4 जुलाई 2010

एका पुस्तकाचा जन्म

पुस्तक हा माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. आजवर शेकडो पुस्तकं वाचली. प्रत्येक पुस्तकाने मला काही ना काही दिले. विशिष्ट तत्त्वज्ञान, अनुभवांतून येणारं शहाणपण, विरंगुळा किंवा कधीकधी तर दिवसेंदिवस वेढून राहणारी पुस्तकाची धुंदी. असं एखादं पुस्तक हाती आलं की मग लेखकाला हा विचार नेमका कसा सुचला असेल याबद्दल जाणून घ्यावंसं वाटतं. उदाहरण द्यायचं झालं, तर शेरलॉक होम्सच्या कथा वाचताना , डॉयल्लला मुळात इतकं भन्नाट काही सुचूच कसं शकतं असा विस्मय हटकून वाटतोच वाटतो. जे के रोलिंगला हॅरी पॉटरची कथा कशी सुचली याची कथा तर जगप्रसिद्धच आहे. ऍगाथा ख्रिस्ती, जेफ्री आर्चर यांच्या लघुकथा वाचतानाही असाच प्रश्न पडतो की हे सुचलं कसं!
या बद्दल शोध हेतला तेंव्हा फार काही हाती लागलं नाही. अर्थात तशी अपेक्षाही नव्हती म्हणा. अपवाद एकच. मार्गारेट मिशेल या लेखिकेचं अजरामर पुस्तक 'गॉन विथ द विन्ड'. विकीपीडियावर मला या पुस्तकाच्या जन्मकथेबद्दल अतिशय सुरस अशी माहिती मिळाली. गॉन विथ द विन्ड हे पुस्तक आजही आपली अमाप लोकप्रियता टिकवून आहे. त्याच्यावर वर्णभेदी असल्याचे, वंशभेदी असल्याचे आरोप होऊनही त्याची लोकप्रियता मात्र अबाधित आहे. अमेरिकन यादवी युद्धावर हे पुस्तक आधारलेलं आहे. या पुस्तकाची जन्मकथा थोडक्यात अशी सांगता येईल...
पेगी उर्फ मार्गारेट मिशेलने तिच्या स्वतःसाठी सहज म्हणून लिहिलेली ही कादंबरी आहे. अटलांटाला राहणारी पेगी जन्माला आली तेंव्हा यादवी युद्ध संपून चार दशक लोटली होती. युद्धस्य कथा रम्या म्हणतात ते उगीच नाही. यादवी युद्ध प्रत्यक्ष पाहणाऱ्या आणि युद्धात झालेल्या पराक्रमाने ज्यांचा अहंकार, स्वाभिमान आणि प्रेमाने उराशी जपलेल्या दक्षिण अमेरिकी मूल्यांबद्दलचं करारी प्रेम काकणभर जास्तच धारदार झालेलं आहे अशा आज्या - पणज्यांच्या मांडीवर पेगीचं बालपण गेलं. यादवी युद्धाच्या कथा ऐकतच ती लहानाची मोठी झाली. पुढे अपघातात ती वारली आणि जिथे तिच्या आयुष्याचा बराचसा काळ गेला तो अटलांटाचा भाग म्हणजे पीचट्री स्ट्रीट. या पीचट्री स्ट्रीटवर अटलांटाची शेवटची हातघाईची लढाई लढली गेली. इथेच यांकी आणि गद्दार कार्पेटबॅगर्सनी खऱ्या जॉर्जियन्सना अपमानास्पद अशा सर्व गोष्टी उजळ माथ्याने केल्या. आणि सुंभ जळला तरी पीळ जात नाही तशा पिळाच्या जुन्या जॉर्जियन रहिवाश्यांनी ज्या दिमाखाने कॉंफेडरेट्सचं सैन्य उभं केलं आणि युद्धात आपलं सर्वस्व दिलं, त्याच दिमाखात हुं का चूं न करता हे सगळं सहन केलं.
युद्ध आणि त्यामुळे कायमचा नष्ट होणारा काळाचा एक स्तर मानवी इतिहासाला आजिबात नवीन नाही. विजेत्यांनी लिहिलेल्या इतिहासात पराजित राष्ट्राची नेहमीच नालस्ती केलेली असते. आणि इतिहास हा जेतेच लिहितात हा जगाचा नियम आहे. 'ते हि नो दिवसाः गताः' असं म्हणणारा एक वर्ग समाजात नेहमीच असतो. पेगीने या वर्गाची नवीन युगाशी जुळवून घेतानाची धडपड प्रत्यक्ष पाहिली. त्यांच्या रम्य गतजीवनाच्या सुरस आणि चमत्कारिक कथा भारावून जाऊन ऐकल्या. भारावून जाण्याचं, भारून जाण्याचं, परिकथादेखील खऱ्या वाटण्याचं एक स्वप्नरंजित वय असतं. त्या वयात तिने हा इतिहास अजूनही मनाने त्याच काळात वावरणाऱ्या लोकांकडून ऐकल्यामुळे त्या दिवसांबद्दल एक आकर्षण तिच्या मनात नक्की निर्माण झालं असणार.
वॉशिंग्टन सेमिनरी आणि स्मिथ कॉलेजमधून पदवी मिळवून वर्तमानपत्रात स्तंभलेखिकेची यशस्वी कारकीर्द करणाऱ्या पेगीचे लेखनगुण जगाला अज्ञात मुळीच नव्हते. अचानक झालेल्या एका अपघातात पेगीच्या पायाला दुखापत झाली. काही महिने तिला चालायला - फिरायला बंदी करण्यात आली. वेळ घालवण्यासाठी वाचनालयातून पुस्तकं आणून वाचणारी पेगी ठराविक छापाच्या पुस्तकांना लौकरच कंटाळली. वाचण्याजोगी पुस्तकं सापडत नसल्याबद्दल तिने तिच्या नवऱ्याकडे कुरकूर केली. तिची थट्टा करण्यासाठी नवरा तिला म्हणाला, तुला जर ही ऐतिहासिक पुस्तकं वाचायचा कंटाळा आला असेल तर तू स्वतःच एखादं पुस्तक का लिहीत नाहीस?' पेगीच्या काय मनात आलं कोणास ठाऊक. तिने खरंच एक पुस्तक लिहायला घेतलं. अनेक दिवस ती हे पुस्तक लिहीत होती. मधल्या काळात तिचा पायही बरा झाला होता. पण एव्हाना पुस्तकाने पकड घेतली होती. ती लिहीत राहिली. हे पुस्तक खास तिचं होतं तिच्यासाठी लिहिलेलं होतं. हे पुढेमागे प्रकाशित होईल, रसिक वाचकांच्या त्यावर उड्या पडतील, देशोदेशींच्या वाचकांच्या गळ्यातला ताईत म्हणून हे उस्तक अजरामर होईल, प्रकाशनांचे आणि खपांचे उच्चांक मोडेल अशी पुसटशी शंकाही तिला तेंव्हा आली नाही. सुमारे दहा वर्षे हे पुस्तक तिच्या ट्रंकेत तळाशी पडून होतं.
एकदिवस प्रकाशक तिच्याकडे आला. हा प्रकाशक दक्षिण अमेरिकेतल्या गुणवान लेखकांच्या शोधार्थ अटलांटाला आला होता. पेगीने आपल्या एका मित्राच्या विनंतीला मान देऊन त्याला अटलांटामध्ये हिंडवून आणायचं काम स्वीकारलं होतं. बोलता बोलता विषय निघाला आणि पेगीने आपल्या पुस्तकाबद्दल त्याच्या कानावर घातलं. त्याने त्या पुस्तकाच्या हस्तलिहिताचं बाड आपल्याला दाखवण्याचा पेगीच्या मागे लकडा लावला. अखेरीस पेगीने न्यू यॉर्कच्या त्याच्या ऑफिसमध्ये आपलं हस्तलिहित पोस्टाने पाठवून दिलं. तोवर त्या पुस्तकाची आज अस्तित्वात असलेली पहिली दोन प्रकरणं लिहिलेली नव्हती. स्कार्लेटचं नाव होतं पॅन्सी ओहारा आणि टेराचं नाव होतं फॉंटेनॉय हॉल!
तो प्रकाशक पुस्तक वाचून बेहद्द खूश झाला. हे पुस्तक प्रकाशित करायचंच असं त्याने ठरवलं. पुस्तक लिहिताना पेगीने त्याचं नाव ठेवलं होतं 'टुमॉरो इज अनदर डे... ' पुस्तक प्रकाशित करण्याच्या दृष्टीने त्याची थोडीशी पुनर्रचना करताना पेगीने पहिली दोन प्रकरणं लिहून काढली. छापखना सज्ज झाला. जुळारी सज्ज झाले आणि मुद्राराक्षसाच्या दातांखालून एक अजोड कलाकृती मुद्रित स्वरूपात बाहेर पडली. आजवर फक्त पेगीच्या मनात वसणारं युद्धपूर्व आणि युद्धोत्तर काळातलं ते जॉर्जियन विश्व आता तिच्याइतकंच वाचकवेड्यांचंही विश्व झालं. पुस्तक छापखान्यातून बाहेर पडलं आणि हातोहात खपलं. त्याने खपाचे उच्चांक गाठले. त्याच्यावर आधारित एक सांगितिका निघाली. तीही प्रचंड लोकप्रिय झाली. युद्धाचं आक्राळविक्राळ रूप, ज्वालांचं तांडव आणि स्कार्लेटच्या लकूड कापायच्या गिरण्या रंगमंचावर पाहताना प्रेक्षक वेडे झाले.
डोळ्यांचं पारणं फेडणारा बहुचर्चित आणि अतिभव्य असा एक चित्रपटही या पुस्तकावर निघाला. या चित्रपटाची पटकथा लिहिण्यासाठी पेगीकडून हक्क विकत घेतले गेले. हक्क विकताना पेगी म्हणाली, "पुस्तकाची लांबी प्रचंड आहे याची मला कल्पना आहे. वेळेचं बंधन पाळण्यासाठी पटकथेत काही भागाला कात्री तर लावावी लागणारच. तुम्हाला हवं तर तुम्ही स्कार्लेटचं लग्न खुशाल ऍशलीशी लावून द्या. माझी काही हरकत नाही. पण त्यातल्या युद्धविषयक तपशिलाला हात लावाल तर खबरदार... " जॉर्जिया राज्याची एक खरीखुरी नागरिक या नात्याने पेगीचे हे उद्गार युद्धाच्या कथा तिच्या मनात किती खोलवर रुजलेल्या होत्या याचं द्योतक ठरावेत.
आपल्या पुस्तकाचा एवढा उत्कर्ष पाहणारी पेगी तिच्या आज्या - पणज्यांच्या वयाची होईपर्यंत जगती तर तिच्या लेखणीची आणखी करामत वाचकांना नक्की पहायला मिळाली असती. पण रस्ता ओलांडताना टॅक्सीचालकाने तिला धडक दिली आणि त्या अपघातात अवघ्या चाळिशीत पेगी हे जग सोडून निघून गेली. नाटक बघायला म्हणून निघालेल्या पेगीच्या नाटकाचा रंगमंच निराळा होता हेच खरं. त्या अपघातात नक्की चूक कोणाची होती यावरूनही बरीच वादावादी झाली म्हणे. कारण त्या टॅक्सीचालकाला समोर न बघता अशाच एक - दोन पादचाऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्यामुळे यापूर्वीही शिक्षा झाली होती म्हणतात दुसऱ्या बाजूला, पेगीही रस्ता ओलांडताना आजूबाजूला बघण्याचा कधीकधी कंटाळा करत असे म्हणतात. त्या टॅक्सीचालकाला शिक्षाही झाली पण त्यामुळे पेगी परत कशी येणार ? तिचं पुस्तक आजही साहित्यविश्वात अढळपदी विराजमान आहे. बायबलच्या खालोखाल सर्वाधिक खपाचं पुस्तक ठरण्याचा बहुमान त्याला प्राप्त झालेला आहे.
--अदिती

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें