27 सितंबर 2006

दिगंत

का दाटून येतात या उदास छाया
श्रांत विझल्या त्रस्त जिवाला पुन्हा छळाया

दूर क्षितिजापार करडी रेघ आहे
पिवळे उदास गवत खोळंबून राहे

सैरावैरा स्वैर धावती दुखऱ्या वाटा
बंध कुणाचे छंद कुणाला उरले आता

दूर डोंगरांवरून उरल्या जुनाट राया
हरवून गेल्या सुखस्वप्नांची केवळ माया

उदासवाणी हवेत उडती पिकली पाने
का जमिनीचा स्पर्श घडावा तया सुखाने?

चहूकडे कोंदून राहिला नीरव नाद
तरी मला का ऐकू येते दुरून साद?

आभास तुझे वेढून टाकती माझे मीपण
सांग कसे हे भोगायाचे दिगंत आपण?

--अदिती
(११.३.२००६)

5 सितंबर 2006

चले चलो!

दोन वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या अभ्यास सहलीसोबत आम्ही भरतपूर- रणथंबोर -आग्रा - मथुरा असा प्रवास करून आलो. तेंव्हा नुकताच स्वदेस सिनेमा प्रदर्शित झाला होता. 'स्वदेस' बद्दल प्रथमदर्शनी जाणवलेली गोष्ट म्हणजे एम-एटी वर तिबलसीट, आगगाडीत एकाच बाकड्यावरच्या पाच जणांमधला एक, नितळ स्वच्छ पण हिरवट पाण्यातून जाणाऱ्या मोठ्या तराफ्यावर बसलेला शाहरुख आणि या पार्श्वभूमीवर दिसणारं चित्रपटाचं घोषवाक्य "we the people!" तशीही चित्रपटाच्या कथानकाच्या ओघात अगदी उपग्रहापासून, रॉकेटपासून ते बैलगाडीपर्यंत विविध वाहतुकीची साधनं पहायला मिळतात. त्याच सुमाराला उत्तर भारताच्या एका लहानशा तुकड्याला आम्ही दिलेल्या भेटीतही ही वाहनांची विविधता मनापासून अनुभवयाला मिळाली. या प्रवासाचं एका खासगी मासिकासाठी मी लिहिलेलं हे प्रवासवर्णन.(खरं सांगायचं तर प्रवासात 'घडलेल्या' वाहनप्रवासाचं वर्णन!)
भरतपूर रणथंबोर ही अनुक्रमे राष्ट्रीय पक्षी अभयारण्य आणि राष्ट्रीय प्राणी अभयारण्य आहेत. डिस्कव्हरी - ऍनिमल प्लॅनेट - नॅट जिओ च्या प्रेक्षकांना रणथंबोरबद्दल अधिक काही सांगायला नकोच. झपाट्याने कमी होत असलेल्या भारतीय वाघांचं अर्थात ज्याला बेंगाल टायगर या नावाने ओळखलं जातं त्या भारतीय वाघाचं हे वसतिस्थान आहे. देव करो आणि इथलीच नाही तर जगातली वाघांची संख्या वाढती राहो. भरतपूर हे विविध प्रकारचे दुर्मिळ पक्षी , पाणपक्षी, सारस, घुबडं वगैरे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. अतिशय दुर्मिळ झालेली छोटी पांढऱ्या घुबडांची एक जोडी आम्हाला इथे बघायला मिळाली आणि धन्य झाल्यासारखं वाटलं. अशीच गुलाबी - करकरणाऱ्या पंखांची आणि केशरी टोकदार चोचींची काळ्या गिधाडांची एक जोडी रणथंबोरला पाहिली. काही वर्षांनी हे दोन्हीही पक्षी नामशेष होण्याची भिती आहे.(गिधाडांवर नुकताच एक अतिशय सुरेख वृत्तचित्रपट डिस्कव्हरी वर पाहिला. रामायणकालीन ज्ञात पक्ष्यांपैकी असलेले हे प्रचंड गृध्रराजही आता झपाट्याने कमी होत आहेत हे पाहून काळजाला अक्षरशः घरं पडली. पण त्याबद्दल पुन्हा सावकाशीने..)
या प्रवासात विमान सोडलं तर बहुतेक सगळ्या वाहतुकीच्या साधनांमधून आम्हाला प्रवास घडला. सहज मनात विचार आला की खरंच आपल्या जीवनाला गती देण्यात या वाहतुकीच्या साधनांचा किती मोठा वाटा आहे!.पूर्वी जेंव्हा वाहतुकीची साधनं आजच्याइतकी प्रगत झालेली नव्हती तेंव्हा देवाने प्रदान केलेले दोन पाय हेच प्रवासाचं प्रमुख साधन होतं. त्यामुळेच त्याला यातायात असा शब्द आला आहे. मराठीमधे यातायात करावी लागणे म्हणजे खूप कष्ट - धावपळ करावी लागणे. खरोखरच लांब अंतरावरचा प्रवास पायी चालत करणे हे अतिशय कष्टाचं काम आहे. गोपाळ भटजींचे "माझा प्रवास" हे पुस्तक वाचताना याचा साक्षात प्रत्यय येतो. कदाचित म्हणूनच पायी तीर्थयात्रा करत करत काशीची गंगा रामेश्वराला नेऊन वाहणे अतिशय पुण्यप्रद मानले गेले असेल. भरतपूरमधे अजगरांची बिळं शोधण्यासाठी मी एकवीस किलोमीटर चालले तेंव्हा पायाला चक्रे लावणे म्हणजे काय ते कळालं! पायी चालताना दम लागला की तोंडाची चक्रं(टकळी!!!) बंद होतात, मन अंतर्मुख होतं आणि आजूबाजूच्या नीरव शांततेचा आपण भाग होऊन जातो हे मला जाणवलं. मधून मधून येणारे पक्ष्यांचे आवाज आणि आपल्या पावलाखाली चुरडला जाणारा पाचोळा अशा वातावरणातून अडीच तास चालताना शांतता ऐकण्याचा एक अवर्णनीय अनुभव मी घेतला. तत्त्वचिंतनासाठी ऋषीमुनी आणि मोक्षप्राप्तीसाठी मुमुक्षु अरण्याचा मार्ग का धरत असतील हे थोडंसं कळल्यासारखं वाटलं.(पाडस मधला पेनी गाव सोडून जंगलात का गेला त्याचीही आठवण झाली)...
पायी चालणाऱ्या माणसांनी घोडे-हत्ती-खेचरं-गाढवं अशा प्राण्यांचा वापर प्रवासासाठी वाहन म्हणून करायला सुरुवात केली. ज्याच्याकडे प्राणी जास्त त्याचा मान मोठा होता. प्राणी हे धन मानण्यात येई. श्रीसूक्तात संपत्ती दे अशी प्रार्थना करताना "अश्वदायी गोदायी धनदायी महाधने" अशी लक्ष्मीला विनंती केली आहे. मला जेंव्हा आईने ही ओळ समजावून सांगितली, सरमा- पणींची गोष्ट सांगितली तेंव्हा मी खूप लहान होते. गायीला धन मानायचं या कल्पनेने मला हसू आलं होतं. पण प्राण्यांना धन मानतात म्हणजे काय याचा प्रत्यय जयपूरच्या आमेरगढ किल्ल्यावर जाताना आला. तेरा-चौदाशे पायऱ्या चढून जाण्याला दुसरा पर्याय म्हणजे राजेशाही थाटात हत्तीच्या पाठीवर बसून जायचं हे पाहून मी भलतीच खूश झाले होते(नुकतंच जेवण झालं होतं... अशा वेळी चौदाशे पायऱ्या चढायच्या? त्यादेखील फक्त मुघल - ए - आझम चं चित्रीकरण जिथे झालं ती जागा बघायला? काय वेडबीड लागलंय का?) पण आमचे हवेतले मनोरे हवेतच कोसळले. मुंबई ते जयपूर प्रवासाइतकं भाडं फक्त एक आमेरगढ हत्तीवरून बघायला द्यावं लागतं हे पाहून मला आयुष्यात पहिल्यांदा मी तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले नाही किंवा माझा जन्म अमेरिकेत झाला नाही(अजूनही गोरा साहेब म्हणतो ते ब्रह्मवाक्य मानून त्यांच्यापुढे लाचार गुलामगिरी दाखवत हिंडणारी आणि एतद्देशीयांकडे दुर्लक्ष करून परदेशी लोकांपुढे लाळ घोटणारी खूप लोकं मला या प्रवासात दिसली. फिरंग्यांचा राग तर येत होताच पण तरीही चौदाशे पायऱ्या?... असो) याचं मला जरा वाईटच वाटलं. एकूणच हल्लीच्या काळातही प्राणी = धन हे समीकरण कायम आहे हे पाहून धन्य वाटले.
राजस्थानात गेलो होतो पण मरुभूमीत जाणं झालं नाही त्यामुळे वाळवंटातलं जहाज अर्थात उंटावरून शेळ्या हाकायला किती पैसे पडतात हे समजू शकले नाही..त्यामुळे 'उंटावरचं शहाण'पण मी पुढच्या ट्रिपसाठी राखून ठेवलंय.
पायी चालणं, मग प्राण्यांच्या पाठीवर स्वार होणं यानंतर जागतिक ,सामाजिक सर्वसमावेशक, सर्वपरिवर्तक क्रांत्यांमधे सर्वात महत्त्वाच्या क्रांतीचा म्हणजे चाकांचा क्रम लागतो. माणसाला चाकाचा शोध लागला आणि काळाची - युगाची गती अनेकपटींनी वाढली. (चाक किंवा चक्र म्हटलं की चटकन अनेक संदर्भ आठवतात. महाभारतातला तो "मै समय हू, मै अक्षय और अनंत हू वाला हरीश भिमाणींचा धीरगंभीर आवाज, पुलंचं "टायर बसली की आधी पंक्चर होतो तो ड्रायव्हरचा चेहरा पासून ते रडीचा डाव खडी खेळणारा अर्जुन, बिचाऱ्या कर्णाचं चाक जमिनीत रुतल्याची ती पेपरात लिहिलेली कथा" ते "चक्रवत् परिवर्तन्ते" किंवा "चक्रनेमिक्रमेण" ते पार सवाई मधे ऐकलेला मालिनीबाईंचा चक्रधर इथपर्यंत. असो विषयांतर पुरे)
या चाकाच्या संदर्भात अत्यंत मनोरंजक पण हळहळ वाटायला लावणारी गोष्ट मी वाचली ती मीना प्रभूंच्या 'मेक्सिकोपर्व'या पुस्तकात.माया संस्कृतीमधे गणित ,त्यातूनही खगोलीय गणित या विषयात अतिशय आश्चर्यकारक आणि थक्क करून सोडणारी प्रगती झाली. पण त्यांच्याकडे चाकाला देवाचं रूप मानत असत त्यामुळे देवाघरची फुलं असलेल्या लहान मुलांनाच फक्त चाकांची खेळणी वापरायला परवानगी होती. मोठ्या माणसांना चक अस्पर्श्य होतं. आपल्याच प्रगतीच्या चालत्या गाड्याला खीळ घालणारी ही दुर्दैवी माणसं पाहून हळहळ वाटल्याशिवाय राहत नाही.
चाकाचा शोध लागला आणि कुंभाराच्या चाकापासून रहाटापर्यंत आणि नंतर चक्राकार अशा 'सबसे बडा रुपैय्या' पर्यंत सगळी समाजव्यवस्था चक्र लावून पळू लागली.याच चाकाचा अतिशय सुरेख उपयोग करून भौतिकशास्त्राचे चालतेबोलते प्रतीक असे एक वाहन बनवले गेले ते म्हणजे सायकल. असं म्हणतात की पूर्वी सायकलींच्या चाकात हवा भरत नसत. किंबहुना हवा भरायच्या रबरी नळीशिवाय नुसत्या धातूच्या गोलाकार चाकांवर एके काळी सायकली डगडगत असत. रबराचा शोध लागला आणि कोणालातरी या धातूच्या गोलांवर रबरी नळ्या बसवून त्यात धक्कारोधक म्हणून हवा भरण्याची अभिनव कल्पना सुचली आणि त्यातूनच तयार झाली आजची सायकल. भा. रा. भागवतांचा फुरसुंगीचा फास्टर फेणे वाचला तेंव्हापासून त्याची ती हडकुळी माझ्यासाठी असूयायुक्त प्रेमाचा विषय बनली होती. सायकलचा सार्वजनिक वाहतुकीतला प्रकार म्हणजे सायकल रिक्शा. जयपूरसकट उत्तर भारतात आजही सायकल रिक्षा मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. पण एकाच माणसाने छाती फुटेपर्यंत सायकल 'मारायची' आणि इतर आळशी गव्हाच्या जड पोत्यांचं वजन ओढून न्यायचं ही कल्पनाच आपल्याला पटली नाही.
जेंव्हा डिझेल इंजिनाचा शोध लागला तेंव्हा एक मोठी क्रांती झाली. तोपर्यंत समाजातले धनाढ्य - बडे लोक हौसेने बग्ग्या, मेणे , पालख्या आणि कोण जाणॆ काय काय वापरायचे. पण डिझेलच्या इंजिनावर धावणाऱ्या स्वयंचलित चारचाकी गाड्या आल्या आणि या उच्चभ्रू वर्गाला आपली मिजास दाखवण्याची नवी साधने मिळाली.(याही विषयावर डिस्कव्हरी - हिस्टरी वाहिन्यांना तोड नाही. सर हेन्री फोर्ड यांच्या मोटारी बनवण्याच्या प्रयोगातून साकारलेली यशाची दंतकथा नुकतीच पाहण्यात आली. अप्रतिम लघुचित्रपट. जरूर पहावा असा..) आमच्या या इवल्याशा प्रवासात अगदी क्वालिसपासून ते उत्तर प्रदेश राज्य परिवहन अर्थात UPST पर्यंत बऱ्याच गाड्या घडल्या. आग्र्याला तेजोमहालयाने एक दिवस हुलकावणी दिली आणि दुसऱ्या दिवशी मात्र व्यवस्थित दर्शन दिले. तिथून मथुरेला कृष्णजन्मभूमीचे दर्शन घेऊन आम्हाला रात्री भरतपूर गाठायचे होते. त्या खाजगी बसवाहकाकडे राज्यांची सीमा ओलांडण्यासाठी आवश्यक परवाना नसल्याचे आम्हाला कळले तेंव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. आम्ही मथुरेत! आता यमुना ओलांडून गोकुळाला जायचे की काय अशी एक गंमतशीर कल्पना मला सुचली. तेवढ्यात आमच्या चालकाने मार्ग काढला. आणि आम्हाला बसस्टँडवर नेऊन सोडण्याचे कबूल केले. बऱ्यापैकी मोठ्या प्रवासी बसमधे सामानासकट आम्ही पंचावन्न जण कसेबसे मावत होतो. आता सार्वजनिक राज्यपरिवहन म्हणजे आमचे कसे होणार या चिंतेने मी परमेश्वराची करुणा भाकायला सुरुवात केली. स्टॅंडवर आमची पलटण उतरली तेंव्हा रात्रीचे ११:३० झाले होते.तिथे समोर उभा असलेला चारचाकी प्रकार पाहून धडकीच भरली. न राहवून पु लं च्या " मायदेशीच्या यस्टीच्या खडखडाटावर आवाज काढून "वाला खडखडाट आठवला. बाहेर प्रचंड थंडी. थंडी अगदी मी म्हणत होती. थंडी मी म्हणत होती की दात आम्ही म्हणत होते हे कळणं अवघड होतं कारण दात कडकड वाजत होते. सामानासकट आम्ही बशीत कसे मावणार याची चिंता लागली होती. रस्त्यावर प्रचंड धुकं. चार हातांपलिकडलं दिसत नव्हतं. रात्र बरीच झाली असल्यामुळे आणि प्रचंड दमल्यामुळे अनावर होऊ पहात असलेली झोप अशा सगळ्या परिस्थितीत त्या धुडात शिरलो. आत चुरगाळून फेकलेली तिकिटं, पालापाचोळा असा केराचा हा ढीग साठलेला. एकतर आम्ही किंवा सामान असा "mutually exclusive" प्रकार होणार असं वाटत होतं. पण ती बसमाऊली चक्क प्रेमळ निघाली. खिडक्यांच्या काचा खडखडत नव्हत्या. झोंबरं वारं आत शिरत नव्हतं. चालकाचं आसन जाळीपाठीमागे होतं आणि त्याच्याशेजारी म्होप जागा होती. गियरबॉक्सशेजारी आमचं सामान (आणि त्यावर चार इतर प्रवासी!) आरामात मावलं. दहा मिनिटे घालवून चालकाने धुक्यात वाट दाखवणारा विशेष दिवा बसवून घेतला. ती त्या दिवशीची शेवटची गाडी होती. पण आम्ही प्रचंड बहुसंख्येने पोचल्यामुळे हाऊसफुल्ल! त्यामुळे तोही बापडा खूश झालेला असावा. अखेरीस कानाला मफलर घट्ट गुंडाळत त्याने गिअर टाकला आणि असा काही खणखणीत आवाज करून गाडी पळायला लागली की बास! साऱ्या शंका कुठच्या कुठे पळाल्या. शिवाय वाकडी वाट करून तिने आम्हाला हॉटेलच्या दारात सामानासकट आणून सोडलं. जी बस भितीदायक डाकीण वाटत होती तीच आमची प्रेमळ मैत्रीण ठरली. (त्या मार्गावर दरोडे आणि लुटालूट सर्रास चालते आणि रात्रीच्या वेळी तो तसा निर्जन असल्यामुळे हा धोका अधिक वाढतो हे नंतर भरतपूरला पोहोचल्यावर कळलं आणि जीव पुन्हा एकदा भांड्यात पडला..)याबद्दल उत्तर प्रदेश राज्य परिवहनाचे जितके आभार मानावेत तितके थोडेच!
या बस इतकाच विस्मयकारक प्रकार होता तो म्हणजे तिथल्या रिक्शा (सायकल रिक्शा नव्हेत आपल्या नेहमीच्या स्वयंचलित रिक्शा) मुळात रिक्शा हा जपानी शब्द आहे. रिकु म्हणजे प्रयत्न किंवा श्रम. श्या म्हणजे गाडी . जी श्रम लावून ओढली जाते ती गाडी म्हणजे रिक्शा. भारतीय रिक्शाचं कौतुक आणि चेष्टा सतत सुरूच असते उदा. एम,टी.व्ही वरची जाहिरात. सर्वात जास्त माईलेज देऊन चार माणसांना घेऊन जाणारे वाहन म्हणून तिचं मॉडेल लंडनला वस्तुसंग्रहालयात ठेवलंय म्हणे. या वर्णनाप्रमाणे पुण्यात तीन(च!) प्रवासी आणि एक गाडीवान अशा रिक्शा बघायची सवय होती(पुण्यातल्या रिक्शा आणि त्याहूनही रिक्शावाले हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे....असो) पण मथुरेतले रिक्शावाले काका फारच दिलदार वगैरे निघाले. त्यांनी चालकाच्या आसनाच्या दोन्ही बाजूंना फळ्या लावून, मागच्या बाजूला टांग्यासारख्या विस्तारित आसनांची सोय करून एकेका रिक्शातून १०-१२ सवारी नेण्याची धमाल सोय केली आहे.हा प्रकार पाहून मी तर चाट पडले बाबा. फेविकॉलची पारितोषिकप्राप्त जाहिरात जगल्यासारखंच वाटलं मला. (लंडनला खरं म्हणजे हा नमुना ठेवायला हवा! रिक्शाच्या मूळ निर्मात्यांनाही तो पाहून झीट यावी.. असो)
चारचाकी स्वयंचलित मोठ्या गाड्यांमधे सर्वात सुंदर अनुभव मिळाला तो रणथंबोरमधे. तिथल्या आरटीडीसी च्या एका हॉटेलमधे आम्ही मुक्कामाला होतो. आम्हाला स्टेशनवरून आणण्यापोचवण्यापासून अरण्यात हिंडण्यापर्यंत बऱ्याचशा कामांसाठी तिथे कँटर्स होते. आपली बस साधारण खिडकीच्या पातळीला आडवी कापली आणि तिचं छप्पर काढून टाकलं की कॅंटर तयार होतो. कँटर या इंघ्रजी क्रियापदाचा अर्थ होतो रमतगमत जाणे. अशा या कॅंटर्समधे पुन्हा एकदा सामानासकट आम्ही मावलो. रात्रीचे १२ वाजले होते. सगळीकडे अंधाराची जाड चादर अंथरलेली होती. अशा वेळी खाली आम्ही आणि वर आकाशात शेकडो लखलखते हिरे असा तो ताशी साठ कि.मी. च्या वेगाने केलेला प्रवास खरंच अविस्मरणीय. शेजारीच जंगल होतं आणि शहरी मनुष्यवस्ती दूर होती. त्यामुळे रात्रीच्या प्रखर दिव्यांचे झोत आसमंतात भेसळ करत नव्हते. अशा वेळी आकाशगंगेची खोली कळत होती. याच वैशिष्ट्यपूर्ण कॅंटरमुळे जंगलात झाडावर आपलं शिंग घासणारं एक मोठं सांबर अगदी सहज हात लावता येईल इतक्या जवळून पाहता आलं.(व्याघ्रराजांनी मात्र आमच्यासारख्या यःकश्चित क्षुद्र जीवांकडे साफ दुर्लक्ष केलं. एका बिबळ्याला लांबूनच पाहून वानरांनी केलेला कोलाहल सोडल्यास वाघ असा तो रणथंबोर चा छाप असलेल्या माझ्या आणि माझ्या भावाच्या टोप्यांवरच पहायला मिळाला. पण एका वाघिणीच्या पिल्लांचे ताजे ठसे मात्र दिसले. तिच्या पिल्लाचा पंजा आत्ताच तिच्या पंज्यापेक्षा मोठा झाल्याचं तिथला वनरक्षक मोठ्या कौतुकाने आम्हाला सांगत होता. मला एक क्षणभर त्याचा हेवा वाटला..)
या सर्व प्रवासात राहून गेलेला एक प्रवास आम्हाला त्याच्या आधल्यावर्षी घडला होता. भारतीय रेल्वेचं पश्चिम किनारपट्टीवरचं समुद्राजवळचं शेवटचं स्थानक असलेल्या ओख्याला उतरून आम्ही द्वारकेजवळच्या एका बेटावर मुक्कामी राहण्यासाठी चाललो होतो. बोटीत बसलो. सगळं काही स्थिरस्थावर झालं. संध्याकाळ अगदी टिपेला पोहोचली होती. पण एक प्रश्न उभा राहिला.त्या दिवशी नेमकी ओहोटी होती. ती संपून खाडीतली पाण्याची पातळी पुन्हा वाढेपर्यंत आम्हाला पुढे जाता येणार नव्हतं. मग काय! बोट त्याच जागी गोलगोल फिरु लागली. तेंव्हापासून पुढे जमिनीवर पाऊल ठेवेपर्यंतचे दोन तास मला खलाशी मंडळींबद्दल अपार आदर दाटून आला. नकळत ओशन ट्रँगलपासून ते एम टी आयवा मारू पर्यंत सगळ्या समुद्रसफरी डोळ्यांसमोर तरळून गेल्या. महिने महिने जमिनीचं दर्शनही न घडता खलाशी मंडळी कशी राहू शकतात याचं नवल वाटलं. आजवर वाचलेल्या खलाशीकथांमधले सगळे संदर्भ नकळत पटले.देव खलाश्यांचं भलं करो!
पण सगळ्यात सुखाचा आणि मजेचा प्रवास म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची जीवनरेखा अर्थात भारतीय रेल्वे! गाडी सुटायला अवघी पाच मिनिटे उरलेली असताना आम्ही ती कशी पकडली, दोनच मिनिटांचा हॉल्ट असलेल्या स्थानकावर ५५ माणसांची टीम दीड मिनिटात सामानासकट कशी उतरवली, आम्ही सगळे खाली उतरेपर्यंत टीसी लाच कशी काळजी वाटली, रेल्वेतलं जेवण, कुल्हडमधला चहा, प्लॅस्टिक पिशवीतून पाणी वगैरे गोष्टी अतिशय हृद्य आठवणींचा भाग बनून गेल्या आहेत. तालवाद्यांना तालाचे तुकडे सुचविणारी अतिशय नादमय आणि गतिमान अशी ही आगीनगाडी पुण्याच्या मायभूवर आम्हाला उतरवून यार्डात गेली आणि मला एकदम चाकं लावून घरी जावंसं वाटलं.
शेवटी काय? सारं जीवन हा प्रवास आहे आणि विविध साधनांनी तो प्रेरित केलेला आहे. पृथ्वीच्या पाठीवर बसून कित्येक मैलांचा अंतरिक्षाचा प्रवास आपण करत असतोच की. पृथ्वीचा गोलाकार चाकाच्या गोलाकाराशी आणि चाकाचा गोलाकार घड्याळाच्या गोलाकाराची संतुलन राखून असतोच ना!
त्यामुळेच..
'कायदा पाळा गतीचा काळ मागे लागला, थांबला तो संपला,धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे'
हेच खरं.
--अदिती