हॅरी ची गोष्ट लोकांना इतकी का भुरळ घालते आहे यावर सध्या सर्वत्र ऊहापोह सुरु आहे. मला विचाराल तर अद्भुताचं आकर्षण सर्वांनाच असतं. जादू ही अनाकलनीय आणि कल्पनेच्या पलिकडे असते म्हणूनच तिचं प्रचंड आकर्षण आपल्याला वाटतं. हॅरीच्या दुनियेचं वैशिष्ठ्य म्हणजे ती जितकी अद्भुतरम्य आहे तितकीच मानवी पण आहे. हे सगळे जादूगार(जादूने गाssssर करणारे !) आणि जादूगारिणी (चेटकिणी !) खरोखरच सामान्य लोकांसारखे वागतात. त्यांनाही आपल्यासारखेच प्रश्न असतात. जादूने त्यांचं आयुष्य कितीही वेगळं झालं असलं तरीही त्यांच्यासमोरची आव्हानंसुद्धा तितकीच वेगळी (प्रसंगी अवघड) आहेत (लॉर्ड व्होल्डेमॉर्ट). सर्वसामान्य दुष्ट जादूगाराच्या प्रतिमेला विसंगत अशी यातली माणसं प्रेमळ(हॅग्रिड,मॉली वीझली),ऋषीतुल्य आदरणीय(अल्बस डम्बलडोर) , आपल्या प्राणाचही बलिदान करण्यास मागेपुढे न पाहणारी (लिली पॉटर,जेम्स पॉटर,सीरिअस ब्लॅक) अशी सुद्धा आहेत. या त्यांच्या मानवी गुणांमुळे ती आपल्यातलीच एक वाटतात. अतिशय सुंदर आणि सशक्त,घट्ट मैत्री कशी असते हेही यातून दिसतं. या पुस्तकाचे नायक लहान मुलं आहेत त्यांनाच जात्याच आपल्या कल्पनाशक्तीच्या राज्यात विहार करायला आवडतो. शिवाय या बालवीरांच्या साहसी सफरींमधे मोठे लोक त्यांना बरेचदा दुर्मिळ असं स्वातंत्र्य बहाल करताना दिसतात. जादुई प्राणी-पक्षी, जादुई आणि खास हॅरीच्या राज्यातले चमत्कार यांची तिथे रेलचेल असते. शाळेच्या एरवी रोजच्याच आणि म्हणूनच नीरस वाटणाऱ्या पार्श्वभूमीवर जादूचा अभ्यास करायचा ही कल्पना मला तर भारी रोमांचक वाटते.लहान मुलांच्या विश्वात या जादूविश्वाला अतिशय आस्थेनं सामावून घेतलं जातं यात काहीच नवल नाही. मी तर अनेक आजी-आजोबांना सुद्धा लहानांच्या बरोबरीनं या दुनियेत रंगून जातान पहिलं आहे. स्वतः मी सुद्धा एकदा पुस्तक हातात घेतलं की या जगाशी अगदी तहानभूक हरपून समरस होण्याचा अनुभव प्रत्येक वेळेला घेतलेला आहे. या पुस्तकांची अजून एक गंमत म्हणजे गोष्ट सांगायची पद्धत. जे.के.रोलिंग प्रतिभावान लेखिका आहे किंवा नाही याबद्दलच्या वादाशी मला देणघेणं नाही पण ती अतिशय सुंदर गोष्ट सांगते अर्थात ती एक कुशल सूत्रधार आहे याबद्दल दुमत असू नये. विशेषतः ज्या पद्धतीने ती मागील भागांचे दुवे जुळवून घेत घेत गोष्ट पुढे पुढे नेते त्याला दाद दिलीच पाहिजे. माझ्या दृष्टीने भाग ३,४ हे सर्वोत्तम आहेत. भाग ३ तर माझं सर्वात आवडतं पुस्तक आहे. मी हॅरीच्या राज्यात रंगून जाते कारण हे जग हॅरी आणि मी आम्हाला सारखंच नवीन असतं आणि सतत नवनवीन आश्चर्य घेऊन समोर उभं ठाकतं.या जगाची नाळ नकळत आजच्या आपल्या जगाशी जोडली जाते आणि हॅरी चं साहस माझं पण साहस होऊन जातं. असं वाटत राहतं की जादू सोडली तर हे जग आणि आपलं जग एकच तर आहे.एक कोवळा पोरका आणि अर्धवट वयातला मुलगा संपूर्ण अनोळखी जगात जिवावरच्या संकटांना एकटा तोंड देतो हे पहून आपण हॅरीशी अगदी चटकन एकरूप होऊ शकतो. तसं पाहिलं तर आपणही सगळे एकटे असतोच , जग आपल्यासाठीही अनोळखी आणि क्रूर असतं आणि आपल्याकडे डम्ब्लडोरांसारखे मार्गदर्शकही नसतात. त्यामुळे कुठेतरी वेगळ्याच पातळीवर हॅरीचं जग काही काळापुरतं आपलं जग होतं. मला वाटतं या पुस्तकाचं सर्वात मोठं बलस्थान हेच आहे की हे जग कल्पनेतलं असूनही खोटं किंवा पोरकट वाटत नाही.म्हणूनच लहानांइतकच मोठ्यांनाही ते आकर्षित करतं. तसं पाहिलं तर फास्टर फेणे हा माझा अनेक वर्षं अतिशय आवडता मित्र आहे. नाथमाधवांच्या वीरधवल ने आणि शशी भागवतांच्या मर्मभेदाने काही दिवस कायमचे सोनेरी केले आहेत. या आणि अशा कलाकृतींचं मोल वादातीत आहे. पण या सर्वांबद्दल सार्थ प्रेम आणि अभिमान बाळगूनही मी असं म्हणेन की हॅरी ची गोष्ट काहीतरी वेगळी आहे अणि ती वाचायची संधी मला माझ्या आयुष्यात मिळाली याबद्दल मी दैवाकडे नेहेमीच कृतज्ञ राहेन.
--- अदिती
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
hmm, vaachalach pahije HP aata.
जवाब देंहटाएं