22 दिसंबर 2006

आंतरजातीय विवाह!

(एका ई-पत्रातून माझ्यापर्यंत आलेली ही कथा. मनोरंजक वाटली म्हणून इथे टंकलिखित करते आहे. मी केलेला तिचा हा स्वैर अनुवाद आहे.)"
.... विवेकदादाच्या लग्नाचा प्रश्न आता ऐरणीवर आला होता. विक्रम और वेताळ मधल्या विक्रमराजासारखे बाबा अथकपणे त्याची पत्रिका घेऊन ज्योतिष्याकडे जायचे. सुंदर, दादाला साजेशा, मुख्य म्हणजे त्याची पत्रिका ज्यांच्याशी जुळायची अशा अय्यर मुलींची यादी घेऊन यायचे. नंतर ती यादी दादाला पाठवून द्यायचे. पण त्याचा आपला कायम नकार असायचा. दादाची म्हणजे सगळी मजामजाच होती. एक पाऊल अमेरिकेत आणि दुसरं कोचीनला ऑफिसात असणाऱ्या दादाला तिसरं पाऊल घरी टाकायला अधूनमधून वेळ मिळायचा हीच आपली गेल्या जन्मीची पुण्याई आहे असं आईचं मत होतं.
तसं आमचं घराणं कर्मठ. बाबा अजूनही रोज कपाळावर गंधाचं त्रिपुंड्र लावायचे. आई सगळे उपास तापास व्रतवैकल्यं न चुकता करायची. आजीचा तर जप दिवसरात्र सुरूच असायचा. त्या दिवशी, कोचीनहून विवेकदादाचा फोन खणखणला तेंव्हा आमच्या घरात तीच सोवळी शांतता नांदत होती. त्या फोनने त्या शांततेला भगदाड पाडलं. दादाने फोन करून बाबांना सांगितलं की त्याची बार्बरा नावाची एक अमेरिकन मैत्रीण काही कामानिमित्त दोन आठवडे त्रिवेंद्रमला येणार होती. तिची राहण्या-जेवण्याची व्यवस्था आमच्या घरी करायचं त्याने तिला कबूल केलं होतं.
दादाचा फोन आल्यापासून साधारण तिसऱ्या दिवशी काहीशा नाखुशीनेच बाबा आणि त्यांच्या मागोमाग मी असे विमानतळावर गेलो. सकाळचे आठ वाजले होते.बाबा, समोरून येणाऱ्या सर्व गोऱ्या मुलींकडे बघायचं टाळत, हातात 'वेलकम बार्बरा' असा फलक घेऊन उभे होते. अखेरीस एक उंच आणि धिप्पाड मुलगी आमच्या दिशेने आली. आळसावलेल्या चेहऱ्याने, इवलीशी ट्रॅव्हल बॅग ओढत ती आमच्याकडे आली तेंव्हा बाबांच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव बघून मला फुटणारं हसू दाबायला मला जाम प्रयास पडले. तिचा वेष तर सगळ्यात नमुनेदार होता. गुडघ्याच्या वर येणारी अर्धी पँट, बिनबाह्यांचा टी शर्ट आणि उंच टाचांचे टॉक टॉक वाजणारे बूट. तिच्या टी शर्टचा गळा इतका खोल होता की तो बघून आईला आणि आजीला नक्कीच झीट येणार या विचाराने मला परत एकदा हसू आवरेना. माझा हात हातात घेऊन ती "हाय वायजयन्ती" असं म्हणाली. मीही तिच्याकडे बघून हॅलो केलं. ती बाबांकडे वळणार इतक्यात कसल्यातरी घाईत असल्यासारखे तिच्या नावाचा तो फलक उचलीत ते पार्किंगच्या दिशेनं चालूही लागले. दोन लहान भारतीय-अमेरिकन मुलं माझा हात धरून अमेरिकन ऍक्सेन्टमधे मला आन्ट वायजयन्ती ,अशी हाक मारताहेत असं चित्र माझ्या मनःचक्षूंपुढे दिसू लागलं. गाडीतही तिच्याकडे बघायचं टाळत बाबांनी जोरात गाडी हाकली. एरवी वाहतुकीचे सगळे नियम पाळणाऱ्या बाबांनी आज किती सिग्नल तोडले हे त्यांच्या लक्षात आलं नाही हेच बरं झालं.आम्ही घरी पोचलो. आई-आजी अंघोळी उरकून शुचिर्भूतपणे सकाळाची स्तोत्रं म्हणत होत्या. बार्बराने एकदम आत जाऊन आईला मिठी मारली. सोवळ्याचं असं पिठलं झालेलं बघून आईचा चेहरा बघण्यासारखा झाला. आईने भराभरा बार्बराला तिच्या खोलीत नेऊन सोडलं आणि तू फ्रेश हो तोवर जेवायची तयारी करते असं म्हणत तिथून काढता पाय घेतला. आजी सवयीने फक्त माळेतले मणी फिरवत होती. जपाचे मंत्र म्हणायचं भानही तिला राहिलं नव्हतं. आणि मी मात्र एकीकडे स्वतःशी हसत, ही सगळी गंमत याहूवर दादाला मिनिट बाय मिनिट रिअल टाईम अपडेट म्हणून सांगत होते.
बार्बरा जेवायला टेबलावर येऊन बसली तेंव्हा तिने कपडे बदलले होते. आत्ताचा तिचा टॉप तर इतका तोकडा होता की बास... "इट्स टू हॉट..." असं म्हणत तिने पानात काय वाढलंय हे बघायला सुरुवात केली. एक तर ती बाबांच्या समोरच बसली होती. त्यातून "आय थॉट वी वुड हॅव इंडियन चिकन " हे तिचं हे वाक्य ऐकून बाबांनी आपली मान जोरजोरात हालवली आणि आढ्याकडे बघायला सुरुवात केली. ही पारा तापमापक फोडून बाहेर पडण्याइतका चढला आहे याची खूण आहे आम्हाला सवयीने माहीत होतं. पण याची काहीच कल्पना नसल्याने बार्बराने आपलेच घोडे दामटले.' यू नो व्हॉट गोज वेल विथ इंडियन चिकन? इंडियन बियर' असं म्हणून एक बियरची बाटली टेबलावर ठेवली. आता मात्र बाबा तिथून निघूनच गेले. आईने तिला 'आम्ही कर्मठ ब्राह्मण आहोत, आम्ही मांस खात नाही वगैरे जुजबी समजूत घातली आणि कशीबशी जेवणं उरकली.
दुपारी चहाच्या वेळी ती आपल्या खोलीतून बाहेर आली. तिने लॅपटॉप सुरू केला आणि दादाचे फोटो दाखवायला सुरुवात केली. समुद्रकिनाऱ्यावर पोहोण्याच्या पोषाखात दादा आणि अत्यंत तोकडे कपडे घालून त्याला खेटून उभी असलेली बार्बरा पाहून आई-आजीला धरणी आपल्याला पोटात घेईल तर बरे असं वाटायला लागलंय हे स्पष्ट दिसत होतं. पुढचे फोटो पाहणं नको म्हणून बाबा बाहेर निघून गेले. आई स्वयंपाकघरात गेली आणि आजीने डोळे मिटून जप करायला सुरुवात केली. दोन दिवसात आमच्या घरातलं वातावरणच बदललं. दादाने जर या बयेशी लग्न केलं तर काय होईल या चिंतेने आईला रात्री झोप लागेनाशी झाली. केवळ पाहुण्यांशी नीट वागलं पाहिजे म्हणून आई सगळं ओढत होती. बार्बराच्या परत जाण्याच्या दिवसाची सगळेच वाट बघत होते. या सगळ्यावर कळस ठरणारी गोष्ट दुसऱ्या दिवशी सकाळी घडली. सकाळी अंघोळीला म्हणून बार्बरा मोरीत शिरली आणि आतून कोरड्या ओकाऱ्यांचे आवाज यायला लागले तेंव्हा मात्र आजीने हाय खाल्ली. आमच्याकडे लग्नाआधी मुलं झालेली चालत नाहीत वगैरे गोष्टी बार्बराला कशा समजावून सांगायच्या या विचाराने आईची अवस्था अगदी वाईट झाली. उरलेला वेळ भयंकर तणावाखाली गेला. आजीने "विवेकला सद्बुद्धी मिळावी" म्हणून विश्वेश्वराला नवस बोलायला सुरुवात केली. बार्बरा सून म्हणून घरी आली आहे या कल्पनेनेच आई बाबांचे चेहरे उतरले. नकळत काही दिवसांपूर्वी घडलेला प्रसंग मला आठवला. माझ्या आत्याच्या मुलाने एका तेलुगू ख्रिश्चन मुलीशी पळून जाऊन लग्न केल्यामुळे घरात हाहाःकार उडाला होता. आत्या धाय मोकलून रडत होती आणि बाबा तिच्या अकलेचा उद्धार करत होते.
"याच्यासाठी मुलांना फालतू स्वातंत्र्य द्यायचं नसतं..."
"दादा, ही वेळ तुझ्यावर येईल तेंव्हा कळेल तुला..."
"माझ्या मुलाने जर असं काही केलं तर मी त्याच्या तोंडावर दार धडकवून त्याला घराबाहेर हाकलून देईन..."
"बघू या काय होतंय ते.."
आता हा प्रकार आत्याच्या कानावर गेल्यावर ती कशी हसेल याच्या कल्पनेने मला फुटलेलं हसू लपवायला मला टेबलाखाली लपावं लागलं.
अखेरीस बार्बराचा परत जाण्याचा दिवस उजाडला. डोक्यावरून एखादं मणामणाचं ओझं उतरावं अशा आविर्भावात बाबा तिला घेऊन विमानतळावर निघाले. तिला सोडून घरी परत आल्या आल्या दादाला फोन करायचा असा त्यांनी निश्चय केला होता.
गंमत म्हणजे दादाचाच फोन आला. त्याची कॉलेजमधली मैत्रीण कोचीनमधे एका कॉन्फरन्ससाठी येणार होती. हैदरबादला एका प्रथितयश संस्थेत ती चाईल्ड सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करत होती. तिचं नाव डॉ. समीरा शेख. ती दोन दिवसांनंतर येणार होती. दादाने तिचीही काही दिवस आमच्या घरी राहण्याची व्यवस्था केली होती. दादाने तिला आणायला जायची बाबांना गळ घातली. नाईलाजाने बाबा हो म्हणाले. मग काय दोन दिवसांनी पुन्हा एकदा बाबा आणि मी विमानतळावर हातात 'वेलकम समीरा' चा फलक घेऊन उभे. थोड्या वेळाने नाजूक नक्षीचं भरतकाम केलेला सुंदर सलवार कुडता घातलेली एक मुलगी आमच्या दिशेने आली. तिचे केस खूप लांब आणि सुंदर होते. छानसं हसत तिने बाबांकडे बघून हात जोडले.
"नमस्कार" ती म्हणाली. बाबा एकदम खूश झाले.
"नमस्कार!"
"कशी आहेस वैजयन्ती?"
"मजेत आहे" आम्ही घरी आलो.
आता आपल्यापुढे कोणतं ताट वाढून ठेवलं आहे या काळजीने अर्धमेल्या झालेल्या आई-आजीने सोडलेला निःश्वास मला कळला. आत आल्याआल्या तिने आजीला वाकून नमस्कार केला आणि पिशवीतून एक सुरेखशी शाल काढून तिच्यासमोर ठेवली. समीराने आईसाठी साडी आणि माझ्यासाठी हैदराबादी बांगड्या आणल्या होत्या.
"असंच गंमत म्हणून..." असं पुटपुटत ती हात-पाय धुवायला गेली. थोड्या वेळाने आईने जेवायला हाक मारली. समीरा माझ्या शेजारी बसली होती. पानात वाढलेले पदार्थ पाहून ती छान हसली.
"सांबार फारच सुंदर झालंय... मला कधीच जमत नाही असं सांबार..." समीरा आईला म्हणाली.
"त्यात काय मी शिकवीन की तुला..." आजवर आईने कोणत्याही मुसलमान माणसाला तिच्या स्वयंपाकघराचा उंबरा ओलांडू दिला नव्हता. पण त्या दिवशी दुपारी सगळं काही धुडाकावून लावत समीराला घेऊन आई स्वयंपाकघरात गेली आणि अस्सल अय्यर सांबार कसं करायचं हे तिला शिकवायला आईने सुरुवात केली. दोन दिवस देवघरापासून समीरा कटाक्षाने दूर रहात होती. तिसऱ्या दिवशी बाबांनी आपणहून तिला हाक मारली आणि आपल्या देव्हाऱ्यातल्या मूर्ती तिला कौतुकाने दाखवायला सुरुवात केली. आपल्याला कुठल्या मूर्ती वारशाने कशा मिळाल्या हे तिला सांगण्यात ते अगदी रंगून गेले होते.
समीरा घरी आल्याला तीन दिवस उलटून जातात न जातात तोच विवेकने बायको म्हणून हिचीच निवड करावी असे नवस बोलायला सुरुवात झाली होती. त्या आठवड्यातल्या शनिवारी अचानक जेंव्हा दादा घरी आला तेंव्हा तर समीराचं 'स्थळ' त्याच्यासाठी खुद्द आईबाबांनीच पसंत केलं असावं अशा आविर्भावात त्यांनी तिची दादाशी ओळखही करून दिली. माझी मात्र हसता हसता अक्षरशः पुरेवाट झाली होती.
दोन महिन्यांनी दादा आणि समीराचं लग्न झालं.रिसेप्शनच्या वेळी अमेरिकेतून दादाच्या सेक्रेटरीने म्हणजेच बार्बराने एक मोठ्ठा फुलांचा गुच्छ खास तिकडून पाठवला होता. त्याला जोडलेल्या कार्डावर लिहिलं होतं
"फ्लॉवर्स २ डॉलर
पोस्टेज १० डॉलर
ट्रिप टु इंडिया १५०० डॉलर
इंडियन व्हॅल्यूज प्राईसलेस"

--अदिती

गाजराची पुंगी!

कधी जायचा निघून विखार
कधी यायचे फुलून शिवार

नवी मागणी हरेक क्षणात
पुरे व्हायचा कुठून पगार

तुला पाहता उदास मनात
पुन्हा यायचे भरून विकार

तुला पाहता समोर क्षणात
पुन्हा जायचे पळून विचार

नवा डाव हा , जरी जन तेच
करा तोच ओरडून प्रचार !

--अदिती(१९ ऑक्टोबर २००६)
धनत्रयोदशी, शके १९२८