29 मई 2006

पूरिया-धनाश्री

संध्याकाळचं तरल वातावरण असतं. सगळं सावळं झालेलं असतं. कसलीशी गूढ माया दाटून आलेली असते. सगळीकडे एक भारावलेपण असतं. अशा वेळी पूरिया-धनाश्री चे मधाळ सूर कुठूनतरी येतात. त्या हरवत चाललेल्या चैतन्यमयी प्रकाशाचा विरह अधोरेखित करतात. कातरवेळेला वाटणारी अनाम व्याकुळता चोहीकडे पसरते. तिचे पंख हळूहळू विकलतेचे पांघरूण घालू लागतात. छाया गडद होऊ लागतात. सूर्यबिंब केशरी होऊन जातं. झाडाझाडांवर पाखरांच्या किलबिलाटाला उधाण आलेलं असतं. अशा वेळी ते पूरिया-धनाश्रीचे सूर एक निराळीच ओढ लावतात. सुरांचा एक चकवा तयार होऊन जातो. त्या भोवऱ्यात गरगरत नाही पण सगळं काही विसरायला लावणारी एक छानशी गुंगी यायला लागलेली असते. काहीतरी खूप आवडणारं असं हरपत असतं. हरवत असतं हातातून कायमचं निसटत असतं. ते पकडायला जायचंय याची पाय जाणीव करून देतात. हात ते घट्टा धरू पाहतात. पण एखाद्या झोपाळलेल्या लहान बाळासारखा मेंदू त्या गुंगीच्या आधीन झालेला असतो. ते काहीतरी हातातून सोडवत तर नसतं पण आपल्यावर आपला ताबा पण उरलेला नसतो. ते सूर दूर कुठेतरी घेऊन जात असतात. दूरच्या रानात खर्जातली माधुरी घुमत असते. तिथेच ते शाम वातावरण शाममयी झालेलं असतं. ती शामवेळ मूर्त होऊन तिथे उभी ठाकलेली असते. ती फुंकर घालते. रंजवते. ते हरवण्याचं दुःख शांत क्ररते. हृदयातला तो वणवा विझतो. हळूहळू थंडावा येतो. श्रांत पण भारावलेलं मन त्या लहरींवर डोलत असतं. ही संध्याकाळ संपूच नये असं वाटत असतानाच एक एक दिवा उजळत जातो. रात्रीची ती उदार माया आपलं शांत रूप घेऊन सामोरी येते. तिच्या आईच्या मायेच्या कुशीत जीव विरून जातो. उद्या पुन्हा तेच दुःख भोगण्यासाठी तयार होत राहतो... आणि पूरिया धनाश्रीचे ते वेडे सूर मात्र त्या रानात तसेच कोंदून राहिलेले असतात.
--अदिती

25 मई 2006

मिस करतोय..

तो माझा जाल मित्र आहे"दोन ओंडक्यांची होते सागरात भेट" या उक्तीप्रमाणे या जालसागरात तरंगत असताना एका लाटेवर आमची भेट झाली. जालावर तुमच्या मनातल्या खोल तळाशी दडलेलं सगळं दुःख सहजपणे बाहेर येऊ शकतं या न्यायाला अनुसरून आणि जालामुळे मिळणाऱ्या नामानिराळेपणाचा फायदा घेत आम्ही बरेचदा सुखदुःखाची देवाणघेवाण करत असतो. नियमितपणे बोलतोच असं नाही. एकाच ठिकाणी बोलतोच असंही नाही. जाल-मुशाफिरीचे आम्ही भक्त असल्यामुळे खऱ्या - खोट्या नावांनी, मुखवट्यांसहित किंवा विरहित निरनिराळ्या ठिकाणांवर आम्ही एकमेकांशी संवाद साधत असतो.
तर हा 'तो' सध्या भारतात नाही म्हणे. त्याचं पल्याड जाण्याचं कारण तसं सर्वसाधारणाच असावं. त्या तपशिलात तो कधी शिरला नाही.मीही विचारलं नाही. प्रत्यक्ष बोलताना किंवा चिठ्ठ्याचपाट्या लिहिताना समोरचा माणूस कुठे आहे किंवा खरा कोण आहे याने तसा काहीच फरक पडत नाही. माणसांच्या जगात त्याला वाटणारा एकटेपणा तो तुमच्याशी बोलून जरा कमी करत असतो एवढंच. आणि एखाद्याला सौजन्याचे दोन बोल देऊन तुमचंही काही जात नाही. मन मोकळं करायला एक खिडकी मिळते. कन्फेशन देताना ते ऐकणारा माणूस लाकडी पेटीत का बसत असावा हे निरोपकांवर बोलल्यावर लक्षात येतं. त्याला प्रत्यक्ष डोळ्याला डोळा देऊन बोलायचं नसल्यामुळे सगळं कधीकधी किती सुसह्य होऊन जातं....
तर, पल्याड कुठेतरी बसून मला त्याचं दुःख सांगत असतो..." मी ना आईच्या हातचा चहा मिस करतोय." किंवा" मी ना मराठी बोलणं - लिहिणं मिस करतोय" किंवा "आंबे आले असतील नाही का गं... मी आंबे मिस करतोय..." किंवा "आज एक इटुकलं बाळ पाहिलं शाळेत जाणारं.. ते कित्ती प्रेमानं एबीसीडी म्हणत होतं.. मी शुभंकरोति,पाढे, परवचा मिस करतोय." असं बरंच काही. एकदा म्हणाला "इथले भारतीय लोकही आपले नाही वाटत आहेत आज. मी आपला देश मिस करतोय...." त्याचं हे मिस पुराण मी नेहेमी निमूटपणे ऐकून घेते कारण त्यावर काय बोलावं हे मला कळत नाही.(नाही म्हणायला कधीकधी तू एक्खाद्या 'मिस' ला कधी मिस करणार वगैरे कोट्या करायचा मोह अनावर होतो नाही असं नाही.... मग बऱ्याच हास्यमुद्रा वगैरे यांना पूर येतो) मग ही मिस यादी कशीही वाढते. आषाढी एकादशी, दिवाळी, फटाक्यांचा वास, चकल्या, तव्यावरची ताजी पोळी, चिमण्यांची चिवचिव, रेल्वेची शिट्टी , फोटोफास्ट चं दुकान, साबुदाण्याची खिचडी, शिवाजी पार्क, चतुर्थीचा उपास, कांदाभजी, तांदुळच्या पिठाची घावनं, वाटली डाळ, कैरीचं ताजं लोणचं, कागदी होड्या- बाण- विमानं- पतंग अशा वाट्टेल त्या सटरफटर गोष्टी त्याच्या मिस करून होतात. आणि मग "तुझी मजा आहे तुला हे सगळं फुकट(!) बिनबोभाट(!!) मनसोक्त(हे मात्र खरं ःड) उपभोगायला मिळतं अशी सांगताही होते. स्वारी आईचा पदर सोडून नुकतीच दूरदेशी गेली आहे तरी येईल हळूहळू ठिकाणावर असं म्हणून मी हे सगळं ऐकत असते. त्यामानाने मी एकदम साधी भोळी... ऑफिसमधले ताण, इतरांना मिळणारी(मला डावलून) पदोन्नती आणि सगळ्यात साधी गोष्ट म्हणजे कोडिंगमधे मला रामदासांच्या बेडकीच्या दगडासारखा अडून बसलेला अणि न फुटणारा खडक यांनी मी बरेचदा रडकुंडीला येते. मग ती रडकी कुंडी एकदाची फोडून टाकली की माझा प्रश्नही सुटलेला असतो. पण या परिघातून बाहेर पडायला फारशी मुभा नमिळाल्यमुळे मी सहज मिळणाऱ्या साध्या साध्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकत नाही. थोडक्यात संतुष्ट असलेल्या मला तो कूपमंडूक म्हणतो. मग मी त्याला नर्मदेतला गोटा म्हणते. शेलक्या विशेषणांचे आदानप्रदान झाल्यावर कुठेतरी हलकं वाटतं. आमच्या गप्पा बरेचदा याच विषयावर येऊन थांबतात.परवा अचानक त्याने मला विचारलं..." ...तू काय मिस करतेयस?" नेहेमीप्रमाणे त्याचं भरपूर रडून झालं होतं. कधीही न विचारलेला हा प्रश्न ध्यानीमनी नसताना त्याने मला विचारला आणि मी नकळत बोलून गेले "मी ना... मी आयुष्य मिस करतेय."
आयुष्य या शब्दाला आमच्यात बरेच संदर्भ होते. काय चाललंय किंवा "हाऊ आर यू डूईंग" या लाडक्या प्रश्नासाठी "कसं चाललंय आयुष्य " हा प्रश्न आणि "आयुष्याला आयुष्य फक्त संदीपच(खऱ्यांचा!) म्हणू जाणे" हे ठरलेलं उत्तर ही जोडी अमर होती. उर्दूमधे ज्याला जिंदगी म्हणतात तो शब्द आयुष्यापेक्षा किती साधा आणि सुंदर आहे वगैरे चर्चाही झाली होती. "लाईफ सक्स"," छे या जगण्याला काही अर्थ नाही", "आपण वेठबिगारी कामगारच आहोत जती एसी मधे बसलो तरीही" इथपासून "ते तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार" इथपर्यंत आयुष्यावर विविध प्रकारांनी टिप्पण्या करून झाल्या होत्या. त्या क्षणी या सगळ्या गोष्टी त्याच्या डोळ्यांसमोर तरळून गेल्या असणार. बोललेले न बोललेले सगळे संदर्भ त्याला लागले असणार. खात्री आहे मला तशी.
पण यापेक्षा निराळं असं काहीतरी तिथे उभं ठाकलं होतं. क्षणभरच.. जास्त नाही... पुढच्या क्षणी तो क्षण भूतकाळात गेला होता. पण तो एक क्षण पूर्ण क्षण ठरला होता. माझ्या एकाच वाक्यात मी आजपर्यंत त्याने मला ऐकवलेलं सगळं त्याला परत केलं होतं.... तो क्षण निघून गेला तरी अजूनही माझ्यासमोर तसाच आहे. आणि शेवटपर्यंत तो तसाच राहणार आहे.त्या क्षणी नक्की काय घडून गेलं माहीत नाही पण आम्हा दोघांनाही एकदम काहीतरी जाणवलं. ते काय होतं हे जाणून घ्यायचा प्रयत्न मी करणार नाही. पण आयुष्याचे श्वास भरलेल्या वाळूच्या घड्याळातल्या खाली पडून गेलेल्या क्षणांपैकी एक कायमचा लक्षात राहणारा तो एक क्षण होता एवढं मात्र नक्की.
---अदिती

15 मई 2006

लाखाची गोष्ट!

आशा हे धुळीतलं माणिक आहे. तिच्या गुणांना पूर्ण न्याय मिळू शकला नाही. कारणं काहीही असोत. राजकारण, पूर्वग्रह, प्रस्थापितांचा हेकेखोरपणा, जे प्रचलित आहे त्यालाच एनकॅश करण्याची व्यापारी वृत्ती आणि कमनशीब ... पण आशा दुर्लक्षित राहिली. नाही म्हणायला तिच्या पैलूंवर प्रकाश पाडणारे काही सोनेरी दिवस आहेत ज्यत मेराइन कुछ सामान किंवा आँखोंकी मस्ती के वगैरे लखलखत्या रचना येतात पण कुठेतरी चुटपुट लागून राहतेच की या दैवी आवाजाच्या विविध मनोरम छटा एस् डी, एस् जे, अनिल बिस्वास, सी रामचंद्र यांचयासारख्या जादुगारांच्या संगतीने आभाळाएवढ्या होताना पहायला मिळाल्या असत्यातर कित्ती बहार आली असती....
मी माझ्या परीने आशाच्या एका अतिशय सुरेख गाण्याचा रसास्वाद इथे मांडायचा प्रयत्न करणार आहे. पाहू या किती जमतंय ते....
सांग तू माझा होशील का..
रोज पहाटे स्वप्नी माझ्या येशील का....
कविश्रेष्ठ ग. दि. मा. आणि सुधीर फडके यांच्या अजोड सामर्थ्याला रत्नांचं कोंदण बसवून दिलंय ते आशाच्या आवाजाने.या गाण्यात प्रेमातली हुरहूर, संकोच, सलज्जता, मुग्ध जिव्हाळा, हळवी ओढ, थोडंसं धाडस थोडीशी धाकधूक, मधुर स्वप्नरंजन, तरीही मनातले भाव व्यक्त करताना वाटणारा तो अस्फुट आनंद, पिया मिलनकी आस, क्षणिक विरहानेही होणारी आग हे सगळे भाव एखाद्या झरझर रंग बदलणाऱ्या नवलाईच्या खेळण्यासारखे येतात आणि ऐकणऱ्याला विचार करायचीही फुरसद न देता आपले अनोखे रंग मांडून दुसऱ्याच एखाद्या भावामागे अदृश्यही झालेले असतात. हे गाणं कितीही वेळा ऐका. प्रत्येक वेळेला ते भाव तितकेच तरल, जिवंत आणि हवेहवेसे वाटतात. आवाजाच्या अप्रतिम कोवळेपणाबद्द्ल आणि स्स्तिमित करणाऱ्या मार्दवाबद्दल काय बोलावं? तांत्रिक सफाई आणि अचूकता अगदी एकसंधपणे गाणंभर असते. ती गाणं ऐकत असताना गृहित धरल्यासारखीच वाटते पण ते गाणं प्रत्यक्ष गुणगुणून पाहिलं की तिची खरी किंमत कळते. इतकं अवघड काहीतरी इतक्या सहजतेने करू शकणारा आशाचा तो आवाज दैवी का आहे हे जाणवत राहतं. हे गाणं हीच एक लाखाची गोष्ट आहे....

13 मई 2006

आशा.....

भारतीय त्यातूनही मराठी भावसंगीताच्या दोन देवता आहेत.(इतरही सारे गंधर्व आहेत. त्यांच्या श्रेष्ठत्त्वाबद्दल वाद नाहीत..) पण या दोघींच्या तुलनेचा मोह आवरणं अशक्य असतं. एकाच झाडावरच्या आणि अवीट अशा गुणसुगंधाने दरवळणाऱ्या या दोन फुलांची तुलना कदाचित त्यांच्या बालपणापासूनच होत असावी.
संगीतक्षेत्रात माझा अधिकार एक आस्वादक एवढाच आहे. गानसमुद्रात कानसेन होऊन शिरलेली मी एक तुच्छ माशी आहे. पण तरीही मी आशाबद्दल बोलणार आहे. आशाबाई आणि लतादीदी माझ्या आजीच्या वयाच्या आहेत. तरीही आशाबाईंना मी ती आशा म्हणते कारण त्यांच्या आवाजाला वय नाही आणि आशेच्या सोनेरी परीराणीची डोळ्यासमोर उभी राहणारी छबी आशाच असते.
या दोघीही संगीतक्षेत्रातला एक चमत्कार आहेत. म्हणूनच त्यांची गाणी मी जिवाचा कान करून ऐकते. मिडास राजाने हात लावलेल्या सगळ्याच गोष्टींचं सोनं झालं तसं त्यांचं प्रत्येक गाणं सोनंच असतं. सोन्यात डावं उजवं कसं करणार... तरीही आशाबद्दल मला जे वाटतं ते इथे मांडावंसं वाटतंय..
आशाचा आवाज मला विलक्षण आवडतो. त्या आवाजातली गाणी ऐकताना भावना मूर्त रूप घेऊन येतात. ज्या सहजतेने ती गाताना त्या भावनांशी एकरूप होत असेल त्याच सहजतेने ऐकणाऱ्याचंही मन त्यात विरघळून जातं. प्रत्येक भावना त्याच अचूकतेने येत असते. काळजाला हात घालत असते. भावनांचा मोकळेपणा , प्रामाणिकपणा आणि तरीही तिच्या मधुर आवाजाचं त्यांना लाभलेलं ते दिव्य अस्तर हे ऐकताना मन आशाचा तो दैवी सूर होतं. तिच्या स्वरातून जी भावना कानी पडेल ती भावना मनात उचंबळू लागते. कधी खट्याळ, कधी लाडिक, कधी लटक्या रागाची, कधी अल्लड प्रेमाची, कधी विरहाची, कधी आर्त चिरविरहाची, कधी मादक, कधी प्रेमविव्हल, कधी बालसुलभ मनमोकळेपणाची, कधी आर्जवाची, कधी विनवणीची, कधी लाजलेली, कधी मोहरलेली अशा अनंत निरनिराळ्या भावनांचा एक कॅलिडोस्कोप आहे आशा म्हणजे. जी भावना घ्याल ती आहे तिच्या गीतांमधे. सारळ, थेट, नितळ, एकसंध, ताशीव, ठसठशीत, रेखीव, गुळगुळीत स्वरूपात कमालीच्या नेमकेपणामे येणारं हे आवर्त आहे जे मनभर पसरतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशाच्या आवाजातला दर्द. लताच्या आवाजात इत्तर भावनांसारखाच दर्दही खुलतो. एखाद्या खिळवून टाकणाऱ्या रत्नस्फटिकाप्रमाणे वाटायला लागतो. मला असं वाटतं की लताच्या आवाजातला दर्द पांघरूण घालतो. त्रयस्थपणे पण अचूक उपचार करणाऱ्या डॉक्टरसारखा तो असतो. त्याने बरं वाटतं पण डॉक्टरच्या स्पर्शाला आईच्या मायेची किनार नसते. आशाच्या आवाजातला दर्द, दुःख मनात ठणकणारं वेदनेचं - दुःखाचं गळू हलक्या हाताने फोडतो. मन स्वच्छ होऊन जातं. मनातलं दुःख साचून रहात नाही. त्यावर पांघरूण घातलं जात नाही तर खोलवर जिव्हाळ्याने भरलेल्या आश्वासक स्पर्शाने ते दुःखच मनाबाहेर केरासारखं लोटून दिलं जातं. आशाच्या आवाजातला दर्द ऐकताना एखाद्या जिवलग मित्राने दुःख वाटून घेतल्यावर जसं हलकं वाटायला लागतं तसं वाटतं. आशाच्या आवाजात आपल्या दुःखाची सहसंवेदना असते.ती पाखर घालते, वेदनांवर फुंकर घालते. आशाचा आवाज आपल्या दुःखाशी एकरूप होतो. आणि काय जादू होते कळत नाही पण दे दुःख एकदम हलकं होऊन जातं.
आशाच्या आवाजाचं सगळं सामान्यातही असामन्य असं असतं. तिथे डोळे दिपत नाहीत. माणूस भव्यतेने दिपून जात असला तरी त्याला भव्य प्रासादापेक्षाही शांत आश्वासक साध्या घरट्यातच सुखाची झोप लागते. नाटकातल्या पात्रांच्या तोंडी शोभून दिसणारे अलंकृत शब्दांचे मोठेमोठे डोलारे आपल्या दुःखाच्या प्रसंगी आपल्या तोंडी नाटकीच वाटतात. आपल्या संकटकाळी आपल्या तोंदी साधेच शब्द असतात ज्यांना त्यातल्या सच्चेपणामुळे सौंदर्य प्राप्त झालेलं असतं. त्या शब्दांच्या उच्चारणामुळे मनातल्या भावनांना वाचा फुटलेली असते. कुठेतरी दाटलेला काळोख रिता झालेला असतो. म्हणून त्या शब्दांनी आतडं तीळ तीळ तुटून जातं. आशाच्या आवाजात नेमकं हेच सगळं सापडतं. तिच्या सुरांनी माझा आनंद द्विगुणित होतो आणि दुःखाचा डोंगर भुईसपाट होतो. म्हणूनच आशा मला आशेच्या परीचं मूर्त रूप वाटते.
आशानाम् हि मनुष्याणां काचिदाश्चर्यशृंखलाम्।
यया बद्धाः प्रधावन्ति मुक्तास्थिष्ठन्ति पंगुवत्॥
म्हणजे काय हे पहायचं असेल तर आशाकडे पहावं!
--अदिती

11 मई 2006

हरि ॐ!

इथल्या दुनियेत मी नवीन आहे आणि तोंड उघडायचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तेव्हा आत्ताच सगळ्यांना घाबरवणं बरं नाही नाही का! जसं जसं किहीत जाईन तसं तसं कळेलच मी काय काय गोंधळ घालते ते..
मी अदिती. बाकी माहिती लेखनातूनच मिळालेली चांगली. नाही का!
तोपर्यंत शुभमस्तु॥