतर छप्पन्न गोष्टी आणायला म्हणून  आमची ये-जा तुळशीबागेपेक्षा तुळशीबागेच्या मागील बोळातच जास्त असते. त्यामुळे तुळशीबागेत गेल्यावर मला खूपच वेगळं वाटत होतं. तिथलं रामाचं देऊळ, राम - सीता - लक्ष्मणाच्या देखण्या मूर्ती, समोरचा सभामंडप आणि देवळासमोरच असलेलं हनुमंताचं इवलं देऊळ पाहूनच चित्तवृत्ती शांत झाल्या. चैत्री नवरात्रानिमित्त सगळीकडे मांडव घातलेला होता. नऊवारीतल्या आजीबाई आणि काकूबाई छापाच्या स्त्रिया अंबाड्यात सोनचाफ्याचं फूल किंवा पोनीटेलवर मोगऱ्याचा सुगंधी गजरा माळून भक्तिभावाने रामाला हात जोडत होत्या. प्रदक्षिणेचा मार्ग लोकांनी फुलून गेला होता. काहीतरी विलक्षण सात्त्विक असं तिथे दाटलं होतं. त्या समस्त स्त्रीवर्गाच्या चेहऱ्यावरचे भाव इतके प्रसन्न आणि शांत होते की, "विठ्ठलापेक्षा त्याच्यापुढे लोटांगण घालणाऱ्या वारकऱ्याच्याच दर्शनाची मला अधिक ओढ वाटते" हे पुलंच मत आठवलं, पटलं. तितक्यात माझ्या ओळखीच्या एक आजीबाई भेटल्या. माझ्या गुरुंच्या त्या आई त्यामुळे मला लहानपणापासून ओळखतात. "काय गं तब्येत किती खराब करून घेतलीयेस! आपल्याला नाही बाबा आवडत हे असलं काही. पुढच्या वेळी मला तू चांगली जाडजूड झालेली दिसली पाहिजेस! " असं फर्मान काढून त्यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा रामरायाकडे वळवला. मला जरा हसूच आलं. अनेक दिवस सकाळी फिरायला जाऊन आणि डाएटच्या नावाखाली पोटाला चिमटे काढून जरा आटोक्यात आलेला माझा देहविस्तार ही माझी 'खराब' झालेली प्रकृती नाही हे त्यांना कसं सांगणार! त्यातून आजीची नजरच वेगळी असावी.

लालबुंद भरजरी वस्त्रं नेसवलेल्या राम - सीता - लक्ष्मणाच्या मूर्तींकडे कितीही वेळ बघत राहिलं तरी समाधान होणार नाही असं वाटत होतं. मी कितीतरी वेळ टक लावून त्यांच्याकडे बघत उभी होते. शेवटी माझ्या मागेही बरीच गर्दी ताटकळते आहे याची जाणीव झाल्यावर मात्र मी तिथून बाजूला झाले. पुजाऱ्याचा तीन चार वर्षांचा नातू मोठ्या ऐटीत बसून साखरफुटाण्यांचा प्रसाद आल्यागेल्याला देत होता. आजोबांची नक्कल करायला मिळाल्यामुळे त्याला झालेला आनंद त्याच्या चिमुकल्या चेहऱ्यावर मावत नव्हता. माझ्याही हातावर त्याने चार साखरफुटाणे ठेवले. ठेवताना तो आतल्या रामाइतकाच सुंदर हसला. मला पटकन त्यालाच एक नमस्कार करावासा वाटला. गर्दीमधून मी प्रदक्षिणा पूर्ण केली. पुन्हा एकदा देवासमोर आले. सावळ्या रामचंद्राचं तुळशीबागेतलं रुपडं मात्र संगमरवरी आहे. मनोमन त्याची प्रार्थना करत असतानाच माझे विचार रामामागेच धावत राहिले.

राम हा तसा खूप लहानपणीच अनेक गोष्टीमधून भेटलेला देव. आकाशातला चांदोबा मागणाऱ्या रामाची गंमत वाटायची. जाड अक्षरांमध्ये छपलेलं रामायणातील गोष्टींचं एक पुस्तक माझ्याकडे होतं. त्यात, शेवटी रामाने शरयू नदीत उडी मारली आणि रामायण संपलं अशी एक गोष्ट होती. ती मला मुळीच न आवडल्याने मी ते पुस्तक वाचणारच नाहीये अशी मी आईकडे तक्रार केल्याचं आठवतंय. बाबा मला झोपवताना
पहिली माझी ओवी । दुसरा माझा नेम ॥
तुळशीखाली राम पोथी वाची ॥
ही ओवी म्हणत असत. रामायण ही दूचिवा मालिका सुरू झाल्यावर तर धमालच होती. रामासारखं धनुष्य करण्याच्या नादात मी कितीतरी खराट्याच्या काड्या मोडल्या आहेत. पण आमचा खरा हीरो होता गदाधारी हनुमान. प्लॅस्टिकची गदा तशी सुरक्षित असल्याने मनसोक्त खेळायला मिळायची. शिवाय त्या पडद्यावरच्या पुचाट रामापेक्षा अरविंद त्रिवेदींचा रावणच 'लई भारी' वाटायचा हे तेंव्हाही जाणवलं होतं. तेंव्हा राम हा धनुष्यबाण लीलया वापरत असल्यामुळे सॉलिड वाटायचा. ढिशुम ढिशुम मारामाऱ्या करणारा वाटायचा. खूप मजा वाटायची. आज मात्र राम म्हटलं की शांत, स्थिर, शाश्वत मूल्यांचा पाईक आणि कठोर खडतर कर्मवादाचा पुतळा वाटतो. तो सोळा कलांचा परमेश्वराचा पूर्णावतार आहे वगैरे गोष्टी माहीत आहेत. पण मला आदर वाटतो, भक्ती वाटते ती कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता आलेल्या प्रसंगाला तोंड देत, संकटांशी दोन हात करत संस्कृतीच्या शाश्वत मूल्यांचे रक्षण करत कर्म करत राहा हा संदेश देणाऱ्या प्रभू रामचंद्राबद्दल. राम हा माझ्या मते माणूस होता आणि म्हणूनच काही चुकाही त्याने केल्या असतील( सीतात्याग!  त्या मुद्द्यावर त्याचा रागराग येतो ) पण अंगभूत गुणांनी आदर्शांनाच मानवीभूत करण्याची जी अफाट मानसिक आणि शारीरिक शक्ती त्याने वापरून दाखवली ती त्याला देवपदाला नेण्यास समर्थ आहे. बनवाबनवी, खोटेपणा, राजकारणे, दलबदलू स्वार्थ यांनी अजगरासारखा विळखा घातलेल्या आजच्या जगात रामाकडे पाहिल्यावरच आधार वाटतो. अजून रामनवमी यायची आहे. त्या दिवशी नकळत तुळशीबागेत जायची ओढ लागते कारण त्या आभाळाएवढ्या परमेश्वररूपाचं ते मनोहर बाळरूप पाहून जीव सुखावतो. आज बाप्पाचा 'हॅप्पी बर्थडे '  आहे का?  असं  आजीला विचारणाऱ्या लहान मुलीची गोष्ट आठवावी  तितका.... :)

--अदिती
(चैत्र शुद्ध ४ शके १९३१,
३० मार्च २००९)

17 मार्च 2009

सच है दुनियावलों....

काही वर्षांपूर्वी एका मराठी नाटककाराचं आत्मचरित्र वाचण्याचा योग आला होता. त्यांनी मुख्यतः संगीत नाटके लिहिली असावीत. त्यांच्या पुस्तकाचं पहिलंच वाक्य होतं " मी केशराचं शेत लावलं आहे आणि गाढवांना त्यात चरायला सोडलेलं आहे' संदर्भ सोडून लक्षात राहिलेलं हे वाक्य नेमकं आत्ताच का आठवलं? मराठी संगीत रंगभूमी ही केशराची बाग असेलही पण आयटी इंडस्ट्री ही केशराची बाग कधीच नव्हती. ती होती एक दुभती गाय. वाहत्या गंगेत हात धुवून घेणारे असंख्य लोक आज आयटीने अक्षरशः अन्नाला लावले आहेत. मी हे जे काही लिहिते आहे ते मी लिहावं का लिहू नये हे अनेक दिवस मला ठरवता आलेलं नाही. पण तरीही लिहिते आहे. खरंखुरं मत मांडते आहे. एखाद्याला ते अतिस्वार्थीपणाचं वाटेल कदाचित. हे सगळं लिहिण्यामागे व्यक्तिगत आकस नाही. सॉफ्टवेअरचं अतिरिक्त कौतुकही नाही. आणि कुठल्याही प्रकारे विवक्षित माणसांकडे किंवा कंपन्यांकडे बोट दाखवण्याचाही हेतू त्यामागे नाही.

आम्ही सगळे करीयरचे निर्णय घ्यायच्या वयात आलो तेंव्हा जिकडे तिकडे आयटीचं पेव फुटलं होतं आणि वायटुकेच्या अदृश्य भुताने जगाला पछाडलं होतं. कॉम्प मधलं शिक्षण अनेकांना अमेरिकेत जायच्या व्हिसासारखं दिसत होतं. कधी एकदा हे जुलमाचं शिक्षण संपतंय आणि खऱ्या आयटीमध्ये आपण प्रवेश करतोय! अशी घाई झालेले आम्ही सारे येरू तेंव्हा एकमेव असलेल्या सॉफ्टवेअर पार्ककडे एखाद्या लहान मुलाने डिस्नेलँडकडे बघावं तसे बघायचो. तिथली चित्रविचित्र आकारांच्या इमारतींमध्ये भरणारी ऑफिसेस, विन्डोज एक्स-पी च्या प्रसिद्ध डेस्कटॉपवरच्या चित्रासारखे त्यांचे हिरवेगार परिसर, गळ्यातली रंगीत पट्ट्याची आय-कार्ड्स आणि एक पाय ऑन साईट - एक पाय ऑफ शोअर असे एकेक पाय नाचिवणारे गोविंद हे सगळं खूप अप्रूपाचं, हवंहवंसं होतं. अर्थातच संगणकशास्त्रावर मनापासून प्रेम करणारे आमच्यासारखेही त्या गर्दीत होतेच.

प्रोग्रामिंग लँग्वेजेस आम्ही मातृभाषेसारख्या शिकलो. डेटाबेसेस मधले नॉर्मल फॉर्म्स वेड्यासारखे पाठ केले. ( प्रत्यक्षात पर्फॉर्मन्स साठी ती टेबल्स डिनॉर्मलाइझ करावी लागतात हे पाहून मला एक विकट हास्य करावंसं वाटलं होतं. ) लेक्स - याक पासून ते फाईनाईट ऑटोमेटापर्यंत सग्ग्ळं सग्ग्ळं शिकायचा मनापासून प्रयत्न केला. बरेच उंबरठे झिजवल्यावर अकस्मात् एखाद्या मुलीचं लग्न ठरावं तशी ध्यानीमनी नसताना एक दिवस नोकरीही मिळाली आणि मुलगी मार्गी लागली म्हणून पालकांनी निःश्वास सोडले. त्यांना हायसं वाटलं असलं तरी मला मात्र त्या दिवसापासून आजपर्यंत जिवाला स्वस्थता म्हणून लाभलेली नाही.

जे आम्ही शिकलो ते प्रत्यक्षात वापरलं जात नव्हतं आणि जे वापरलं जात होतं ते आमच्या अभ्यासक्रमात नव्हतं. आल्या प्रसंगाला तोंड दिलं, टक्के टोणपे खाल्ले की आपल्याला अनुभव मिळेल आणि त्यातून ज्ञान मिळेल अशी माझी समजूत होती. पण या सगळ्या वरवरच्या चमचमाटाखाली मला तरी फक्त भ्रमनिरासच होताना दिसलेला आहे. ओ. एस. कन्सेप्ट्स , सी , सी++, डीएस कन्सेप्ट्स , विन्डोज - युनिक्स इंटर्नल्स हा या सगळ्याचा गाभा आहे. प्रत्येक इंटर्व्ह्यूमध्ये या गोष्टींची अगदी कसून तपासणी होते. आयआयटी एंट्रन्स पासून कसले कसले प्रश्न विचारले जातात. हे सगळं विचारायला माझी ना नाही. पण प्रत्यक्ष काम हे या सगळ्याशी अगदी असंबद्ध असं का असतं? मास्टर्स लेव्हलच्या कँडिडेटला प्रॉडक्शन मॉनिटरिंग करायला का बसवतात? माणसाला रिसोर्स असं गोंडस नाव दिल्यावर प्रत्यक्षात भिंतीवरच्या खुंटीइतकीही किंमत का दिली जात नाही? सरकारी ऑफिसमध्ये शोभेल अशी ब्युरोक्रसी आयटीमध्ये का राबवली जाते? कामाचे अनिर्बंध तास आणि ज्युनियर लेव्हलच्या माणसाने चोवीस तास कंपनीतच राहिलं पाहिजे अशी अपेक्षा करणारे पी एम्स अप्रेझलच्या वेळी रिसोर्सने केलेलं काम सोयिस्करपणे कसं विसरू शकतात?

सॉफ्टवेअर कंपनी असं नाव देऊन प्रत्यक्षात फक्त सॉफ्टवेअर्स अल्टर करणाऱ्या कंपन्यांमध्ये ज्यांना संगणकशास्त्राची आवड आहे अशा माणसांनी कसा काय तग धरायचा? प्रत्यक्षातली आयटी म्हणजे फक्त शेअर मार्केटचे रक्तदाबासारखे चढणारे - उतरणारे आकडे, डॉलर आणि रुपयामधल्या फरकातून पैसे कमावू पाहणाऱ्या कंपन्या आणि दुसऱ्याला पायाखाली गाडून आपली उंची वाढवू पाहणारे गळेकापू मॅनेजर्स एवढंच आहे का? आणि का आहे? चाळीशीत स्पाँडिलायटिस झालेले, हृदयविकाराने ग्रस्त, डायबेटिक आणि इतर कसल्याकसल्या आजारांच्या साखळ्यांच्या कॅप्सूल्स धारण करणाऱ्या लोकांची पैदास करणाऱ्या या आयटीनेच मला दोन वेळची भाकरी आणि दर महिन्याला मिळणाऱ्या पगाराच्या रकमेची सुरक्षित हमी दिली आहे. आयटीबद्दल प्रेम, संगणकशास्त्राबद्दल अपार माया आणि आपल्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्याची ओढ असणाऱ्या माझ्यासारख्या मुलीने या विश्वाचा द्वेष करायचा की आपण आपली मूल्ये सोडून या गळे कापण्याच्या धंद्यात सामील होऊ शकत नाही म्हणून आपला पराभव मान्य करायचा?

पैशापेक्षा ज्ञान , अनुभव , चांगल्या कामातून मिळणारा बौद्धिक आनंद महत्त्वाचा मानणाऱ्या माणसाने केवळ वरिष्ठापुढे हांजीहांजी करण्याच्या क्षमतेला दिलेलं बेस्ट पर्फॉर्मन्सचं सर्टिफिकेट किंवा बेकारी असा सवाल समोर आला तर काय पर्याय निवडावा? हे प्रश्न मला पडतात. इतर कोणाला पडतात किंवा कसं मला माहीत नाही.

परीक्षेचा अभ्यास कसा करावा हे मला कळतं पण ऑफिसमध्ये त्या लोकांना अपेक्षित परफॉर्मन्स कसा द्यावा हे मला कळत नाही. आम्हाला कॉलेजमध्ये शिकवलेली आयटी आणि प्रत्यक्षातली आयटी यात खूपच अंतर आहे आणि या जगाशी कसं जुळवून घ्यावं हे मला कळत नाही. प्रत्येक वेळी कामे करूनही नाकर्तेपणाचा शिक्का कपाळावर बसल्यानंतर मला शेवटी असंच म्हणवंसं वाटतं
-सबकुछ सीखा हमने, ना सीखी होशियारी

सच है दुनियावालों के हम है अनाडी.....