कविता लिहायचे दिवस
वळवाच्या सरीसारखे अचानक येतात
येताना काळे ढग आणतात...
वातावरणनिर्मिती तर मोठी झकास होते...
गारा पडतील का? मोठ्ठा पाऊस पडेल ना
किती छान होईल... हा उकाडा तरी जरा कमी होईल...
एकेक आशा पल्लवित होत जाते
काही क्षणांत या पानफुटीचा वृक्षच होतो!
गारा वेचायला, चिंब भिजायला आतुर होऊन
मी निळ्या धारांची वाट बघत राहते...
नाट पाहत राहते...
आणि वाटच पाहत राहते!
--अदिती
(२५ एप्रिल २०११,
चैत्र कृ. ८ शके १९३३)