12 दिसंबर 2007

कृपा तुझी रे अपार आहे

हिवाळ्यातली दुपार आहे,
निजावयाचा विचार आहे ...

शिरा करावा नव्या तुपाचा
'हिचा' मिळाला रुकार आहे

खुलून यावे कसे चवीने ?
घरात नुस्ती गवार आहे...

तळून काढा जरा करंज्या
मस्त मिळाला मटार आहे!

दिवास्वप्न हे लगेच भंगे
चहा पिण्याचा सुमार आहे!

असेच देवा मिळो गिळाया
कृपा तुझी रे अपार आहे!

--अदिती
(२३.११.२००७,
कार्तिक शू १४ शके १९२९)

कधी ...

या तमातुनी मला दिसेल काजवा कधी?
हाय हात हा करी धरेल चांदवा कधी

तोलतो क्षणाक्षणास कारकून बैसला
दादरा कधी धमार मत्त केरवा कधी

कंस फार माजला दया करा प्रभू अता
ध्यास या धरेस उद्धरेल 'आठवा' कधी

साद देत थांबले शकून वाट पाहती
फाल्गुनास दूर पाठवेल पाडवा कधी

फेर लाख मांडलेस, खेळ चालला तुझा
सांग संपणार का खरेच जोगवा कधी

एकलाच प्रश्न जाळतो पुन्हा पुन्हा मला
एकलाच ध्यास लागला असे जिवा 'कधी' !

--अदिती
(२४ ऑक्टोबर २००७,
कोजागिरी पौर्णिमा , शके १०२९)

वर्तुळ

नावडती कामे करता करता घुमती
या मनामधे किति आशावादी स्वगते
खंडकाव्य ओव्या अभंग कविता गाणी
मी मनात माझ्या बसल्या बसल्या लिहिते

मन म्हणते, मजला संधी दे गं थोडी
एक लेखणी, अशी रिकामी पाने
मग पाहशील तू दिपल्या डोळ्यांपुढती
साहित्य जंगले अन् कवितांची राने

मी हसते तरिही जरा झुकवुनी मान
सांगते मनाला 'कर तू मनाप्रमाणे'
मन आवेशाने खरडायाला बसते
धडपडते, रुसते, लिहितेही नेटाने

त्या वेळ फारसा अजून झाला नाही
तोवर प्रतिभेचा आटत जातो झरा
छे.. जमतच नाही... काय लिहावे आता
मन मलाच पुसते यक्षप्रश्न हा खरा

मज अर्धेमुर्धे ते काव्याचे तुकडे
वाकुल्या दाखवत दात काढुनी हसती
यमकांच्या जोड्या,शब्दांच्या आगीनगाड्या
'ठेसनी' मनाच्या संप पुकारुन बसती

वल्गना मनाच्या वांझोट्या ठरताना मी
सोडून उसासा कामे उरकाया वळते
मिनिटात दहा मन पुन्हा नव्याने बेटे
स्वप्नास नव्या काव्याच्या बघून चळते......

--अदिती
(११ ऑक्टोबर २००७
भाद्रपद वद्य १४,
शके १९२९)

दिवाळी पहाट

आली पहाट हलके हसऱ्या धुक्याची
अंगी खट्याळ हसरा फुलवीत काटा
दारी दिव्यात उजळे हळुवार नक्षी
तेजाळ थेंब ढळती उजळीत वाटा

अंधार थंड बुजरा लपतोच कोठे
ज्योतीस वात धरता उचलून माथी
तेजात चूर अवघे जग रंगताना
झेपा अनार हिरवे उसळून घेती

एकेक हास्य उजळे प्रतिमा घराची
स्व्प्नातलेच दिसते घरकूल माझे
ये सांगता न असले सुख लाभता हे
डोळ्यांत चंद्रनिवल्या प्रतिबिंब साजे

आकाशदीप डुलतो हसतात झाडे
लावी पहाट टिकली रविरूप भाळी
आनंद नाचत फिरे गगनी,धरेशी
तेजात न्हात बघ ही उतरे दिवाळी!
--अदिती

15 जून 2007

मळभ

खिडकी बाहेरचं दाटलं मळभ
आता मला वेढून टाकतं
आतबाहेर काळोख सारा
वारा येतो, दार लागतं

आभाळाच्या पायथ्याशी
उजेडाचा हात आहे
म्हणून आपलं मानायचं, की,
अजूनही दिवस आहे

मोहमयी जरतारी
कुठल्याच ढगाला नाही कडा
नुसताच आव पावसाचा
आणि रस्ता सगळा कोरडा

पाऊस येईल म्हणताना
क्षण क्षण ढकलायचा
कंटाळ्याचा करडा पक्षी
पुन्हा पुन्हा हाकलायचा

शिणले, थकले डोळे मग
जरा मिटू मिटू होतात
झोप जरा लागत नाही
फक्त कुढणे हेच हातात

घुसमट अशी होते रोज
तरी श्वास सावरायचा
आकाशाचा निळा रंग
पुन्हा करड्यात कालवायचा

मळभ काही हटत नाही
पाऊस काही पडत नाही
पडो बापडा पडेल तेंव्हा...
माझं काही अडत नाही

निर्विकार कोडगेपणा,
बाहेर सगळं कोरडं आकाश
आंधळ्या झालेल्या मनाला
होतात पहाटेचे भास....

(१४ जून २००७,
अधिक ज्येष्ठ अमावास्या,
भारतीय सौर शके १९२९)

28 अप्रैल 2007

हा कल्पांताचा प्रहर जाहला सुरू....

ऐन्यात जिवाच्या दुःखाचे प्रतिबिंब,
डोळ्यातुन वाहे अश्रू ओलाचिंब
रक्तातुन घुमतो आकांतांचा गाव,
पावलोपावली बसे नवा हा घाव
हे भग्न धुमारे वणव्यातुन उरलेले,
हे सत्य वनाच्या हृदयातुन मुरलेले
ही दिशा नसे गं उदसवाणी आज,
विपरीत येथला दिवस येथली सांज
माथ्यावर दिसतो का पुनवेचा चांद,
रवी मध्यान्हीचा खरा,खरा की चांद
कोवळ्या कळ्यांना वारा गाळीत जाई,
वठलेल्या तरूचे भूत नव्हाळीत गाई
जाणीव न उरली आता दुसरी काही,
वेदनांवाचुनी शब्दच उरला नाही
हा कल्पांताचा प्रहर जाहला सुरू
जळणेच राहिले हाती मग भुरुभुरू

--अदिती
५-१०-२००५

5 अप्रैल 2007

रितेपणा...

पुन्हापुन्हा मला गिळून टाकतो रितेपणा
नवीन जागताच आस वाढतो रितेपणा

निशा -उषा धरून पाठ येत जात सारख्या
कणाकणात शून्यताच शोधतो रितेपणा

न आठवे कशा कधी कुठून लोपल्या सरी
क्षणैक मेघ दाटताच भंगतो रितेपणा

वसंत रास खेळतो भरून रंग वाहती
फुलाफुलास गालबोट लावतो रितेपणा

स्वरात खोल वेदना करात फोल आयुधे
उरात बोल आत आत कोंडतो रितेपणा

(५ एप्रिल २००७)

3 जनवरी 2007

शब्द माझ्या अंतरीचे आरसे

आत काही दाटले अंधारसे
शब्द माझ्या अंतरीचे आरसे

ही अवस्था कोणती सांगू कसे?
नाही तिचे कोणीच केले बारसे

जाऊ दे ना ही लढाई संपली
संपले कोठे लढाऊ वारसे

मध्यरात्रीला निमाला तो दिवा
वातीस उरले तेल नव्हते फारसे

स्मरते मला ती वेळ सायंकाळची
दोन तारा बोलल्या गंधारसे

आज माझिया कणाकणात कान जागले.....

आज माझिया कणाकणात कान जागले
चोरपावलातले कुठून नाद बोलले?

अंबरात अंतरात एक बिंब हे कसे?
पाहुनी हसू तुझे मनास खूळ लागले

ज्योत नाचरी दिव्यात झुंबरातली प्रभा
वीज हे तुझेच रूप , तेज होय धाकले

दोन आसवे चुकार सांडली अखेरची
फूल ते मिटायला क्षणात दूर चालले

आज पाहते उभा पुढ्यात काळ वेगळा
सांधतील का कधी नव्यास खंड मागले?

वाट धावते तरी तिला न वाट सापडे
अंत ना तिला मुळी कधी न पाय थांबले

--अदिती(६.१०.०६)

झुळूक

आवाज ना कुणाचा
ही शांत सावली
ही झुळूक नाचरी
खुळी आकाशबावरी

तिची निळीशी काया
तरल सचेतन स्पर्श
फुलाफुलावर फिरते
कणाकणात शिरते

तो पिंपळ हिरवासा
हसतो सोडून मौन
चमचमणाऱ्या टिकल्या
जीर्ण पालव्या पिकल्या

जाते उडवून खट्याळ
उंच टोपी माडाची
खुद्कन आंबा हसतो
तिथे शेवगा रुसतो

ती जाते अल्लड तेंव्हा
एक उसासा सुटतो
मन क्षणभर बावरते
तिला पुन्हा आळवते

करकरत्या खाटेवरती
पुन्हा लागते डुलकी
ती स्वप्नी येऊन जाते
पण खुणा सोडून जाते....

--अदिती(१७.१०.०६)