12 दिसंबर 2007

वर्तुळ

नावडती कामे करता करता घुमती
या मनामधे किति आशावादी स्वगते
खंडकाव्य ओव्या अभंग कविता गाणी
मी मनात माझ्या बसल्या बसल्या लिहिते

मन म्हणते, मजला संधी दे गं थोडी
एक लेखणी, अशी रिकामी पाने
मग पाहशील तू दिपल्या डोळ्यांपुढती
साहित्य जंगले अन् कवितांची राने

मी हसते तरिही जरा झुकवुनी मान
सांगते मनाला 'कर तू मनाप्रमाणे'
मन आवेशाने खरडायाला बसते
धडपडते, रुसते, लिहितेही नेटाने

त्या वेळ फारसा अजून झाला नाही
तोवर प्रतिभेचा आटत जातो झरा
छे.. जमतच नाही... काय लिहावे आता
मन मलाच पुसते यक्षप्रश्न हा खरा

मज अर्धेमुर्धे ते काव्याचे तुकडे
वाकुल्या दाखवत दात काढुनी हसती
यमकांच्या जोड्या,शब्दांच्या आगीनगाड्या
'ठेसनी' मनाच्या संप पुकारुन बसती

वल्गना मनाच्या वांझोट्या ठरताना मी
सोडून उसासा कामे उरकाया वळते
मिनिटात दहा मन पुन्हा नव्याने बेटे
स्वप्नास नव्या काव्याच्या बघून चळते......

--अदिती
(११ ऑक्टोबर २००७
भाद्रपद वद्य १४,
शके १९२९)

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें