27 जनवरी 2009

शुद्ध कल्याण...

कल्याण हा तसा कल्याणकारी राग आहे. शिवाय तो थाटही आहे.
गायन शिकायला सुरुवात करताना पहिली ओळख होते ती यमन रागाची. हिंदीत याला कदाचित ती यमन म्हणत असतील ( उ. विलायत खाँसाहेबांच्या लेकीचं नाव यमन होतं असं कुठेतरी वाचल्याचं स्मरतंय ) पण प्रत्यक्षात मात्र हा आहे रागांचा राजा. याची प्रकृती अगदी पैलवानी थाटाची असल्यामुळे याचं सगळंच अगदी मर्दानी डौलाचं आहे. काही लोक यमन आणि कल्याण हे वेगळे राग मानतात कारण परंपरेनुसार यमन रागात पंचम वर्ज्य आहे तर कल्याण हा थाट असल्यामुळे त्यात आरोही -अवरोही पंचम घेतला जातो. कल्याण थाटातलाच अजून एक राजयोगावर जन्माला आलेला राग म्हणजे भूप. हा राग म्हणजे अंबारीसहित हत्तीचा डौल आहे. रडक्या कोमल स्वरांची भानगड नसलेला आणि पाचच सूर असल्यामुळे शिकायला खूप सोपा असलेला भूप वातावरण प्रसन्न करून सोडतो. पण प्रत्यक्षात गायला आणि विशेषतः रंगवायला मात्र अति अवघड. विशेषतः ताना घेताना गायकाच्या गळ्याचा अगदी कस लागतो. हा रागसंगीताचा चक्रवर्ती सम्राट आहे. त्याच्या वाटेला जाणं हे येरागबाळाचे काम नोहे. भूप म्हटला की मला हटकून आठवण होते ती पुलंच्या आवाज आवाज या लेखाची(आम्हाला जिकडे तिकडे सतत पुलं आठवत असल्यामुळे ज्यांना पुलं तोंडपाठ नाहीत अशा लोकांची जरा पंचाईतच होते... असो) तर, रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या बर्थवर असलेल्या पंख्यातून म्हणे सतारीसारख्या गती वाजतात. फर्स्ट क्लासच्या बर्थवर झोपावं आणि पंख्याला "चलो बेटा आज भूपही सुनेंगे" अशी फर्माईश करावी. पंख्यातून अक्षरशः भूप सुरू होतो. इच्छुकांनी स्वतःच्या जबाबदारीवर भूप गाऊन पाहावा - इति पुलं!
असे हे यमन आणि भूप . अलिकडे हे दोन्ही राग फारसे ऐकायलाच मिळत नाहीत. पण निगाहे मिलाने को जी चाहता है हा ढोबळमानाने यमन आणि किशोरीबाईंचं सहेला रे आ मिल गाये म्हणजे साक्षात भूप असं म्हटलं तरी त्या दोघांची ती चमकदार रूपं डोळ्यांसमोर तरळतात. तसे हे दोघं स्वभावाने अगदी प्रेमळ आहेत. नवशिके गायक यांच्याशी जी काही झटापट , क्वचित कुस्तीसुद्धा करतात ती हे उदार मनाने ऐकून घेतात. नवशिक्या तबलजीला "बजाओ बेटे , घबराओ मत.. मी आहे ना तुझ्या पाठीशी" असं म्हणत सहज सांभाळून घेणाऱ्या वसंतराव देशपांड्यांसारखेच! पण पोरंसोरं यांच्याशी खेळत असली तरी हे राग गाणं म्हणजे मुळीच पोरखेळ नाही. मला तर यमन म्हणजे बाहेर सांजावलेलं पाहून कोणीतरी पितळेची उंच सहस्रदळी समईच उजळली आहे असं वाटतं. आणि भूप म्हणजे तर उंच छताला टांगलेलं आणि पूर्णपणे उजळलेलं लखलखतं बिलोरी झुंबरच! यांच्यात डावं उजवं कसं करणार?
हे दोन राग जेंव्हा एकत्रितपणे गायले जातात तेंव्हा त्यातून तयार होतो तो शुद्ध कल्याण. शुद्ध कल्याण म्हणजे सोन्याला सुगंध! ऑलिंपिक मध्ये जेंव्हा दोन जिम्नॅस्ट एकसारख्या हालचालींचा समन्वय दाखवतात तेंव्हा जसं वाटतं तसंच शुद्ध कल्याण ऐकताना होऊन जातं. यमन आणि भूप यांचं जोडकाम असला तरी शुध कल्याण या दोघांपेक्षा वेगळा आहे. शुद्ध कल्याण म्हणजे एखाद्या आकाशगंगेतला अनेक ताऱ्यांनी भरलेला तेजोमेघ आहे. प्रसन्नतेचं भारून टाकणारं गारुड आहे. कानांना आणि कानांवाटे मनाला सुखावून टाकणारी बासुंदी आहे. आजवर फक्त आस्वादलेला शुद्ध कल्याण काल थोडासा गायला मिळाला आणि जीव नेचे नेचे होतो सारा....
पूरिया - मारव्यासारखा हा कातर करत नाही. बसंत-बहारीसारखा हुरहूर लावीत नाही. बिहाग-मारू बिहाग नंदासारखा लालित्यपूर्ण पदन्यास करीत नाही. शुद्ध कल्याण हा अण्णांसारखा आहे. आपल्या रांगड्या मर्दानी आवेशाने डोळे दिपवून टाकणारा, कानांचं पारणं फेडणारा. लताबाई - आशाबाई एकत्र गाताहेत असा भास निर्माण करणारा. कोकणातल्या प्रलयंकारी पावसात हसत हसत भिजणाऱ्या रायगडासारखा. दर्या खवळे तिळभर न ढळे अशा जंजिऱ्यासारखा. विराट तरीही देखणा. राकट तरीही नितळ हसरा गुळगुळीत. तेजोमय... प्रकाशपूजक... उत्सवी....


--अदिती

25 जनवरी 2009

एकवार आज फिरून ....

नव्या वर्षात आजवर दुर्लक्षित असलेल्या ब्लॉगकडे जरा (जास्त) नियमितपणे लक्ष द्यावं असा संकल्प केल्यामुळे आज या पानावर जमलेली धूळ झटकली जाते आहे. सर्व संकल्पांचे रंग हे तेरड्यासारखेच तीन दिवसांत उडून जाणारे असतात. हा किती दिवस टिकतो पहायचं...
हे लिहितालिहिताच बालपणापासून अनेकवेळा जाणवलेलं सत्य नकळत पुन्हा एकदा आठवलं. उत्स्फूर्तता, बेभान-बेधुंद अवस्थेच्या सतत प्रेमात असलेल्या माणसांना सगळ्यात जर कसला कंटाळा येत असेल तर तो असतो नियमितपणा या गोष्टीचा. 'नेमेची येतो मग पावसाळा असे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ' ही ओळ घातली की निबंधाला कसं वजन येतं, त्यामुळे मार्क मिळवण्यासाठीच्या अनेक युक्त्या-क्लृप्त्यांमधली ही पेटंट युक्ती असली तरीही त्या नियमितपणाचा कंटाळाच प्रत्यक्षात जास्त जाणवलेला आहे. रोजचं आठ-ते-पाच चं चक्र पाळताना ' रुटिनः ज ntu' झालेल्या चाकरमानी पामरांना हे नियमितपणाचं खूळ पाठीवरच्या सिंदबादच्या म्हाताऱ्याइतकं जड वाटल्यास नवल ते काय? तरीसुद्धा आवडतं काम करायला वेळकाळ पहायचा नसतो. म्हणूनच हे जालनिशी - लेखन करायच्या निश्चयाने उसळी मारली आहे.
मराठी जालनिश्यांमध्ये नंदन, ट्युलिप, धोंडोपंत ही माझ्या माहितीतील काही पॉप्युलर नावं. ज्या तन्मयतेने आणि निष्ठेने हे लोक ब्लॉग लिहितात आणि तो सजव्तात ते पाहून तेथे कर माझे जुळती अशीच माझी अवस्था होते. अलिकडे केतन कुल्कर्णींचा असंच-आपलं हा ब्लॉग वाचला. खूप छान वाटलं वाचून. निष्ठेने आणि नियमाने जाललेखन करणाऱ्या या सर्व रथी महारथींना दंडवत घालून 'आयुष्यग्रंथाचं नवं पान उलटते आहे'(सुज्ञांस सांगणे न लगे... )
हे नमनाला बुधलाभर तेल वाया घालवल्यावर आता काहीतरी(च) लिहिणं क्रमप्राप्त आहे म्हणून हा प्रयत्न...

--अदिती